

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुठल्याही गोष्टीत लक्ष घातले की ती गोष्ट धसास जाईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. कुंकळ्ळी येथील एनआयटीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही आणि या आस्थापनातील बडे अधिकारी आपलीच माणसे तिथे आणून भरती करत असल्याची गोष्ट फळदेसाई यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी हा प्रश्न धसास लावण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्थानिकांवर होणाऱ्या या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापुढे मांडला आणि मुख्यमंत्र्यांनीही हा विषय केंद्रापर्यंत नेला. आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कुंकळ्ळी एनआयटीमधील नोकरभरती स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सुभाष फळदेसाई यांच्यामुळे कुणालाही न जुमानणाऱ्या एनआयटीलाही जबर चाप बसला. नाही का? ‘ब्राव्हो सुभाष!’ ∙∙∙
गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी काँग्रेसच्या एकंदर कार्यपद्धतीवर व वेळकाढू धोरणावर नाराजी व्यक्त करणारे उघड भाष्य केले. तसेच गोवा (Goa) फॉरवर्डचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यासाठी गिरीश चोडणकर यांच्यासोबत बेळगाव व मुंबई येथे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली होती, याचाही त्यांनी गौप्यस्फोट केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भविष्यात गोवा फॉरवर्डसोबत भाजपची युती होऊ शकते, असे संकेत दिले. या वक्तव्यानंतर ‘ज्युडास’ प्रकरणावरून वादग्रस्त ठरलेल्या काँग्रेसच्याच एका नेत्याने आपल्या वडिलांमार्फत दामू नाईक यांच्याकडे संपर्क साधून हा बॉम्ब टाकल्याची कुजबूज आज काँग्रेस भवनात सुरू होती. मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या नेत्याचा विजय सरदेसाईंना अपशकून करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे काही काँग्रेसजनांना वाटत आहे. त्यामुळे आता पाहूया, गोवा फॉरवर्डवाले यावर काय म्हणतात ते... ∙∙∙
‘दिल का हाल सुने दिलवाला’ हे दोन अंकी हिंदी नाटक मुंबईत सुरू आहे. मुळात एका अमेरिकन लेखिकेचे हे अलीकडचे नाटक. पात्रांचे, कथांचे भारतीयीकरण व संहितेचे रूपांतर कसे करावे, सादरीकरणातील क्षणोक्षणी प्रेक्षकांना कसे भारून टाकावे, यासाठी हे नाटक पाहणे गरजेचे आहे. संगीतही अप्रतिम आणि लाइव्ह आहे. ‘याला नाटक म्हणतात राजा,’ असे वर्णन नाट्यसमीक्षकांनी केले आहे. ‘आम्हाला सगळंच कळतं,’ असा गाजावाजा करून काही रंगकर्मी छाताड फुगवून थापा मारत फिरत असतात. त्यांच्या अपरिपक्वतेची आणि अज्ञानाची दया येते. अद्ययावत नाट्यभान असायला हवे. नाट्यजगतात काय घडते, कोणत्या प्रकारच्या नवकल्पना आणि प्रातिभ सृजनशक्तीच्या बळावर नवे तंत्र वापरले जाते, मंचनाचे आविष्कार आणि चमत्कार कसे घडवले जातात, हे डोळे उघडे ठेवून अनुभवायला हवे. कोकणी नाटककारांनी अशी नाटके गोव्याच्या मातीच्या रूपबंधात आणून रंगमंचाची उंची वाढवली पाहिजे. चोरीच्या सवयीला मुरड घालून (!) मूळ नाटक कुणी लिहिले आहे, हे जाहीरपणे नमूद करून नैतिकतेचे भान जपले पाहिजे, नाही का! ∙∙∙
निवडणुका जवळ आल्या की विरोधकही पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवतात. त्यामुळे नव्याने समोर येणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी राजकीय मैदानातील नव्या आव्हानांकडे मिश्कीलपणे पाहिले आहे. मतदारांचा कौल मिळवण्यासाठी पाच वर्षे जनतेत राहण्याऐवजी काही जण निवडणुकीच्या तोंडावरच अवतरतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावत, "स्वागत आहे, पण जनतेची परीक्षा नव्हे तर उमेदवारांचीच खरी परीक्षा होणार आहे," असा चिमटाही काढला. त्यांचे हे बोल कोणासाठी यावरून डिचोलीत चर्चा मात्र रंगली आहे. ∙∙∙
