Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Cabinet Reshuffle: सभापती रमेश तवडकर व आमदार दिगंबर कामत यांना उद्या गुरुवारी दुपारी १२ वाजता राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू पद व गोपनीयतेची शपथ देतील.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सभापती रमेश तवडकर व आमदार दिगंबर कामत यांना उद्या गुरुवारी दुपारी १२ वाजता राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू पद व गोपनीयतेची शपथ देतील. त्यांची मंत्रिपदी नियुक्ती करावी अशी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्या सकाळी राज्यपालांना औपचारिकपणे केली जाईल. गणेश चतुर्थीच्‍या तोंडावर या दोघांना ‘बाप्‍पा’ पावला असेच म्‍हणावे लागेल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातील बदलाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या सदिच्छा भेटीवेळी राज्यातील विकासकामांचा आढावाही पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांनी सादर केला. वस्तू व सेवा कर मंत्रिगटाच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्लीत होते. मध्यरात्री ते गोव्यात परतले.

राजभवनाच्या नव्या दरबार सभागृहात उद्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मडगाव आणि काणकोणमधून दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्‍येने येतील असे गृहीत धरून राजभवनावर सुरक्षा व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने तातडीने मुख्य सचिवांच्या नावे समारंभाची निमंत्रणे छापून त्यांचे वाटप आज मंगळवारी दुपारनंतर हाती घेतले होते.

Goa Politics
Goa News: गोवा हिंदू युवा शक्ती तर्फे सार्वजनिकांना वाजवी दरात फळे व फुले उपलब्ध; वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

वर्षभर या-ना त्या कारणाने हा मंत्रिमंडळ फेरबदल पुढे ढकलला जात होता. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून १८ जून रोजी डच्चू दिल्यानंतर रिक्त झालेल्या आणि आता कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अशा दोन जागांवर रमेश तवडकर व दिगंबर कामत या दोघांचा मंत्री म्हणून समावेश होणार आहे. त्‍यामुळे अन्य दावेदार आमदार संकल्प आमोणकर व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश पुन्हा लांबणीवर पडल्यातच जमा आहे.

आदिवासी कल्याण खाते कोणाकडे?

रमेश तवडकर हे पूर्वी आदिवासी कल्याणमंत्री होते. त्यांच्याच काळात आदिवासी कल्याण खात्यात नव्याने योजना लागू करण्यात आल्या. त्यानंतर गोविंद गावडे हे मंत्री झाले. त्यानंतरच्या टप्प्यात गावडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तरी आदिवासी कल्याण खाते त्यांना मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांनी ते आपल्याकडेच ठेवले. आता तवडकर यांना मुख्यमंत्री ते खाते देतील का, याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज सकाळी फोन आला व त्यांनी माझ्‍या मंत्रिमंडळ समावेशाबाबत संकेत दिले. आजच शपथविधी होणार असेही त्‍यांनी आपणास सांगितले. पण आपण त्‍यांना शपथविधी उद्या गुरुवारी करण्याची विनंती केली. अधिकृत अजून काही कळविण्‍यात आले नसले तरी शपथविधीपूर्वी पत्र दिले जाईल. - दिगंबर कामत, आमदार (मडगाव)

तवडकरांना हवीत महत्त्‍वाची खाती

रमेश तवडकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली तेव्हा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. त्यावेळी तवडकर यांनी पक्षादेश म्हणून मंत्रिपद स्वीकारावे असा विषय चर्चेला आला. तशी गळ घालण्यात आली तेव्हा आपली ज्येष्ठता, सध्याचे पद लक्षात घेऊन खाती दिली जावीत, अशी अपेक्षा तवडकर यांनी व्यक्त केली.

सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे रमेश तवडकर यांच्या जागी सभापती होऊ शकतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले की, पक्ष देईल ती जबाबदारी स्‍वीकारायला आपण तयार आहे. पक्षाचा मी निष्‍ठावंत सेवक आहे.

Goa Politics
Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

मडगाव, काणकोणातून येणार शेकडो कार्यकर्ते

दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळणार, या वृत्ताने त्‍यांचे कार्यकर्ते सुखावले आहेत. त्‍यामुळेच उद्या गुरुवारी होणाऱ्या कामत यांच्‍या शपथविधी सोहळ्‍याला मडगावातून किमान ३०० तर काणकोणातूनही तेवढेच कार्यकर्ते येणार असल्‍याची माहिती मिळाली. मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, कामत यांचे कार्यकर्ते खूष झाले आहेत. किमान ३०० कार्यकर्ते शपथविधी सोहळ्‍याला जाणार असून त्‍यासाठी आम्‍ही सर्व तयारी केलेली आहे.

मुख्‍यमंत्र्यांवर समजूत काढण्‍याची वेळ

मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा मंत्रिमंडळ समावेश आता लांबणीवर पडला आहे. लोबो यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर त्यांचा किंवा त्यांच्या पत्नी तथा शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचा मंत्रिमंडळातील समावेश नक्की मानला जात होता.

आमोणकर यांच्या वाढदिवस सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘संकल्‍प आमोणकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील मनीषा लवकरच पूर्ण होईल’ असे सांगत त्‍यांच्‍या मंत्रिमंडळ समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे त्यांचाही समावेश नक्की मानला जात होता. आता त्‍यांची समजूत काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे.

सभापती रमेश तवडकर आज देणार राजीनामा

सभापती रमेश तवडकर हे उद्या गुरुवारी (ता. २०) सकाळी १० वाजता आपला राजीनामा उपसभापती ज्‍योशुआ डिसोझा यांच्याकडे सुपूर्द करतील. त्यांनी तो राजीनामा स्वीकारल्यानंतर तवडकर सभापतिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होतील. त्यानंतरच ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सभापती हे घटनात्मक पद असल्याने ते रिक्त झाल्याचा आदेश जारी करण्याची प्रक्रिया मंत्रिपदाची शपथ दुपारी १२ वाजता देईपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

आलेक्स सिक्वेरांचा मंत्रिपदाचा राजीनामा

मंत्रिमंडळ फेरबदल सोयीचा व्हावा यासाठी कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज दुपारी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्‍यांनी राजीनामापत्रात म्हटले असले तरी मुख्यमंत्र्यांकडून त्यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आल्‍याचे समजते.

त्यांचा राजीनामा स्‍वीकारून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. दिल्लीत उपचार घेऊन परतलेले आणि १५ ऑगस्टच्या मडगावातील जाहीर कार्यक्रमातही सहभागी होऊ न शकलेले सिक्वेरा यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे मात्र म्हटलेले नाही.

मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सिक्‍वेरा यांनी म्हटले आहे, ‘‘मी कायदा व न्याय खात्याचा मंत्री या पदाचा राजीनामा सादर करत आहे. वैयक्तिक कारणास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आपल्या नेतृत्वाखाली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझ्याकडे सोपविण्यात आलेल्या कायदा व न्याय, पर्यावरण, बंदर विभाग तसेच विधानमंडळ व्यवहार या खात्यांना मी पूर्ण क्षमतेने न्याय देण्‍याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com