Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांना मंत्रिपद नकोच होते?

Khari Kujbuj Political Satire: फातोर्डातील एका बिल्डरला धमकी देऊन त्‍याच्‍याकडून २ कोटींची खंडणी मागण्याच्या आरोपाखाली सध्या चारजण फातोर्डा पोलिस ठाण्याची हवा खात आहेत.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

तवडकरांना मंत्रिपद नकोच होते?

गुरुवारी सकाळपर्यंत सभापतिपदी असलेल्‍या रमेश तवडकरांनी गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून मंत्रिपद मिळवण्‍यासाठी वेगवेगळ्या मार्गाने केंद्रीय पातळीवर ‘फिल्‍डिंग’ लावली होती. आपल्‍याला मंत्रिपद मिळावे, ही भावना त्‍यांनी अनेकदा पत्रकारांसमोर बोलूनही दाखवली होती. गुरुवारी सभापतिपदाचा राजीनामा देत असताना मात्र पाच वर्षे सभापतीपदावर राहून या पदाची शान आणखी वाढवण्‍याची आपली इच्‍छा होती. परंतु, पक्षाच्‍या आदेशामुळे आपल्‍याला या पदाचा राजीनामा द्यावा लागत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍यामुळे पत्रकारांसह त्‍यांची विधाने ऐकणाऱ्यांच्‍या भुवया उंचावल्‍या. याबाबत पत्रकारांनी नंतर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना छेडले असता त्‍यांनी यावर बोलणे टाळले. त्‍यामुळे तवडकरांनाच मंत्रिपद हवे होते की त्‍यांची इच्‍छा नसताना पक्षाने त्‍यांना मंत्री बनवले? असा गहन प्रश्‍‍न राजकीय वर्तुळासमोर उभा राहिला. ∙∙∙

अन्‌ वरून आला फतवा...

फातोर्डातील एका बिल्डरला धमकी देऊन त्‍याच्‍याकडून २ कोटींची खंडणी मागण्याच्या आरोपाखाली सध्या चारजण फातोर्डा पोलिस ठाण्याची हवा खात आहेत. या प्रकरणाची तशी व्याप्ती बरीच मोठी आहे. मडगावातील एक स्थानिक राजकारणी त्यात गुंतला होता, अशीही माहिती हाती लागली आहे. नगरसेवक पदापर्यंत पोहोचलेल्या या राजकारण्याची तशी बरीच प्रकरणे यापूर्वी लोकांनी ऐकली आहेत. मात्र या खंडणी प्रकरणातही त्‍याचा हात असल्‍याचे ऐकून कित्‍येकांना धक्‍का बसल्‍याशिवाय राहिला नाही. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी त्याला उचललेही होते असे म्‍हणतात. कारवाई होण्याचा अवकाश होता, मात्र तोपर्यंत वरून हालचाली सुरू झाल्या. सोडून द्या, असा फतवा आला व पोलिसांनीही इमानइतबारे त्या आदेशाचे पालन केले. वरचा आदेश झुगारण्याचे डेअरिंग सध्या कुणा पोलिसवाल्यामध्ये नाही हेच खरे. आमचे पोलीस केवळ नावाचे सिंघम ∙∙∙

सिलिंडरचे वजन करायचे कुठे?

राज्यातील नागरी पुरवठा खाते बरेच सक्रीय झाले आहे. वर्षभरात सिलिंडरच्या काळ्याबाजाराचा पोल खोल करून तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. आता अर्थातच या खात्याचे मंत्री आणि संचालकांची धडाडी त्यातून दिसून येते, ज्यामुळे खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करण्यास चांगली मुभा मिळते, म्हणून असे छापे टाकले जातात. असो, पण एक गोष्ट मात्र ग्राहकांना अजून रूचलेली नाही, ती म्हणजे साळगावच्या छाप्यानंतर या खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी गैस सिलिंडर घेताना ग्राहकाने वजन करून घ्यावा, आता हा वजनकाटा संबंधित एजन्सीकडून त्यांच्या डिलीव्हरी व्हॅनवर उपलब्ध असायला हवा, तशी मार्गदर्शिकाही खात्याने काढली आहे, पण एकाही डिलिव्हरी व्हॅनवर असा वजनकाटा असलेला कुठे दिसला नाही, त्यामुळे सिलिंडरचे वजन करायचे कुठे, असा सवाल ग्राहकांकडून केला जात आहे. ∙∙∙

विजयची आगपाखड

दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडियाद्वारे भाजपवर निशाणा साधला. २००७ ते २०१२ या काळात राज्‍यात दिगंबर कामत यांच्‍या नेतृत्‍वाखाली काँग्रेसचे सरकार होते. २०१२ मध्‍ये भाजपच्‍या नेते, कार्यकर्त्यांनी कामत सरकारला भ्रष्‍ट ठरवले. पण, त्‍यांच्‍याच मंत्रिमंडळात जे सात मंत्री होते, त्‍यातील विश्‍‍वजीत राणे, बाबूश मोन्‍सेरात, रवी नाईक, माविन गुदिन्‍हो आणि निळकंठ हळर्णकर हे पाचजण विद्यमान मंत्रिमंडळात अगोदरपासून होते. आता कामत आणि तवडकरांना मंत्रिपदे मिळाल्‍याने ‘ते’ सातही मंत्री विद्यमान मंत्रिमंडळाचा भाग बनले आहेत. याचाच अर्थ भाजपने ‘जुनीच दारू नव्‍या बाटलीत भरली’, असा होत असल्‍याची टीकाही त्‍यांनी केली. काहीही करून भाजप गोवा फॉरवर्डला सत्तेत घेत नाही म्‍हणून की दिगंबर कामतांना पुन्‍हा मंत्रिपद मिळाले म्‍हणून विजय इतकी आगपाखड करीत आहेत? याचे उत्तर दक्षिण गोव्‍यातील जनता मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे.∙∙∙

सुभाषचे आसन बळकट?

