गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सदिच्छा भेट घेतली. नितीन नबीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा अधिकृतपणे सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तुये येथील नव्या इमारतीमध्ये सामुदायिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. तसा प्रयत्न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे दिला आहे. पार्से येथील प्रभुदेसाई फाउंडेशनच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस कृती समितीचे निमंत्रक जुझे लोबो, ॲड. प्रसाद शहापूरकर, देवेंद्र प्रभू देसाई, ॲड. जितेंद्र गावकर, नीलेश कांदोळकर, सत्यवान वराडकर आदी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या गँगस्टर अमर कुलाल (३७) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अमरला अटक केली होती. गेले दोन वर्षे तो पिडीतावर लैंगिक अत्याचार करीत होता. मुंगूल गॅंगवॉरप्रकरणी तुरूंगाची हवा खाऊन हल्लीच जामिनावर सुटल्यानंतर त्याने ६ जानेवारीला पुन्हा त्या मुलीवर अत्याचार केला होता. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सांतेमळ राय येथे अमरला पकडले होते.
दुर्भाट व आडपई येथून निघून रासईला जाणारी फेरीबोट सेवा आज सकाळी दाट धुक्यामुळे सात वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली. धुके कमी झाल्यानंतर साडेआठ वाजता ही फेरीसेवा पूर्ववत सुरू झाली.
मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेंतर्गत मडगावच्या रेल्वे स्थानकावरून १२०० भाविकांना घेऊन खास रेल्वे आयोध्येला रवाना झाली. आमदार संकल्प आमोणकर, कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, केदार नाईक व उल्हास तुयेकर तसेच समाज कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून भाविकांना निरोप दिला.
म्हापसा येथील अलंकार सिनेमागृहाजवळील अन्न व्यवसायांवर (फास्ट फूड बिझनेस) पाळत ठेवण्याची मोहीम राबवण्यात आली. यावेळी १८ अन्न व्यवसायांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ व्यवसायांना यापूर्वीच्या तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या मार्गदर्शक तत्त्वांवर प्रशिक्षण देऊनही अस्वच्छ आणि आरोग्यास हानिकारक पद्धतीने व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे कामकाज थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. उर्वरित व्यवसायांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.