Goa Diwali Festival 2022: नरकासुर आणि गोव्याचा काहीतरी संबंध असलाच पाहिजे. नाही तर इतर राज्यांपेक्षा नरकासुराचे फॅड गोव्यातच अधिक का, असा प्रश्न लोकांना पडला आहे. भीम आणि जरासंधाचे युद्ध ज्या कुस्तीच्या आखाड्यात झाले होते, त्या गोव्यातील स्थानाला ‘आखाडा’ असे आजही म्हणतात.
माशेलपासून काही अंतरावर वसलेल्या या गावात आणखी काही महाभारतकालीन खुणा आहेत. मग जरासंध जर गोव्याचा, तर नरकासुर का असू नये? या नरकासुराच्या राजधानीचे महाभारतातील वर्णन पाहिल्यास त्याची राजधानी निसर्गरम्य समुद्राकाठचे ठिकाण, असा उल्लेख आढळतो. त्यामुळे नरकासुराची राजधानी बहुधा गोव्यात असावी. पण ज्या ठिकाणी त्याने 16 हजार 100 स्त्रिया लपवून ठेवल्या होत्या, ते ठिकाण पूर्वांचलात होते, असेही जाणकार सांगतात.
नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने दोन तुकडे करून नरकासुराला ठार केले, तेव्हा नरकासुराच्या आईने दु:ख व्यक्त न करता नरकासुराचे मरण आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचे वचन श्रीकृष्णाकडून घेतले आणि हा उत्सव सुरू झाला. देवाला दिलेले वचन मोडण्यात पटाईत असले तरी गोव्यातील लोक नरकासुराच्या मातेला दिलेले वचन मात्र तंतोतंत पाळतात, हे खरे!
नरकासुराचे राजकारण
दिवाळीच्या तोंडावर राज्यात नरकासुर प्रतिमांवरून राजकारण रंगत असून त्यात विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतच जुंपलेली दिसून येत आहे. एकीकडे दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दुष्ट प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणायचे आणि दुसरीकडे नरकासुर प्रतिमा स्पर्धांसाठी लाखोंची रक्कम पुरस्कृत करायची, ही दुटप्पी राजनीती गोव्यात गेली अनेक वर्षे परंपराच बनली होती.
आता इतक्यात लवकरच कुठली निवडणूक नसल्याने या परंपरेला ब्रेक लागतो की काय, ते येणारा काळच दाखवून देईल. मात्र, त्यातूनही काहीजणांनी राजकारणाची हौस भागवून घेतली, हे मात्र खरे.
नवा डाव, नवा गडी
असे म्हणतात की, राजकारणात कोणीच सदा सर्वकाळ कोणाचा मित्र वा शत्रू असत नाही. दोन दिवसांपूर्वी वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी काणकोणात घेतलेली बैठक आणि त्यावेळी सभापती रमेश तवडकर यांची असलेली उपस्थिती तेच दर्शवून गेली. कारण 2012 सालच्या कालखंडात उभय नेते पर्रीकर मंत्रिमंडळात होते; पण त्यांचे अजिबात पटत नव्हते.
काणकोणमधील रमेश तवडकरांचे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक प्रस्ताव सुदिन ढवळीकरांनी रोखून धरल्याचे आरोप त्यावेळी झाले होते. खरे-खोटे कोणास माहीत; पण नंतरच्या काळात अनेक घडामोडी घडल्या, पुलाखालून बरेच पाणी गेले. पण 2022 नंतर नवेच राजकारण सुरू झाल्याने असेल उभय नेते झाले गेले विसरून नव्याने एकत्र आले असावेत, अशी चर्चा त्या बैठकीवेळी मागील बाकावर सुरू होती.
अध्यक्ष बदलला, पुढे काय?
तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरील चेहरा बदलला गेला. मल्लिकार्जुन खर्गे हा तसा कॉंग्रेसचा निष्ठावंत चेहरा. राजकीय अनुभव, मुत्सद्दीपणा या सर्व निकषांवर त्यांचेच पारडे जड राहिल्याने ते या निवडणुकीत जिंकले. तरीही त्यांचे सध्याचे वयोमान (80) पाहता तरुण नेत्याला म्हणजेच शशी थरूर यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवायला हवा होता, असा एक विचारप्रवाह सध्या दिसून येत आहे.
