

पणजी: अल्पवयीन मुलीसोबत तिच्या संमतीने किंवा संमतीशिवाय ठेवलेले शारीरिक संबंध हा कायद्यानुसार बलात्कारच मानला जातो. अशा प्रकरणात पीडितेची संमती होती की नव्हती, याला कायद्यात काहीही स्थान नाही.
असे स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत पणजी येथील विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादल्याप्रकरणी वास्को येथील मोहम्मद झुन्नू याला दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरी आणि ९५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
मूळचा सिवान (बिहार) येथील रहिवासी असलेला आणि सध्या न्यू वाडे-वास्को येथे राहणारा मोहम्मद झुन्नू याने मे २०२४ मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. या काळात त्याने पीडितेशी संबंध प्रस्थापित केले, ज्यातून ती गर्भवती राहिली आणि तिने एका अपत्याला जन्म दिला.
याप्रकरणी २२ ऑगस्ट २०२४ रोजी वास्को पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. सुनावणीदरम्यान पीडिता आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे होते आणि त्यामध्ये संमती असण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फटकारले की, अल्पवयीन मुलीसोबत तिच्या संमतीने किंवा संमतीशिवाय ठेवलेले शारीरिक संबंध हा कायद्यानुसार बलात्कारच मानला जातो. यात पीडितेची संमती होती की नव्हती, याला कायद्यात काहीही स्थान नाही.
भादंवि कलम ३७६ : १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम ४ : १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम ८ : ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड.
पॉक्सो कायदा कलम १२ : १ वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड.
आरोपीने २७ ऑगस्ट २०२४ ते १३ मार्च २०२५ या
काळात कोठडीत घालवलेला कालावधी शिक्षेतून वगळला आहे.
सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले. वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी आरोपीच त्या बाळाचा वडील असल्याचे डीएनए प्रोफाईलद्वारे सिद्ध केले. जन्म दाखल्यानुसार पीडितेचा जन्म २३ जुलै २००८ चा असल्याने घटनेवेळी ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.