म्हापसा येथे पोलिसांनी सॅम्युएल ब्रागांझा या २० वर्षीय विद्यार्थ्याला रात्री १० वाजेपर्यंत पोलिस स्थानकात बसवून ठेवत त्याचा मानसिक छळ केल्यामुळे नागरिकांशी पोलिसांची वर्तणूक हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस खात्याची ‘छी-थू’ झाली. याच पार्श्वभूमीवर, आपले एक घरगुती प्रकरण घेऊन मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात आलेल्या चार जणांना रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले, असा ठपका ठेवत एका पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीनुसार आता पोलिस वागू लागले आहेत. एका घटनेमुळे जर पोलिस असे ठिकाणावर येत असतील, तर तेही नसे थोडके... ∙∙∙
राज्यातील हजारो नागरिकांना आजही स्वतःच्या घराचा आधार नाही. ज्या छताखाली आपण सुखाने ‘माझे घर’ म्हणून झोपू इच्छितो, ती संधी अनेकांना मिळत नाही. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरू केलेल्या ‘माझे घर’ योजनेद्वारे अनेक नागरिकांना त्यांच्या घरांच्या सनदा देण्यात येत आहेत. पणजी येथे घरांच्या सनदांचे वितरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. सरकारनेही हा सोहळा भव्य स्वरूपात आयोजित केला होता. सनदा स्वीकारण्यासाठी आलेल्या आबालवृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहिले की ‘माझे घर’ योजनेचे महत्त्व सहज लक्षात येत होते. मुख्यमंत्र्यांनाही सनदांचे वाटप करताना जे समाधान लाभले आणि उपस्थित आबालवृद्ध नागरिकांनी दिलेले आशीर्वाद, त्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. सरकारने नागरिकांना घराचे कायदेशीर हक्क दिल्याचे समाधान आणि नागरिकांना आपल्या नावावर अधिकृत घर मिळाल्याचा आनंद, या कार्यक्रमात स्पष्टपणे दिसून आला. ∙∙∙
कला अकादमीच्या दुरुस्ती कामात आयआयटी मद्रास समितीने १८ प्रमुख त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यात प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था, साधनसुविधा आणि इतर अनेक उणिवांचा समावेश आहे. या दुरुस्तीच्या दुरुस्तीचे काम १ ऑगस्टपासून सुरू होणार असून, प्रथम मुख्य सभागृहावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेल्या निधीपैकी ८० टक्के खर्च मांडवीत गेला, अशी चर्चा आहे. ‘आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो’ अशीच ही स्थिती. कुणाला काय हो त्याचे? ‘दहा जणांच्या आईसाठी मेल्यावर रडतो कोण?’ ही कोकणी म्हण येथे सार्थ ठरते. दरम्यान, मराठी आणि कोकणी नाट्यस्पर्धांच्या बक्षीस वितरणासाठी ‘आळशी बसपाक शिमरें शिंकलें’ या कोकणी म्हणीप्रमाणे सभागृहाचे निमित्त आयतेच मिळणार आहे. मात्र खुल्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. दुरुस्तीच्या दुरुस्तीची पुन्हा दुरुस्ती करावी लागणार नाही ना? सांग ना भोलानाथ! ∙∙∙
मुख्यमंत्र्यांनी एक राजकीय कोडेच टाकले. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेला न्यायालयात आव्हान देणाऱ्यांना कुणीतरी ‘पुढे केले’ असल्याचा दावा त्यांनी केला आणि योग्य वेळी त्या सूत्रधाराचे नाव पत्रकारांसमोर उघड करणार असल्याचेही सांगितले. बस्स... एवढे ऐकताच राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांची जंत्री सुरू झाली. या प्रकरणात आव्हान देणाऱ्यांमध्ये साखळीतील दिक्षा वायंगणकर आणि सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेटे यांची नावे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, यावर आता चर्चा रंगली आहे. काहींना वाटते, बाण एका दिशेने गेला; तर काहींना तो दुसऱ्याच लक्ष्यावर सोडला असल्याचे वाटते. सध्या तरी परिस्थिती अशी आहे की, बाण सुटल्याचे सर्वांनी पाहिले आहे; पण तो नेमका कोणाच्या दिशेने गेला, हे फक्त धनुर्धारीलाच ठाऊक आहे. ∙∙∙
