

राहुल गांधी यांची ‘छात्रों की गुंज’ ही मोहीम देशभर चर्चेत असताना तिचे पडसाद गोव्यातही उमटणार का? याची चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे. गोव्यात अशी मोहीम झाली आणि विद्यार्थी एकत्र आले, तर राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी गर्दी जमणार का? याचीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे काही मोठे नेते गोव्यात येऊन सभा घेतात, मग राहुल गांधींचीही एक सभा झाली तर काय हरकत, असा सूरही काहींच्या गप्पांमध्ये ऐकू येत आहे. आता ही केवळ चौकात फिरणारी चर्चा आहे की त्यामागे काही नियोजनही सुरू आहे, हे काँग्रेसचे पदाधिकारीच जाणोत; पण प्रश्न उरतो तो, राहुल गांधी गोव्यात येणार का?
उपरोधिकता असावी, पण...
गोव्यात ‘खड्डा’ हा शब्द उपरोधिकपणे बोलला जातो. आता हा शब्द कशासाठी आणि कोणासाठी वापरतात, यावर येथे भाष्य नको; परंतु विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कामकाज सल्लागार समितीच्या विधानसभेतील बैठकीनंतर ‘खड्ड्यां’वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, काँग्रेसमध्ये असलेले खड्डे भाजपमध्ये गेले आहेत. दुसरीकडे रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे बिकट झाली आहे, असेही राज्यभर चित्र आहे. आलेमाव हे जे काही बोलले आहेत, ते अनेकांना तत्काळ समजलेही असणार आहे; पण कोणाची उपमा कोठे कोणाला द्यावी, यात राजकीय नेत्यांनी स्वतःमधील विवेकतेचे उदाहरण समोर ठेवायला हवे. राजकारणात आज तुमची तर उद्या दुसऱ्याची वेळ असू शकते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते, एवढेच.
संकेतचे ‘जेन ६०’
सध्या सगळीकडे ‘जेन झी’चे वारे असताना सावर्डे मतदारसंघात स्वतः युवावर्गाचे प्रतिनिधित्व करणारे संकेत आर्सेकर यांनी ‘जेन ६०’कडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. हे ‘जेन ६०’ म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धात पाऊल टाकलेले ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक. या ज्येष्ठांसाठी संकेत यांनी आपल्या प्रतिष्ठानातून आज एक वॉकेथॉन स्पर्धा आयोजित केली असून ३ किलोमीटर अंतर चालून पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त होणार आहे. संकेत म्हणतात, युवांचा जोश सर्वांना हवा आहेच; पण ज्येष्ठांचा अनुभवही तेवढाच महत्त्वाचा नसतो का? मग या ज्येष्ठांकडेही लक्ष देणे गरजेचे नाही का?
पाऊसकर नेमके कधी फॉरवर्ड?
सावर्डेचे माजी आमदार व माजी मंत्री दीपक पाऊसकर हे काल विजय सरदेसाई यांच्याबरोबर पुन्हा एकदा मोलेत दिसले. गोवा फॉरवर्डने सध्या ‘जंय गांव, थंय हांव’ ही माेहीम सुरू केली असून त्याची सुरवात विजयनी काल मोलेतून केली. यावेळी विजयनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर दीपक पाऊसकर हेही फिरताना दिसत होते. वास्तविक दीपक पाऊसकर गाेवा फाॅरवर्डला जवळ आल्यास जवळपास पाच-सहा महिने होऊन गेले; पण त्यांनी अजूनपर्यंत अधिकृतपणे गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केलेला नाही. एकाबाजूने भाऊ दीपकचा गोवा फॉरवर्ड प्रवेश मी अडवून ठेवला आहे, असे सर्वांना सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने दीपक विजयबरोबर फिरताना दिसतात, त्यामुळे दीपक ‘फॉरवर्ड’ कधी हाेतील, हाच प्रश्न सध्या सावर्डेतील मतदार विचारू लागले आहेत.
