
पणजी: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या एका अहवालातून बार्देशमधील सायपे (कांदोळी) आणि कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत परिसरातील भूजल प्रदूषणाची गंभीर स्थिती समोर आली आहे. या दोन्ही भागांमधील भूजल नमुन्यांमध्ये लोह आणि मँगनीज या धातूंचे प्रमाण पिण्याच्या पाण्यात परवानगी मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे.
विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात या विषयावर चर्चा झाल्यानंतर सरकारने भूजल गुणवत्ता तपासणीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंडळाने तपासणी केली आहे. हा अहवाल पर्यावरण खात्याने विधानसभेच्या आश्वासन समितीला सादर केला आहे. त्यात भूजल प्रदूषणाच्या या समस्येकडे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष वेधले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मंडळाने असा निष्कर्ष काढला आहे की, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत परिसरातील भूजलात लोह आणि मँगनीज मोठ्या प्रमाणात आढळतात. तथापि, अनेक वर्षांच्या अहवालांवरून इतर जड धातूंच्या पातळीत घट होत असल्याचे दिसून येते, जे अतिरिक्त
प्रदूषणाचा धोका कमी करत असल्याचे सूचित करते. याव्यतिरिक्त, ‘निरी’ संस्थेच्या अभ्यासानुसार, कुंकळ्ळी येथील कॅप्टिव्ह सेक्युर्ड लँडफिल फॅसिलिटी सुरक्षित आणि संरक्षित असल्याचे निष्कर्ष काढले आहेत.
१ जानेवारी २०२३ मध्ये पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील मे. बर्गर बेकर कोटिंग प्रा. लि. येथे लागलेल्या मोठ्या आगीनंतर सायपे गावातील भूजल गुणवत्तेचा अभ्यास सुरू केला होता.
२ या कंपनीच्या उत्पादनांमध्ये कॅडमियम, क्रोमियम आणि शिसे यांसारखे जड धातू दुय्यम घटक म्हणून वापरले जातात.
३ मंडळाने सायपे गावातील विहिरी आणि तलावातील एकूण १२३ भूजल नमुने तपासले.
४ यापैकी लोह २८.४ टक्के (३५ नमुन्यांमध्ये) आणि मँगनीज १९.५ टक्के (२४ नमुन्यांमध्ये) परवानगी मर्यादेपेक्षा जास्त आढळले.
५ मंडळाने स्पष्ट केले आहे की, लोह आणि मँगनीजचे प्रमाण वाढण्याचे कारण केवळ आगीतील रंगाचे घटक नसून गोव्यातील लॅटेराईट मातीमुळे हे धातू नैसर्गिकरित्या भूजलात जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. ६. तांबे, कॅडमियम, निकेल, क्रोमियम आणि शिसे यांसारख्या इतर धातूंचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी नमुन्यांमध्ये जास्त आढळले आणि या ठिकाणी वारंवारता दिसून आली नाही.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत परिसरातील भूजल गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला. मंडळाने एकूण ३६५ भूजल नमुने तपासले. एकूण नमुन्यांपैकी मँगनीज ३८ टक्के नमुन्यांमध्ये (१३८ नमुने) आणि लोह ११ टक्के नमुन्यांमध्ये (४० नमुने) परवानगी मर्यादेचे उल्लंघन करताना आढळले. निकेल ९ टक्के नमुन्यांमध्ये (३३ नमुने), शिसे ४ टक्के नमुन्यांमध्ये (१५ नमुने) आढळले आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, लोह आणि मँगनीज वगळता इतर जड धातूंच्या उल्लंघनाची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र-बाळ्ळीच्या आकडेवारीनुसार श्वसनविकार, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार व सोरायसिस यांचे रुग्ण चिंताजनक प्रमाणात वाढले आहेत. शासनाची निष्क्रियता ही भ्रष्टाचार व बेपर्वाईचे द्योतक आहे. या अपप्रवृत्तीविरोधात आम्ही लढा देणार असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या उद्योग व शासनाला जबाबदार धरण्याचा आमचा निर्धार आहे.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.
कुंकळ्ळीतील भूजल प्रदूषित झाल्याचे वीस वर्षांपूर्वीच सिद्ध झाले होते. उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्यावेळी सर्व लोकांना नळातून पाणीपुरवठा करावा आणि सर्व विहिरी तसेच इतर जलस्त्रोतांच्या साठ्याची तपासणी करण्याचा आदेश २००६ साली दिला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विहिरीच्या पाण्याचा वापर करणारे प्रदूषित पाण्यामुळे आजारी पडत आहेत.
ऑस्कर मार्टिन्स, प्रदूषणविरोधी कार्यकर्ते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.