पणजी : गोवा मुक्तीसाठी सर्वप्रथम कुंकळ्ळीच्या हुतात्म्यांनी 15 जुलैला जुलमी पोर्तुगिजांच्या विरोधात बंड करत उठाव केला. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय युद्ध स्मारक दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या दिवशी राज्याचे प्रतिनिधी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतील असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज जाहीर केले. त्यामुळे कुंकळ्ळीच्या उठावाला एकप्रकारे राष्ट्रीय सन्मान दिला गेला आहे.
35 व्या घटकराज्य दिनाचा सोहळा राजभवनवरील दरबार सभागृहात सोमवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई तर व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, माविन गुदिन्हो, रवी नाईक, निळकंठ हर्ळणकर, सुदिन ढवळीकर, सुभाष फळदेसाई उपस्थित होते.
समारंभात गेल्या 35 वर्षांत देदीप्यमान कामगिरीबद्दल दैनिक ‘गोमन्तक’चा विशेष सन्मान करण्यात आला. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. तसेच गोव्याच्या सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती आणि संस्था अशा एकूण 35 जणांचा राज्यपाल पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
35 व्यक्ती आणि मान्यवर संस्थांचा गौरव
घटक राज्यदिनानिमित्त 35 व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. फोमेंतो ग्रुप, साळगावकर ब्रदर्स, चौगुले ॲण्ड कंपनीच्या वतीने आदित्य चौगुले, एनआरबी ग्रुपच्या वतीने नीता नाईक, डी. बी. बांदोडकर ॲण्ड सन्सच्या वतीने गिरीराज वेंगुर्लेकर, एमआरएफच्या वतीने गौतम राज, वेदांता सेसाच्या वतीने सुजय शहा, रोटरी क्लब, सिप्ला लि.च्या वतीने संजय मिश्रा, लॉयला हायस्कूल मडगाव, सेंट जोसेफ हायस्कूल हडफडे, ज्ञानप्रसारक विद्यालय म्हापसा, इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा, कोकणी भाषा मंडळाच्या वतीने अन्वेषा सिंगबाळ, राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने उल्हास फळदेसाई, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने श्रीनिवास धेंपो, कृषी आणि अनुसंधान केंद्राच्या वतीने संचालक परवीन कुमार, फोर्ट आग्वाद रिसॉर्टच्या वतीने विल्सन, मणिपाल हॉस्पिटलच्या वतीने डॉ.सुरेंद्र प्रसाद आणि डॉ शेखर साळकर, झुआरी ॲग्रो केमिकल, गोवा मेडिकल कॉलेजच्या वतीने डॉ.शिवानंद बांदेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रतापसिंग राणे यांच्यासह 5 मुख्यमंत्र्यांचा सन्मान
यापूर्वीच्या 12 मुख्यमंत्र्यांपैकी 5 मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष हजर राहून आपला सन्मान स्वीकारला. यामध्ये प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत, लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा समावेश होता. तर चर्चिल आलेमाव यांच्यातर्फे त्याची मुलगी वालंका यांनी पुरस्कार घेतला. तर मरणोत्तर सन्मानामध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्यावतीने मुलगी ज्योती बांदेकर, शशिकलाताई काकोडकर यांच्या वतीने मुलगा समीर काकोडकर, लुईस प्रोतो बार्बोझा यांच्या वतीने मुलगा नोएल, डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांच्या वतीने मुलगी सुझान डिसोझा आणि मनोहर पर्रीकर यांच्या वतीने उत्पल पर्रीकर यांनी सन्मान स्वीकारला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.