...म्हणून कुशावतीला प्राधान्य
३१ ऑगस्टपासून सुरू होत असलेले विधानसभा अधिवेशन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कुशावती जिल्ह्यातील मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. सावर्डेचे गोवा फॉरवर्डचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात असलेले माजी मंत्री दीपक पाऊसकरांसोबत त्यांनी शनिवारी सावर्डेतून आपल्या दौऱ्यास सुरवात केली. दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेससोबत युतीत असला, तरी विधानसभा निवडणुकीतील आघाडीसंदर्भातील चर्चांना फॉरवर्डने स्थगिती दिलेली आहे. असे असले तरी अखेरच्या टप्प्यात काहीही होऊ शकते, हे लक्षात घेऊनच काँग्रेसकडे ताकदीचे उमेदवार नसलेल्या कुशावतीतील मतदारसंघांत गोवा फॉरवर्डचे वजन वाढवून त्यातील काही मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच विजयनी कुशावतीला अधिक प्राधान्य दिल्याची चर्चा मतदारांत सुरू आहे.
कुंकळ्ळीत भाजपचा ‘हुकमी एक्का’?
लढाई सम बलवानात झाली तर रंगत वाढते. जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजप योग्य व सक्षम उमेदवाराच्या शोधात होता. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना टक्कर द्यायची असेल तर त्यांच्या तोडीचा उमेदवार भाजपला हवा होता. आता भाजपला तसा तोडीचा उमेदवार मिळाला असून त्याने प्रचारकार्यास सुरवात केल्याची चर्चा आहे. या नव्या बलवान उमेदवाराच्या आगमनामुळे कुंकळ्ळी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले सुदेश भिसे, विशाल देसाई यांची मात्र पंचाईत झाली आहे.
विमानात ‘सावंत इफेक्ट’!
सध्या ‘जेन झी’ची चर्चा जोरात सुरू आहे. युवकांचे प्रश्न ऐरणीवर असून, राजकीय नेत्यांविषयी तरुणाईचा रोषही अनेकदा व्यक्त होताना दिसतो. अशा वातावरणात गोवा-हैदराबाद विमानप्रवासात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग मात्र लक्षवेधी ठरला. विमानातील एका युवा केबिन क्रू सदस्याने मुख्यमंत्री सावंत यांच्या कौतुकाची चिठ्ठी लिहिली. सावंत यांच्या साधेपणाचे कौतुक करताना गोव्याला त्यांच्या रूपाने ‘इमर्जिंग’ आणि उत्साही मुख्यमंत्री मिळाले असल्याचे तिने नमूद केले. तसेच महिला सशक्तीकरणासाठी सावंत प्राधान्याने काम करत असल्याचाही उल्लेख तिने केला. विशेष म्हणजे, केबिन क्रूने लिहिलेली ही चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः समाजमाध्यमावर शेअर केली. ‘जेन झी’कडून नेत्यांवर नाराजी व्यक्त होत असताना सावंत यांचे कौतुक करणारी ही चिठ्ठी मात्र युवकांच्या मनात वेगळीच ‘टेकऑफ’ घेताना दिसत आहे.
वेळ्ळी मतदारसंघात काँग्रेसपुढे पेच!
काँग्रेस पक्षासाठी येणारी विधानसभेची निवडणूक करो अथवा मरो, अशीच राहणार आहे. पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीही करून विधानसभेची निवडणूक जिंकून सत्ता हासील करण्याचे लक्ष्य काँग्रेसने निश्चितपणे आखले असणार. मात्र, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाला बरीच कसरत करावी लागणार आहे. वेळ्ळी मतदारसंघावर काँग्रेसचे सावियो डिसिल्वा यांनी दावा केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेला सावियो समर्थकांनी वेळ्ळी मतदारसंघात सावियो, अशी टी-शर्ट घालून खर्गे यांच्यापुढे शक्तिप्रदर्शनही केले होते. काँग्रेस व आम आदमी पक्षात युती झाली तर वेळ्ळी मतदारसंघ आम आदमीच्या पदरात जाणार. जर केपे मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाला तर वेळ्ळी मतदारसंघ केपेचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ ठरू शकतो. असे झाले तर सावियो डिसिल्वा यांचे काय होणार? सावियो डिसिल्वा उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याचा अर्थ वेळ्ळी मतदारसंघ काँग्रेससाठी तोंडात घेतलेला गरम पाण्याच्या घोट बनला आहे. थुंकायलाही मिळत नाही आणि गिळायलाही मिळत नाही.
