

आरोपांची शिडी, परतीची वाट
‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे माजी प्रमुख मनोज परब हे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. परंतु त्यांना मुहूर्त सापडत नसावा किंवा ते संधीची तरी वाट पाहत असावेत. मंगळवारी रात्री त्यांनी अशा काही स्फोटक प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत की, त्यांना दणक्यात पक्षप्रवेश करायचा असावा. एका बाजूला सरकारप्रमुखावर गोवा विकायचा आरोप करायचा, दुसऱ्या बाजूला वीरेश बोरकरवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. आरजी पक्ष संपवण्यासाठी गिरीश चोडणकर व वीरेश बोरकर यांच्यात ३ कोटींचे डील झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा अर्थच मनोज परब आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आपले वेगळे स्थान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. लोक त्यांना किती गांभीर्याने घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
विधानसभेला बाबू नायकांचा विसर
दिवंगत विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार बाबू नायक हे आमदार असताना विधानसभा अशी गाजवायचे की, लोक मुद्दामहून मडगावहून पणजीला अधिवेशन ऐकण्यासाठी जायचे. अशा या बाबू नायक यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून, या निमित्ताने दोन महिन्यांपूर्वी आयोजित केलेल्या एका सोहळ्यात त्यांच्या सर्व कामगिरीचा जाहीर उल्लेख झाला होता. मात्र, ही माहिती सध्याचे विधानसभा सभापती गणेश गावकर यांच्या कानावर पडली नाही का, हा प्रश्न आम्हाला नव्हे, तर बाबूंचे नातू प्रभव नायक यांना पडला आहे. याचे कारण म्हणजे मंगळवारपासून नव्या विधानसभा संकुलाचा रौप्य महोत्सव सोहळा सुरू झाला. त्या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण बाबू नायक यांच्या कुटुंबीयांना नव्हते. खुद्द प्रभवने समाजमाध्यमातून ही गोष्ट जाहीर केली आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे, हे आमंत्रण न दिल्याने आम्हाला काही दुःख झालेले नाही. कारण, या सोहळ्यावर जी पैशांची उधळपट्टी केली, त्या विरोधात बाबू आज जर आमदार असते, तर त्यांनी निश्चित आवाज उठवला असता.
गोवा फॉरवर्ड-आप युतीचे गूढ काय?
२०२२च्या निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली होती. अधिकृतपणे ती अजून तुटलेलीही नाही. आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांची महायुती हाच पर्याय असल्याची चर्चा सुरू आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. पण मध्येच माशी कुठे शिंकली, हे कळायला मार्ग नाही! त्यातच गोवा फॉरवर्डने आम आदमी पक्षासोबत ‘गोवा फर्स्ट’ आघाडीची घोषणा केली. अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनी गणेश चतुर्थीला विजयबाबांच्या जुन्या घरी जाऊन नेवऱ्या-मोदकाचाही आस्वाद घेतला. त्यामुळे युतीची गोडी चांगलीच जमल्याचे चित्र निर्माण झाले. पण आता या दोन्ही पक्षांत नेमके काय बिनसले, याची चर्चा सुरू आहे. मग प्रश्न पडतो, गोवा फॉरवर्डने ‘आप’सोबत युतीची एवढी घाई का केली? युती केल्याने पक्षाचे आणि स्वतःचेही नुकसान होऊ शकते, याचा साक्षात्कार आता झाला का? की राजकारणात काही समीकरणे जुळवताना काही गणिते चुकली? दरम्यान, काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गोव्यात येणार आहेत. शिवकुमार आणि विजयबाबांची मैत्री जुनी. त्यामुळे त्यांच्या भेटीनंतर काही ठोस राजकीय निर्णय होतो का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘हात’ दुखावला
काँग्रेसची गोवा राखण यात्रा फोंड्यात पार पडली. यात्रेत काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणे घसरून पडल्या आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. फोंड्यात काँग्रेसला यापूर्वीही मागच्या पोटनिवडणुकीत अपशकून झाला होता. हल्लीच ‘गोमन्तक’च्या ‘खरी कुजबूज’मध्ये शकुन-अपशकुनावर केलेले भाष्य अनेक काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागले होते. त्यातच अंजलीताईंचा नेमका हाताचा पंजाच फ्रॅक्चर झाल्याने अनेक काँग्रेस तिकीट इच्छुकांनी म्हणे कालच देव पाण्यात ठेवले. आता हे फ्रॅक्चर शकुन की अपशकुन ठरते हे काळच ठरवेल. ‘फोंडा फोंडान घालना जाल्यार पुरो’, असे म्हणे काँग्रेसवालेच कुजबूजत होते.
वाळपईत गिरीश का रुसले?
