
ओला, उबेर व इतर ॲप आधारित टॅक्सी सेवा गोव्यात नको, अशी मागणी करणाऱ्या पर्यटक टॅक्सी मालकांची आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला मंत्री व आमदारांचीही हजेरी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याच्या उद्देशाने टॅक्सी मालकांचे प्रश्न सोडविणारे अन् वाहतुकीशी संबंधित टॅक्सी धोरण १० सप्टेंबरला जाहीर केलं जाईल, असं जाहीर केलं. या निर्णयाचे टॅक्सी चालकांनी स्वागत केलं असलं तरी अनेकांना सरकारवर भरोसाच नसल्याचं त्यांच्या खासगीतल्या चर्चेतून वा देहबोलीतून दिसत होतं. गणेशोत्सव असल्यानंच काहीतरी देऊन बोळवण करावी, या हेतूनंच हे धोरणाच्या आश्वासनाचं गाजर आम्हाला दाखवलंय, अशीही भावना समज टॅक्सी चालकांत आहे. याआधीही अशीच आश्वासने देऊन आम्हाला खेळवल्याचीही त्यांची भावना झालीय. एकूण काय तर ‘सरकारवर भरोसा नाय बा!’ ∙∙∙
टॅक्सी ॲप ॲग्रीगेटरच्याविरोधात टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा केली आणि आपल्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी याविषयी धोरण आणले जाईल, असे त्यांना आश्वस्त केले. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या टॅक्सी चालकांनी बैठकीनंतर सर्व धर्मीय म्हणजेच हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम या धर्मानुसार आपापल्या देवतांकडे गाऱ्हाणे मांडले. यातून सर्व धर्म समभावाचे दर्शन यातून घडले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे निश्चित टॅक्सी मालकांना पहिल्या टप्प्यावर यश मिळाले आहे, असे म्हणता येईल. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जमलेली मंडळी जयघोष करायचे ते विसरले नाहीत. ∙∙∙
‘जो मांगकर नहीं मिलता है वह छिनकर लेना पडता है’, हा सिनेमातील डायलॉग आपण ऐकला असणार. गोवा मुक्त होऊन ५४ वर्षे उलटली. मात्र, गोव्याच्या राज्यभाषेचा प्रश्न अजूनही वादात आहे. कोकणीबरोबर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायला हवाय म्हणून मराठीप्रेमी निर्णायक लढा देताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूने देवनागरी कोकणीबरोबर रोमी कोकणीला समान दर्जा मिळावा म्हणून रोमी कोकणी प्रेमी लढा देऊ लागलेत. देवनागरी कोकणी बरोबर रोमी कोकणी शाळांत शिकवावी, म्हणून रोमी समर्थक प्रयत्न करतात. गोव्याचे ‘थिंक टँक’ ॲड. राधाराव ग्रासियस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ख्रिस्ती अल्पसंख्याक शाळांनी शिक्षण खात्याकडे व गोवा शालांत मंडळाकडे रोमी कोकणीसाठी आग्रही मागणी करण्याची सूचना राधाराव यांनी केली आहे. दुसऱ्या बाजूने देव नागरी कोकणी समर्थक रोमी कोकणीला मान्यता दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देतात. आता राज्यात त्रिसूत्री भाषा फॉर्म्युला खऱ्या अर्थाने लागू होणार असे म्हणावे लागेल, नाही का? ∙∙∙
विधानसभेच्या सभापतीपदासाठी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचे नाव घेतले जात आहे. ते ही जबाबदारी पेलतील काय याविषयी चर्चा आहे. अनेकांना ठाऊक नाही गावकर हे तरुणपणी गोवा लोकसेवा आयोगाची मामलेदार पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. राजकीय पाठबळाविना ते पद मिळाले नव्हते. अन्यथा आज ते कुठेतरी उपजिल्हाधिकारी असते. ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, तत्त्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व तत्कालीन उद्योगमंत्री महादेव नाईक याच्या समक्ष गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून इतर भाषांतील एकही शब्द न वापरता इंग्रजीतून गावकर यांनी केलेले भाषण उद्योग जगतात आजही स्मरणात आहे. त्यामुळे ते सभापती झाल्यानंतर जबाबदारी पेलतील काय? या चर्चेला अर्थच नाही अशी चर्चा आहे. ∙∙∙
दिगंबर कामत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॉंग्रेस विरोधात स्वाभाविकपणे टीकाटिप्पणी केली आहे. कॉंग्रेस पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले होते, त्याची बूज राखून त्यांनी किमान पक्ष सोडायला नको होता, सत्तेमागे धावायला नको होते व इतके केल्यावरही त्यांना शेवटी काय मिळाले?. तर एक साधे मंत्रिपद! अशी भावना असता त्यांनी मुलाखतीत सांगितले, की कॉंग्रेसने म्हणे त्यांचा घोर अपमान केला व पक्ष सोडून जावे म्हणून परिस्थिती निर्माण केली. आपल्याला २०२२च्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करायला हवा होता, अशी त्यांची अपेक्षा. परंतु ते एक विसरले की, या निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांच्यावर भिस्त ठेवूनही त्यांनी अपेक्षेनुसार काम केले नाही, निधी गोळा केला नाही. ठिकठिकाणी प्रचार मोहीम राबवली नाही. व पर्रीकरांनी ज्याप्रमाणे जीवाचे रान केले होते, तशी हिकमत दाखवली नाही....म्हणजे कॉंग्रेस नेत्यांनी सारी मेहनत करून कॉंग्रेसला जिंकून आणावे व कामतना मुख्यमंत्री बनवावे, अशी अपेक्षा ते ठेवत होते, यालाच ‘देवाचो मनीस’म्हणत असावेत! ∙∙∙
शपथविधी सोहळ्यानंतर कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. तसे कृषिमंत्री रवी नाईक हेही अनुपस्थित होते, पण त्यांच्या नावाची तेवढी चर्चा नव्हती. कार्यक्रम संपल्यावर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर पोचले अन्यथा त्यांचेही नाव चर्चेत आले असते. लोबो यांच्यापैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश हा गृहित होता. यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरची त्यांची देहबोली तेच सांगत होती. मात्र मंत्रिमंडळ फेररचनेला दिल्लीश्वरांचा आशीर्वाद मिळताना लोबो यांचे नाव त्यात नव्हते. मुख्यमंत्र्यांनी तशी कल्पना लोबो यांना देत समजावण्याचा प्रयत्न केला असला तरी तो यशस्वी झाला नसल्याचे संकेत गुरुवारच्या शपथविधी सोहळ्याला लोबो दांपत्याच्या अनुपस्थितीतून मिळाले आहेत.∙∙∙
राजभवनातील नवे दरबार सभागृह गुरुवारी खचाखच भरले होते. बसण्यास जागा नव्हतीच, उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. तरीही काही जणांनी अक्कल हुशारीने आसने पटकावली. त्याचे झाले असे, आमदारांसाठी काही आसने राखीव असतात. सत्ताधारी सगळे आमदार आले तरी विरोधातील सात आमदार फिरकणार नाहीत, असा हिशेब काहींनी केला. त्यांनी मोजून आमदारांसाठी राखीव असलेल्या आसनांपैकी सात आसनांवर हळूच स्थानापन्न होण्यास पसंती दिली. त्यांचेही खरेच झाले. विरोधी आमदारांपैकी अगदी विरोधी पक्षनेत्यानेही शपथविधीकडे पाठ फिरवली आणि त्या सात जणांना ऐटीत शपथविधी पाहण्याची संधी मिळाली. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.