केपे आरक्षित झाला तर?
नशिबापेक्षा जास्त आणि वेळेपूर्वी कधी कोणाला काही मिळत नसते, असे म्हणतात ते खरे. राज्यात जर राजकीय आरक्षण लागू झाले तर विस्मृती आड गेलेल्या काही राजकारण्यांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. केपे मतदारसंघ ‘एसटी’साठी आरक्षित झाला तर या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार? यावरून पैजा लावल्या जात आहेत. केपे ‘एसटी’ आरक्षित झाला तर जुवांव फर्नांडिस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर प्रथम दावा सांगणार, हे निश्चित. माजी मंत्री प्रकाश वेळीप, दिगंबर कामत यांचे शिष्य छोटे प्रकाश वेळीप, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष खुशाली वेळीप हेही भाजपच्या उमेदवारीवर प्रथम दावा सांगण्यात मागे राहणार नाहीत. राजकीय आरक्षण लागू झाल्यास भाजप सावर्डेतील एका बड्या नेत्याला केपे मतदारसंघात आयात करण्याच्या विचारात असल्याची खबर आहे. आरक्षण लागू झाले नाही तर मात्र लढाई एल्टन डिकॉस्टा विरुद्ध बाबू कवळेकर यांच्यातच होणार. आता पाहूया काय होते. घोडा मैदान जवळच आहे.
खर्च वाढताेय!
साखरेचे दर वाढले, तांदळानेही भाव वाढवला आणि आता स्वयंपाकघरातील इतर वस्तूंचे दरही वाढणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे घरातील गृहिणींच्या बाजारात जाणाऱ्या पिशवीत मात्र वस्तू कमी होऊ लागल्या आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. सरकारने निदान सामान्य माणसाला दोन वेळेचा स्वयंपाक तरी निर्धास्तपणे करता यावा, एवढ्या आवश्यक वस्तू योग्य दरात मिळतील याची खात्री करावी, अशी मागणी आता प्रत्येक स्वयंपाकघरातून ऐकू येऊ लागली आहे. कारण दर कमी होतील, या आशेने वाट पाहणाऱ्या जनतेला आता ‘किंमत कमी होणार’पेक्षा ‘पुढे आणखी किती वाढणार?’ याचीच चिंता सतावत आहे.
शनिवार सुट्टीचा दिवस
फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवार आता सुट्टीचा दिवस म्हणूनच प्रिय असल्याचे दिसत आहे. महाविद्यालयाने शनिवारीही नियमित वर्ग घेण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल १,१०० हून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करून त्या कुलसचिवांकडे सादर केल्या. एवढ्यावरही प्रशासनाने ‘इंजिनिअरिंग’ची भूमिका कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांनी अखेर शनिवारी वर्गांवरच बहिष्कार टाकत आपला निषेध नोंदवला. त्यामुळे शनिवारी महाविद्यालयात वर्गांचे वेळापत्रक सुरू असले, तरी बाकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ शिक्षकांवर आली. शनिवारचा दिवस ‘आरामासाठी की अभ्यासासाठी?’ या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी मात्र कृतीतूनच दिले असून, १,१०० स्वाक्षऱ्यांनंतरही प्रश्न सुटला नाही तर पुढचा ‘प्रयोग’ कोणता, याकडे आता महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
पोलिस अधिकाऱ्याविरोधात नाराजी
उत्तर गोव्यातील एका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सध्या आपल्याच सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पोलिस ठाण्याचे दैनंदिन व्यवस्थापन, गुन्ह्यांचा तपास आणि प्रशासकीय कामकाज यांपैकी कशावरही त्यांची पकड नसल्याने हाताखालील कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज आहेत. या ढिसाळ कारभारामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा आणि मानसिक ताण येत आहे. एका नवशिक्या अधिकाऱ्यापेक्षाही वाईट पद्धतीने कारभार सुरू असल्याने, ठाण्यातील उपनिरीक्षकांशी या अधिकाऱ्याचे सतत खटके आणि शाब्दिक वाद उडत आहेत. या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असून, वरिष्ठांनीही या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची लवकरच इतरत्र बदली केली जाण्याची शक्यता असून, सध्या पोलिस वर्तुळात याबाबत चर्चा सुरू आहे.