काँग्रेसची ‘गोंय राखण यात्रा’ वाळपईत पोहोचली आणि काँग्रेसने आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवरून केलेल्या थेट प्रक्षेपणातून काँग्रेसमधील भाऊबंदकी गोमंतकीयांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवली. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यात्रेच्या अग्रस्थानी न राहता मागे चालत असल्याचे दिसले. त्यानंतर सहप्रभारी अंजलीताईंनी त्यांचा हात धरून त्यांना पुढे आणले. यात्रा समारोपस्थळी पोहोचल्यानंतर स्थानिकांनी गिरीश चोडणकर वगळता इतर नेत्यांच्या गळ्यात हार घालून स्वागत केल्याचे सर्वांनी पाहिले. आता, गिरीशरावांना हार मुद्दाम घालण्यात आला नाही की त्यांनी तो घालून घेतला नाही, हे हार घालणारे व घालून घेणारे यांनाच माहीत.
फॉर्मात असलेले चिराग
सध्या गोव्यात काँग्रेसची ‘गोय राखण यात्रा’ सुरू आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते या यात्रेतील फोटो समाजमाध्यमांवरही अपलोड करू लागले आहेत. मडगाव येथील युवा काँग्रेस नेते चिराग नायक यांनीही आपले असे फोटो आणि रील्स सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यात कधी ते झांज वाजवत रॅलीत सहभागी होताना दिसतात, तर काही ठिकाणी घोषणा देताना दिसतात. यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीचा या यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो शेअर केला होता. सध्या एका लहान मुलीला खांद्यावर बसवून रॅलीत सामील झाल्याचा त्यांचा फोटो झळकला आहे. एकंदर, त्यांची या यात्रेतील देहबोली पाहता ते या यात्रेत समरसून गेले आहेत आणि आनंदितही झाले आहेत. आता विजय सरदेसाई हेसुद्धा काँग्रेसबरोबर जुळवून घेण्याच्या तयारीत असल्याचे कानावर आल्यानंतर त्यांचा आनंद आणि उमेद नक्कीच द्विगुणित झाली असावी, हे निश्चित.
मती काय गहाण ठेवली होती?
म्हापसा नगरपालिकेची इमारत सध्या बरीच चर्चेत आहे. नव्याने बांधलेल्या इमारतीत येणाऱ्यांना सध्या बाहेर सुरू असलेल्या बांधकामाबाबत नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारणही तसेच आहे. इमारत बांधताना बाहेरील बाजूला अपंग व्यक्तींना येण्यासाठी जो मार्ग करण्यात आला आहे, त्याला उतार किती असावा, याचे भानच इमारत बांधणाऱ्या कंत्राटदाराला आले नाही काय? असा एक वर्षाने प्रश्न उपस्थित झाला, असे नगरपालिकेतील अधिकारी आता बोलू लागले आहेत. कारण इमारतीच्या बाहेर अपंग व्यक्तींसाठी मार्ग केला होता, त्याचा चढ-उतार कमी करण्यास सुरुवात झाली आहे. कारण नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे दिव्यांग असल्याने, त्यांच्या येण्याने पहिल्यांदा बांधलेल्या मार्गातील चुका आता म्हणे समोर आल्या आहेत. त्यामुळे इमारतीबाहेरील तो मार्ग बांधताना कंत्राटदाराची आणि अभियंत्याची मती काय गहाण ठेवली होती काय, असा प्रश्न पडतो. महत्त्वाची बाब म्हणजे, हे काम करण्यासाठी नगरपालिका आपल्या तिजोरीतील पैसे खर्च करीत आहे, हे लक्षात घेणे जरूरीचे.
मडगावात महायुतीचा उमेदवार?
मडगावात विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करण्यासाठी काही युवा नेते पुढे सरसावले आहेत. यात सावियोबाब कुतिन्हो हा थोडा अनुभवी, व चिराग नायक व प्रभव नायक हे अन्य दोघे. या तिघांनाही काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. त्यामुळे तिघेही काँग्रेसशी संबंध ठेवून आहेत. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना मडगावमध्ये तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळेल, असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की, दिगंबर यांच्या विरोधात महायुतीचा एकमेव उमेदवार असेल, पण तिघांपैकी नेमका कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. या तिघांपैकी एकाला उमेदवारी दिली तर बाकीचे दोघे स्वस्थ बसतील का? हा एक प्रश्न मडगावकरांना सतावू लागला आहे. या तिघांमध्ये समेट घडवून आणणे ही काळाची गरज असल्याचे काही मडगावकर बोलताना दिसतात. पाहूया, काय होते ते!
