

म्हापसा: कर्नाटकातील एका माजी मंत्र्याचे निकटवर्तीय आणि माजी वाहनचालक तसेच जलक्रीडा व्यावसायिक संदीप सलायम (४०, रा. माल्पे-उडुपी) यांचा कळंगुट समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका रिसॉर्टमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि पँटच्या खिशातील पाकीट गायब असल्याची माहिती समोर आल्याने हत्येचा संशय अधिक बळावला आहे.
संदीप सलायम हे दोन दिवसांपूर्वी तिघा मित्रांसह सुट्टीसाठी गोव्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, ते पणजीतील एका कॅसिनोमध्ये गेले असता त्यांची एका अज्ञात महिलेशी ओळख झाली. त्यानंतर ते त्या महिलेसोबत कळंगुटमधील रिसॉर्टवर आले.
काही वेळाने संबंधित महिला रिसॉर्टमधून एकटीच निघून गेल्याचे सीसीटीव्ही आणि प्राथमिक चौकशीतून समोर आले असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. संदीप सलायम यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी कर्नाटकातील एका ज्येष्ठ मंत्र्याकडे वाहनचालक म्हणून काम केले होते.
त्याचबरोबर ते त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी हे काम सोडून माल्पे-उडुपी परिसरात आपला जलक्रीडा व्यवसाय सुरू केला होता. घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवला.
शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी व्हिसेरा नमुना रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असली, तरी हत्येसह सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.
गळ्यातील साेनसाखळी, पाकीट गायब
संदीप सलायम हे मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्रांसह पणजीतील एका कॅसिनोमध्ये गेले होते. तेथे त्यांची एका अज्ञात महिलेशी ओळख झाली. काही वेळानंतर ते तिच्यासोबत कळंगुटमधील रिसॉर्टवर गेले. दरम्यान, मित्रांना संदीप दिसेनासे झाल्याने त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मित्र रिसॉर्टवर परतले असता संदीप खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गळ्यातील साेनसाखळी, पाकीट गायब असल्याचेही आढळून अाले.
महिलेच्या शोधासाठी पोलिस कर्नाटकात
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून, संशयित महिलेच्या शोधार्थ पोलिस पथक कर्नाटकात रवाना झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पंचनाम्यावेळी पोलिसांना खोलीत सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या. मात्र, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.