वाढत्या महागाईमुळे सामान्यांवर भार
चतुर्थी जवळ येत असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. विविध ठिकाणी चतुर्थीचे बाजार भरू लागले असून सजावट साहित्य, मिठाई आदी उपलब्ध आहे. मात्र नारळ, साखर, तांदूळ तसेच भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक चिंतेत आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांना वाढती महागाई मोठे संकट ठरत असून, चतुर्थीचा सण साजरा करताना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
नरेंद्र सावईकरांची डिक्शनरी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ‘एनआरआय’ कमिशनर ॲड. नरेंद्र सावईकर यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डिक्शनरी वापरायचे आवाहन केले. या आवाहनाबरोबर त्यांनी सांगितले की, आपल्याकडे अजूनही १९६३ साली प्रकाशित केलेली ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे, जी आपण जपून ठेवली आहे व तिचा वापर अजूनही करतो. ही डिक्शनरी आपल्याला वडिलांनी दिली होती. वकील असल्याने कायदेशीर शब्दही समजून घेण्यासाठी आपण या डिक्शनरीचा वापर करतो. शाळेत शिकताना एकदा बाईंनी आम्हाला एका शब्दाचे स्पेलिंग विचारले. आपण ते चुकीचे सांगितले. तेव्हा घरी जाऊन आपण रडलो व वडिलांनी आपल्याला ही डिक्शनरी आणून दिली जी वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवली आहे व वापरतही आहे. जीवनात काही वस्तू अशा असतात ज्यामुळे आपल्यामध्ये परिवर्तन होत असते. जुने ते सोने हेच खरे.
निवडणूक तयारीत विद्यार्थी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी २ आणि ३ सप्टेंबर रोजी आयोगातर्फे आयोजित दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचा भाग म्हणून गोव्यात येतील. २ सप्टेंबरच्या कार्यक्रमात बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संवाद साधण्यावर भर असेल. त्यात सुमारे ५०० बीएलओ सहभागी होतील. सर्व ४० मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इयत्ता नववी ते बारावीच्या सुमारे २५० शाळा सहभागी होण्याचा प्रस्ताव आहे. निवडक जिल्ह्यांमधील सुमारे १० विद्यापीठे आणि २० प्रमुख महाविद्यालयेदेखील सहभागी होतील. अंदाजे ३०० शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व अपेक्षित आहे. मतदान जागृतीविषयी किंवा इतर कार्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचा बेत उत्तमच; कारण या वयात मुलांना राजकारणाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया, सामान्य ज्ञान माहीत झाले तर हा आत्मविश्वास त्यांच्या धमन्यांत अभिसरीत होऊ लागेल. लोकशाहीचे महत्त्व मुलांना कळेल.
एकट्याचा असाही सूर
पणजीत बंदर कप्तान खात्याच्या इमारतीच्या समोर असलेल्या रस्त्यावर शनिवारी नेहमीची धावपळ सुरू असताना एका कलाकाराने आपल्या सुरांनी क्षणभर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हातात वाद्य आणि ओठांवर सुरेल गाणे घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या कलाकाराभोवती काही क्षणांतच उत्सुकांची गर्दी जमली. कोणतेही भव्य व्यासपीठ नाही, प्रकाशझोत नाही की जाहिरातीचा गाजावाजा नाही; तरीही त्याच्या सुरांनी रस्त्यालाच रंगमंचाचे रूप दिले. ये-जा करणारे काही क्षण थांबले, काहींनी मोबाईलमध्ये हा क्षण टिपला, तर काहींनी कौतुकाची दाद दिली. शहराच्या धावत्या जीवनात कलावंताला व्यासपीठ मिळाले तर तो रस्त्यावरही आपली कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, हे त्या एकट्याने दाखवून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.