यंदा नीट परीक्षेचे पेपर फुटल्याने जो गदारोळ झाला, तो ऐतिहासिकच म्हणावा लागेल. संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) आयएएस व तत्सम परीक्षांच्या प्राथमिक (प्रिलिम) परीक्षांचे पेपर इतके कठीण होते की नाकातोंडातून धूर यावा. लांबलचक प्रश्न आणि त्यासाठी अपुरा वेळ, अशी परिस्थिती निर्माण झाली. आजपर्यंतचा हा एक विक्रमच मानला जात आहे. विद्यार्थी चक्रावून गेले. यूपीएससी आयोगाच्या अध्यक्षांनीही पेपर अनिश्चिततेने भरलेले असल्याचे मान्य केले. त्यामुळे यंदाचा ‘कट-ऑफ’ मोठ्या प्रमाणात खाली येईल, हे निश्चित मानले जात आहे. गोव्यातील अनेक विद्यार्थी अशा राष्ट्रीय परीक्षांना बसत नसल्यामुळे राज्यातील अनेकांना याची कल्पना नसावी. मात्र गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) आणि कर्मचारी निवड आयोगाने (स्टाफ सिलेक्शन आयोग) देशभरात काय सुरू आहे, याचे भान ठेवणे उचित ठरेल. त्यांच्या परीक्षांचे पेपरही ऑनलाइन उपलब्ध आहेत. ते पराकोटीचे क्लिष्ट नसले तरी काही प्रश्न विचित्र आणि वेळखाऊ असतात. पेपर ना खूप सोपा, ना खूप कठीण, ना संदिग्ध असा समतोल असणे आवश्यक आहे. ∙∙∙
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले असले तरी एल्विस गोम्स पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. कारण त्यांच्या समर्थकांनी कुंकळ्ळीतून त्यांना २०२७च्या निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून २०२२ मध्ये त्यांच्यावर अन्याय झाला होता, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. कारण, ऐनवेळी त्यांना पणजीतून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची उमेदवारी केवळ नावालाच राहिली होती. आता त्यांनी २०२७ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कुंकळ्ळीतून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरल्याने तेही कामाला लागले आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ येत असताना एल्विसबाब आपले प्राबल्य कितपत वाढवतात, हे येत्या काही महिन्यांत जनतेसमोर येईलच. ∙∙∙
वेर्णा येथील एका कार शोरूमने नोंदणी न करताच एक आलिशान कार ग्राहकाला दिली. त्या कारने दोनापावल येथे तांडव घालत एका मुलीचा जीव घेतला. या प्रकरणानंतर वाहतूक खात्याने विनापरवाना कार देणाऱ्या शोरूमचा व्यापारी परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला. मात्र, अवघ्या काही दिवसांतच कायद्यातील पळवाट शोधून या शोरूमकडून वाहनांची विक्री पुन्हा सुरू केल्याची चर्चा आहे. यामध्ये वाहतूक खात्यातील तीन वरिष्ठ अधिकारी, ज्यांना ताम्हणकर ‘त्रिदेव’ असे संबोधतात, ते सहभागी असल्याचे बोलले जात आहे. या तीन अधिकाऱ्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला की त्यांच्याकडून तो करवून घेणारा कुणी वेगळाच धनी आहे, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. ∙∙∙
गोव्याच्या रस्त्यांवर पर्यटनाचा आनंद लुटताना काही पर्यटक उत्साहाच्या भरात वाहतूक नियमांनाच पाठ दाखवतात; मात्र यावेळी एका पर्यटकाने अक्षरशः दुचाकीवर मागे तोंड करून बसत ‘बॅकवर्ड राइडिंग’चा थरार अनुभवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची ही करामत थेट पोलिसांच्या नजरेत भरली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची स्वप्ने रंगवणाऱ्या या पर्यटकाला अखेर वाहतूक नियमांचा धडा शिकवत दंडाची पावतीच हाती पडली. रस्ते हे स्टंटसाठी नसून सुरक्षित प्रवासासाठी असतात, हे विसरणाऱ्यांसाठी हा प्रसंग म्हणजे ‘फोटोसाठी पोझ दिली, पण आठवण म्हणून चलन मिळाले’ अशीच उपरोधिक आठवण ठरली आहे. ∙∙∙
