Goa News: नेते आम्हाला विसरले! 'खरी कुजबूज'

Goa News: नेत्यांचे फलक चौकाचौकांत लागले; पण प्रत्यक्ष शुभेच्छा मतदारांपर्यंत कुठे पोचल्या?
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: जुने गोवे येथील गांधी सर्कलवर तृणमूल कॉंग्रेसचे समील वळवईकर, भाजपचे सुभाष फळदेसाई, सिद्धेश नाईक आदी नेत्यांचे दिवाळीनिमित्त शुभेच्छा फलक झळकले असून त्यात माजी आमदार पांडुरंग मडकईकरांचा वाढदिनानिमित्तचा फलकही लागलेला आहे. एकूणच या फलकांच्या गर्दीमुळे या सर्कलच्या सौंदर्याला बाधा येत आहे. ते काहीही असो, मतदारांचे दुखणे वेगळेच आहे.

नेत्यांचे फलक चौकाचौकांत लागले; पण प्रत्यक्ष शुभेच्छा मतदारांपर्यंत कुठे पोचल्या? यंदा अनेकांच्या भेटवस्तूही मिळाल्या नाहीत. त्यामुळे मतदार म्हणतात, ‘ नेते आम्हाला विसरले!’ कदाचित लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुन्हा नेते आमच्याकडे येतील, तेव्हा दिवाळी भेटीचा नक्कीच विचार होईल, असे मतदार खासगी चर्चेत बोलत आहेत.

Goa News
Goa Diwali Festival 2022: गोवा अन् नरकासुर! 'खरी कुजबूज'

गोव्याचे जय शहा!

प्रत्येकाच्या नशिबात राजयोग नसतो. मात्र, ज्याच्या नशिबात असतो त्याने ज्याला हात लावला, त्याचे सोने होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव म्हणजे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्वेसर्वा. बीसीसीआयचे अध्यक्ष कोणीही होवो, पण जयभाईंचा बीसीसीआयवर दबदबा कायम राहाणार, हे नक्की.

कारण भारतीय टीम पाकिस्तानात खेळणार की नाही, हे पंतप्रधान नव्हे, तर जयभाईच ठरवितात. आपल्या गोवा क्रिकेट संघटनेलाही जय शहा यांच्यासारखे तरुण रोहनभाई लाभले आहेत. जीसीएचे सचिव म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आपल्या गोव्याच्या जयभाईंचे सरकार दरबारी मोठे वजन आहे.

खुद्द राज्याच्या ‘बिग बॉस’ची छत्रछायाही रोहनभाईंवर आहे. म्हणून तर फडके व चेतन गटाला रोहनभाईंविरुद्ध उमेदवार उभे करण्याचे धाडस झाले नाही. बीसीसीआयचे सुपर बॉस जय, तर जीसीएचे बॉस रोहनभाई. गोव्याच्या क्रिकेटला आता ‘अच्छे दिन’ येणार म्हणायचे तर!

Goa News
Goa News: पर्यटन व्यावसायिक संकटात; पर्यटक इतर राज्यांकडे वळण्याची भीती!

कशासाठी, बक्षिसासाठी!

राज्याचे कृषिमंत्री सध्या खूष आहेत. कारण काय माहीत आहे, चार दिवसांपूर्वी मडगावात कृषी उद्योगासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती आणि या कार्यशाळेला प्रशिक्षणार्थींनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढील काळात गोव्यात कृषी उद्योजक आणि बागायतदार बनण्यासाठी आताची पिढी अनुकूल असल्याचे उदगार रवी नाईक यांनी काढले.

नाईक यांच्याकडे कृषी खाते असल्यामुळे राज्याचे कृषिधन वाढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्यानुसार कृषी खात्यालाही कामाला लावले आहे. दोन महिन्यांपूर्वी नाईक यांनी फोंड्यात सर्व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली होती आणि चांगले काम करणाऱ्या कृषी खात्याच्या कार्यालयाला चक्क 75 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. त्यामुळे एरवी सोडाच, निदान बक्षीस मिळवण्यासाठी तरी हे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी काम करतील, अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही.

गोवा डेअरी पुन्हा चर्चेत

गेली काही वर्षे ‘गोवा डेअरी’ येनकेन प्रकारेण चर्चेत राहिली आहे. कधी भोंगळ कारभार, तर कधी अकार्यक्षम व्यवस्थापन वगैरे, वगैरे. पण यावेळी ती चर्चेत राहण्यास वेगळेच कारण मिळाले आहे. या डेअरीला दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतूनच चालतो.

Goa News
Goa Government: आत्मनिर्भर शेतकऱ्यांचे लक्ष्य; कंपन्या स्थापणार- प्रमोद सावंत

त्यातच बैलपोळा म्हणजे दिवाळीतील पाडवा सण तोंडावर आला, तरी डेअरी व्यवस्थापनाने दूध उत्पादकांचे पैसे अदा न केल्यामुळे त्यांनी दिवाळी साजरी कशी करावी, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. डेअरीशी संलग्न असलेल्या 176 सोसायट्यांना पैसे अदा न केल्याने त्यांना दूध उत्पादकांना पैसे देता आले नाहीत.