‘श्रमाला यश लाभतेच’ असे म्हणतात ते खरे. राज्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळ देसाई हे तसे आक्रमक व सक्रिय मंत्री.पुढील विधानसभा निवडणुकीत जर अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण मिळाले व सांगे मतदारसंघ जर आरक्षित झाला तर सुभाष फळ देसाई यांचे राजकीय भवितव्य काय? यावर चर्चा आहे. सुभाष फळ देसाई मुख्यमंत्र्याचे ब्ल्यू आय बॉय म्हणून दक्षिणेतील लोक म्हणताता.सुभाष फळ देसाई यांच्या वाढदिनी संपूर्ण गोव्यातून समर्थकांचे लोंढे सांग्यात जमा झाले ते पाहिल्यास सुभाष फळ देसाई यांचे राजकीय भवितव्य सुनिश्चित असल्याचे समर्थक म्हणतात.मात्र सुभाषचे राजकीय भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी एक तर सांगे मतदार संघ आरक्षणातून मुक्त व्हावा लागेल अन्यथा सुभाष फळ देसाई यांना कुडचडे किंवा केपे मतदार संघातून उमेदवारी मिळवून निवडून येण्यासाठी कठोर श्रम घ्यावे लागणार हे निश्चित. ∙∙∙

गोविंद गावडेंना ‘धक्का’?

रमेश तवडकरांची मंत्रिमंडळात वर्णी लागणे हा नुकताच मंत्रिपदावरून डच्चू दिलेल्या गोविंद गावडे याना बसलेला मोठा धक्का असे मानले जात आहे.‘ तवडकर यांनी सभापती असताना आधीच आपल्या ‘श्रमधाम’द्वारे जगोविंद गावडे यांच्या प्रियोळ मतदार संघात एन्ट्री घेतली आहेच. आता ते मंत्री झाल्यानंतर या मतदारसंघात आणखी किती झेप घेतात हे बघावे लागेल. नाहीतरी गोविंदा ना सध्या ‘धक्के पे धक्के’ बसत आहेच. राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांचे कट्टर समर्थक प्रकाश वेळीप यांचा झालेला पराभव, त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीतले राजकारण असे अनेक धक्के त्यांना सध्या पचवावे लागताहेत.‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात ना’ तसे त्यांच्या बाबतीत होताना दिसू लागलेय, अन् याची खमंग चर्चा त्यांच्याच मतदारसंघात रंगतेय. आता बोला∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: कामत, तवडकरांना 2 दिवसांत खाती! सोहळ्याकडे विरोधकांनी फिरवली पाठ; लोबो दाम्‍पत्‍यासह गावडे, बाबूशची अनुपस्‍थिती

आर्लेकरही म्हणाले, ‘भिवपाची गरज ना’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे घोषवाक्य किती प्रसिद्ध झालं, त्याची गावोगावी आता प्रचिती येत आहे. खुद्द पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकरही आता ‘भिवपाची गरज ना’, असे आवाहन महिला मंडळांना करत आहेत. त्याचे झाले असे, पेडणे तालुक्यातील महिला मंडळामार्फत चतुर्थीचा खास बाजार पेडणे शहरात २१ ते २४ पर्यंत भरवला आहे. त्याच्या उद्‍घाटन सत्राला आमदार प्रवीण आर्लेकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी आमदार आर्लेकर यांनी महिलांना संबोधताना आपण असताना ‘भिवपाची गरज ना’, असे सांगितले. पण कशामुळे ‘भिवपाची गरज ना’, हे मात्र कुणाला कळले नाही. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: ‘शपथविधी’त गर्दीचा उच्चांक! कामत, तवडकरांची छाप; मूळ भाजप कार्यकर्ते मात्र अनुपस्थित

युरींची दांडी नेमकी कशासाठी?

दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन नवनिर्वाचित मंत्र्यांच्‍या गुरुवारच्‍या शपथविधी सोहळ्यावेळी पत्रकार आणि भाजप नेत्‍यांचे लक्ष कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्‍थित राहणार का, याकडे होते. परंतु, युरींनी कार्यक्रमाला उपस्‍थिती न लावणेच पसंत केले. तसे पाहिल्‍यास युरी किंवा काँग्रेसचे इतर दोन आमदार विद्यमान मंत्रिमंडळाला भाजप सरकारचे मंत्रिमंडळ मानतच नाहीत. युरींनी तर याआधीच्‍या अनेक अधिवेशनांमध्‍ये भर सभागृहात बोलताना ९० टक्‍के मंत्री काँग्रेसचे असल्‍याचे अनेकदा म्‍हटले आहे. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रश्‍‍न विचारल्‍यास पुन्‍हा पुन्‍हा तेच बोलावे लागेल म्‍हणून की, दिगंबर कामतांचा ‘काँग्रेसचा मुख्‍यमंत्री’ ते ‘भाजपचा मंत्री’ हा प्रवास उघड्या डोळ्यांनी पहावा लागेल म्‍हणून युरींनी दांडी मारली असेल? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com