कारण नव्या पिढीला नेहमी उमदे, बाणेदार व्यक्तिमत्त्व हवेच असते. थरूर हे स्वतंत्र विचाराचे आणि स्वतंत्र बाण्याचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी यापूर्वी अनेकदा राजकीय विरोधक असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही चांगल्या धोरणांचा उदो उदो केला होता.
त्यामुळेच त्यांची गच्छंती झाली असावी, असा तर्क व्यक्त केला जात आहे. जरी खर्गे हे निर्विवादपणे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले असले, तरी त्यांचे रिमोट कंट्रोल गांधी घराण्याकडे असेल, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलला, तरी पुढे काय होणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
आमदार कंदील बनवण्यात मग्न
गोव्यात धार्मिक सलोखा जीवापाड जपला जातो. यात बाधा आणली जात नाही. म्हणूनच की काय, रविवारी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या चक्क आकाश कंदील बनविण्याच्या कामात दंग होत्या. ताळगावातील वसंत विहार संकुलासमोरच्या रस्त्यावर हे आकाश कंदील लावण्यात आले आहेत.
पंचायतीच्या कार्यालयात हे कंदील बनविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी आमदार जेनिफर आणि काही पंचसदस्य तेथे आले आणि त्यांनी आकाश कंदील बनविण्याच्या कामात सहभागी होत हातभार लावला. त्याची छायाचित्रे आमदार जेनिफर यांनी समाजमाध्यमावर अपलोड केली आहेत. मोन्सेरात यांच्यासह पंचसदस्य रेघा पै यांनीही या सेवेत हातभार लावला.
‘वड्याचे तेल वांग्यावर’
काणकोणात जलस्रोत खात्याचे दोन विभाग असून या दोन विभागांत मिळून 42 कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत या 42 कर्मचाऱ्यांनी काणकोण तालुक्याला काय दिले, तर काही लाखांची विकासकामे, असे भर बैठकीत सांगून सभापती रमेश तवडकर यांनी या खात्याची लक्तरेच वेशीवर टांगली. मात्र, ‘व्हिजन काणकोण 2030’ हे स्वप्न साकारण्याचा संकल्प केल्यापासून प्रत्येक खात्याचा लेखाजोखा त्यांनी मांडण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, मुख्य सचिव, संबंधित खात्याचे अधिकारी यांना, तुमच्या विकासकामांच्या नकाशात काणकोण तालुका नाही काय, असे परखडपणे विचारण्यासही ते विसरले नाहीत. पण गेल्या पाच वर्षांत काणकोणच्या वाट्याला काही लाखांच्या पलीकडे विकासकामे आली नाहीत, याचे खापर ते लोकप्रतिनिधींवर फोडतात, की खात्याच्या अधिकाऱ्यांवर, ते कळण्यास मार्ग नाही. ‘वड्याचे तेल वांग्यावर’ असा तर हा प्रकार नाही ना, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
फुसका बार...
‘तुम्ही मारल्यासारखे करा, मी रडल्यासारखे करतो’ अशाच प्रकारची लुटुपुटुची लढाई कुंकळ्ळी नगरपालिकेत चालली आहे का? असा संशय आता जनतेला येऊ लागला आहे. कारण कुंकळ्ळी पालिकेतील भाजप समर्थक नगरसेवकांनी लक्ष्मण नाईक यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावाला कायदेशीर आधार नसल्याचा दावा काँग्रेस समर्थक करतात.
अविश्वास ठरावावर सदस्य संख्येच्या अर्ध्याहून अधिक नगरसेवकांनी सही करणे सक्तीचे आहे. भाजप समर्थकांनी दिलेल्या ठरावावर केवळ सातच सह्या आहेत. याचा अर्थ नगरविकास खाते त्या अविश्वास ठरावाच्या नोटीसीला केराची टोपली दाखविणार. भाजपने हा बनाव लक्ष्मण नाईक यांनी घाबरून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी केला आहे का, असा प्रश्न आता कुंकळ्ळीकरांना पडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.