

म्हापसा: ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत गोवा सरकारच्या वतीने शनिवारी (ता.३) म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरासमोरील प्रगती सभागृहात ‘सेवा सेतू संगम-सरकार तुमच्या दारी’ या विशेष उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रशासन थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे आणि गतिमान व पारदर्शक कारभार देणे हा आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह बार्देश तालुक्यातील महत्त्वाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये जलस्रोतमंत्री नीळकंठ हळर्णकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार मायकल लोबो आणि आमदार दिलायला लोबो यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली.
सकाळी १०.१५ ते दुपारी १२.४५ वा. या वेळेत मुख्यमंत्र्यांनी टोकन सिस्टीमच्या माध्यमातून सुमारे १५० ते २०० नागरिकांशी ‘वन-टू-वन’ भेट घेतली. पाणी बिल, रस्ते, गटारे, वीज, नगरपालिकेची कामे, उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयाशी संबंधित विषय तसेच ‘माझे घर’ योजनेतील म्युटेशन व प्रशासकीय कामकाजासंबंधी अडचणी लोकांकडून थेट जाणून घेण्यात आल्या.
याशिवाय स्थानिक पंचायतींचे सदस्य, विविध सामाजिक संघटना आणि ‘एनजीओ’च्या प्रतिनिधींनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिसरातील कामांबाबत चर्चा केली. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित विविध सरकारी खात्यांच्या प्रमुखांसोबत स्वतंत्र चर्चा केली. लोकांच्या अर्जांवर त्वरित कारवाई करण्याचे आणि समस्या जागेवरच निकाली काढण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
प्रशासकीय सेवा थेट जनतेपर्यंत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविले जात आहे. ‘गव्हर्नमेंट ॲट युवर डोअरस्टेप’ संकल्पनेतून प्रशासकीय सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. साखळीनंतर बार्देश तालुक्यातील हा पहिला उपक्रम असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सरकारने आवाज दाबल्याचा आरोप
‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात ‘टुगेदर फॉर म्हापसा’च्या पदाधिकाऱ्यांकडील मागण्यांची पत्रके पोलिसांनी हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट व टोकन नाकारल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आलो असताना प्रशासनाने आवाज दाबल्याचा आरोप विजय भिके व जितेश कामत यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.