विशेष म्हणजे, सध्या गोवा डेअरीवर दूध उत्पादकांचे हित साधणारे मंडळ कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. तर मग दूध उत्पादकांचे हाल का व्हावेत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सेवावाढीसाठी धावपळ

बंदर कप्तान खात्याच्या कॅप्टनचा सेवानिवृत्तीचा काळ काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. हे पद रिक्त होणार असल्याने या कार्यालयातील मरिन सर्व्हेअर आणि या डेप्युटी कॅप्टन हे दोघेही या शर्यतीत आहेत. परंतु सध्या या दोघांचेही लगाम खेचण्यास सुरुवात झाली आहे, अशी चर्चा खात्यात सुरू आहे.

Goa News
Goa Panchayat: आता पंचायत क्षेत्रातही होणार रस्ते सुरक्षा मंडळ

कारण सध्याचे जे कॅप्टन आहेत, त्यांनी आपल्याला आणखी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून मिळावा, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरल्याची माहिती मिळाली आहे. बंदर कप्तान खात्यांतर्गत कॅसिनो, फेरीबोट, प्रवासी जल वाहतूक सेवा येतात. त्यामुळे हे पद अधिक वजनदार मानले जाते.

सहा महिन्यांची वाढीव सेवा मागताना आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर कार्यालयातील कामकाज व्यवस्थित चालणार नाही, असेही भासविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात स्वतःचे इप्सित साध्य करून घेण्यात ते यशस्वी होतील का, हे काही दिवसांत कळेलच. ∙∙∙

नरकासुरांमागे कोण?

दिवाळीच्या पूर्वसंध्येला राजधानी पणजीत गल्लोगल्ली उभारण्यात येणाऱ्या नरकासुरांचे प्रस्थ यावर्षीही कायम राहिले. हे सांगण्याचे कारण म्हणजे, यावर्षी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नरकासुर प्रतिमा उभारण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याची माहिती खुद्द वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली होती.

Goa News
Goa First: गोवा शिपयार्डची 'ती' भिंत हटवणे आवश्यक

खरे तर ढवळीकर हेही नरकासुर दहन प्रथेच्या विरोधात आजही ठाम आहेत. त्यामुळे यंदा नरकासुरांची संख्या घटणार, नरकासुर तयार करणारी मंडळी नाराज होणार, अशी वदंता होती. तरीही यंदा राजधानी पणजीत नरकासुर त्याच जोमाने उभे राहिले.

त्यांची संख्या अजिबात घटली नाही. जर यावेळी बाबूश यांनी नरकासुर प्रतिमा उभारण्यासाठी मदत पुरवण्यास आखडता हात घेतला असेल, तर मग इतके नरकासुर उभे कसे राहिले? की आणखी कोणती शक्ती त्यांच्या मागे उभी आहे? असे अनेक प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत.

विजय भिकेंचा जयघोष!

फुटीर आमदारांसह भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी युनायटेड पॉलिटिकल पार्टीच्या नावाखाली विविध राजकीय नेत्यांनी एकत्रित येत म्हापशात ‘आमदारचोरासुर’ या प्रतिकात्मक प्रतिमेचे रविवारी दहन केले. यावेळी भाषण करणारा प्रत्येकजण या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विजय भिके यांचे नाव घेत होता.

Goa News
Goa Diwali 2022: राज्यभरात दीपावलीच्या तेजाळल्या दाही दिशा!

भिके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणून लोकांचा आवाज पोहचविण्याचे स्तुत्य काम केले खरे. मात्र, प्रत्येक वक्ता भिके यांचे नाव घेत असल्याने एक प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे, हा कार्यक्रम भिके यांचा आहे, आम्ही फक्त उपस्थिती लावली, असेच सर्वांना सांगायचे तर नव्हते ना?

उद्या, सरकारने या कार्यक्रमाच्या आयोजकांना लक्ष्य करायचे ठरविल्यास भिके यांच्याच गळ्याभोवती फास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचा यात सहभाग नव्हता, असे सांगत सरकारच्या धास्तीमुळेच की काय, सर्वजण भाषण सुरू करण्यापूर्वी भिके यांचे नाव घेत होते, ते कदाचित या कारणामुळेच. ∙∙∙

सणासुदीत समित्यांची निवड

पंचायत संचालनालयाने दिवाळीच्या आदल्या दिवशीच पंचायतींमध्ये जैवविविधता समित्यांची निवड करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्याची सक्ती एका आदेशाद्वारे केली. हा आदेश सहन न झाल्यामुळे काही पंचायतींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नरकासुर प्रवृत्ती संचारली.

Goa News
'PM Rojgar Mela' नियुक्तीवरुन अमित पाटकर यांनी सरकारवर साधला निशाणा

त्यामुळे समितीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात झाली नाही. त्याला जबाबदार पंचायत संचालनालय असल्याची टिप्पणी काहीजणांनी केली. दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासुर प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी शस्त्रास्त्रे जमवायच्या दिवशी ही ग्रामसभा आयोजित केल्याने तीव्र पडसाद उमटत होते.

तरीही काहीजणांनी नरकासुर दहनाचा विषय बाजूला ठेवून जैवविविधतेला पहिला मान दिला, हे त्यांचे मोठेपण म्हणायला हवे. नशीब पंचायत संचालनालयाने दीपावलीदिवशीच विशेष ग्रामसभा बोलाविण्याची सक्ती केली नाही, हे संचालनालयाचे मोठेपण म्हणायला हवे, अशीही चर्चा सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com