‘माझे घर’ योजनेची गाडी सध्या सुसाट धावत आहे. एका बाजूला अर्जांचे वाटप, लाभार्थ्यांच्या याद्या आणि घरांच्या आश्वासनांचा पाऊस पडताना दिसतोय. पण दुसऱ्या बाजूने या योजनेसमोर न्यायालयाचा एक मोठा ‘स्पीड ब्रेकर’ उभा ठाकला आहे. योजनेला दिलेले आव्हान आणि त्यावरील सुनावणी याच महिन्यात होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. आता न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला तर गाडी पुढच्या स्टेशनकडे धावेल; पण लाल दिवा लागला किंवा स्थगितीचा अडथळा आला तर चालकाला अचानक ‘ब्रेक’ मारावा लागू शकतो. सध्या मात्र सरकारचे इंजिन जोरात धावत आहे. जितके जास्त लाभार्थी तयार होतील तितकी गाडी अधिक वेगाने धावेल, असा हा हिशेब असल्याचे बोलले जाते. तर विरोधक न्यायालयाच्या वळणावर उभे राहून गाडीचा वेग कमी होतो का, याची वाट पाहत आहेत. ∙∙∙
गोव्याच्या रस्त्यांवर पर्यटनाचा आनंद लुटताना काही पर्यटक उत्साहाच्या भरात वाहतूक नियमांनाच पाठ दाखवतात; मात्र यावेळी एका पर्यटकाने अक्षरशः दुचाकीवर मागे तोंड करून बसत ‘बॅकवर्ड राइडिंग’चा थरार अनुभवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची ही करामत थेट पोलिसांच्या नजरेत भरली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची स्वप्ने रंगवणाऱ्या या पर्यटकाला अखेर वाहतूक नियमांचा धडा शिकवत दंडाची पावतीच हाती पडली. रस्ते हे स्टंटसाठी नसून सुरक्षित प्रवासासाठी असतात, हे विसरणाऱ्यांसाठी हा प्रसंग म्हणजे ‘फोटोसाठी पोझ दिली, पण आठवण म्हणून चलन मिळाले’ अशीच उपरोधिक आठवण ठरली आहे. ∙∙∙
मंत्रिमंडळातील रिक्त जागा कधी भरणार हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्वाधिक वेळा आणि सर्वाधिक ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न ठरला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री दिल्लीला निघाले तेव्हाही साहजिकपणे हा प्रश्न विचारण्यात आला. लवकरच ही जागा भरू, आधी त्याची माहिती पत्रकारांनाच देऊ, असे सांगत वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता दिल्लीहून परतल्यावर या विषयावर बोलू असे सांगून उत्सुकता वाढवली आहे. यामुळे दिल्लीच्या दौऱ्यात मंत्रिमंडळाच्या रिक्त जागी कोण याचा निर्णय होणार, असे मानले जात आहे. ∙∙∙
गोवा भाजपतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणकोणती पावले उचलावीत, याबाबतची एक सूची पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातील एका मुद्द्यानुसार, यावेळी ज्येष्ठांना डावलून तरुणांना संधी देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ३० ते ३५ टक्के उमेदवार युवक असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार, याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या एक-दोन वर्षांत देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर युवकांना उमेदवारी दिल्याचे दिसून आले आहे. आता गोव्यातील किती ज्येष्ठ आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, हे पाहावे लागेल. दरम्यान, काही ज्येष्ठ आमदारांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या कुटुंबीयांपैकी कुणाचे तरी घोडे दामटायला सुरुवात केल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.