काळ्या पाण्याचा विषय
सां जुझे द आरियलमधील काळ्या पाण्याने प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. आमदार क्रुझ सिल्वा यांनी ‘तपासण्या पुरे झाल्या’ म्हणत आता प्रदूषणाचा स्रोत शोधून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. आता विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसा या काळ्या पाण्याचा रंग राजकारणातही चढण्याची शक्यता आहे. पाणी काळे असले तरी राजकारणात हा मुद्दा मात्र दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होणार, हे नक्की!
गोवा हॉकी संघटना वादात!
आमचे काही राजकारणी राजकारणातून तडीपार झाले तरी जिथे जातात तिथे राजकारण करण्यात मागे राहत नाहीत. गोवा हॉकी संघटनेत अशाच प्रकारची एकाधिकारशाही चालत असल्याचा आरोप स्थानिक पातळीवरील हॉकी क्लब व उत्तर जिल्हा हॉकी संघटना करीत आहे. गोवा हॉकी संघटनेवर माजी आमदार फारेल फुर्तादो या गेल्या तीन दशकांपासून हॉकी संघटना आपल्या ताब्यात घेऊन वावरत आहेत. मॅडम फुर्तादो यांनी हॉकी संघटना आपली खासगी जागीर बनवल्याचा गंभीर आरोप हॉकी संघटना करीत आहेत. फारेल व त्यांच्या बहिणीकडे संघटनेचा ताबा असून, हल्लीच झालेल्या निवडणुकीत ‘वोट चोरी’ झाल्याचा आरोप उत्तर गोवा जिल्हा हॉकी संघटनेने केला. उत्तर गोवा जिल्हा हॉकी संघटनेला मतदान करण्यास बाधा आणली व मतदानाचा हक्क बजावण्यात फुर्तादो यांनी आडकाठी आणल्याचे आरोप फुर्तादो यांच्यावर होत आहेत. हॉकी संघात राज्याबाहेरील खेळाडूंना निवडले जाते व नव्या हॉकी क्लबना गोवा हॉकी संघटनेत स्थान दिले जात नसल्याचाही आरोप होत आहे. मॅडम फुर्तादो, हॉकी टर्फवर खेळली जाते, हे आपण विसरलात का?
चर्चा सुधीर भाईंची...
म्हापसा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची रांग लागली असून डॉ. गुरुदास नाटेकर, सुधीर कांदोळकर, प्रतीक्षा खलप, शशांक नार्वेकर, संजय बर्डे आणि विजय भिके यांची नावे आघाडीवर आहेत. कांदोळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चा निव्वळ कपोलकल्पित असल्याचे सांगत, ‘भाई’ कुठेही जाणार नाहीत; म्हापशातून काँग्रेसची उमेदवारी सुधीर भाईंनाच मिळणार, असा विश्वास व्यक्त केला. खुद्द कांदोळकर सध्या पत्रकार व कार्यकर्त्यांशी खासगीत बोलताना, काँग्रेस पक्षाने मला उमेदवारीचा शब्द दिला असताना दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट करत या अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रभारींची ‘नारी शक्ती’
गोव्याच्या भाजप प्रभारी भारती पवार यांनी शिरोड्यात महिला मोर्चाची बैठक घेत महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि सरकारी योजनांचा आढावा घेतला. निवडणुकीची चाहूल लागताच ‘नारी शक्ती’ची आठवण सगळ्यांनाच होऊ लागली आहे. भाजपही त्याला अपवाद नाही. विविध मतदारसंघांत महिलांसाठी कार्यक्रम आणि ‘नारी शक्ती’ मेळाव्यांचे नियोजन सुरू झाले आहे. त्यात प्रभारी भारती पवार स्वतः महिला असल्याने महिला मतदारांशी संवाद साधताना त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिरोड्यातील बैठकीला विद्या गावडे, शोभा खुटकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष दामू नाइक यांचीही उपस्थिती होती. एकंदरीत, निवडणुकीआधी ‘नारी शक्ती’ जागी झाली आहे. आता ही शक्ती निवडणुकीवेळी कुणाच्या पारड्यात किती वजन टाकते, याची उत्सुकता वाढली आहे.
रौप्यमहोत्सवी कार्यक्रम की विधानसभा सभागृह?
विधानसभा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विविध विषयांवरून सरकारवर ताशेरे ओढले. शिवाय निवडणूक वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यावर आलेले असताना स्थगित ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा त्यांनी समाचार घेतला. इतिहास या घटनेची आठवण ठेवेल, असेही ते म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही बोलताना युरींना जोरदार प्रत्युत्तर दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा १४ वर्षांनी मुक्त झाला. पहिल्या दोन वित्त आयोगांचा निधी गोव्याला मिळाला नाही. त्यामुळे विकास रखडला, अशी खंत व्यक्त करीत भाजपच्या डबल इंजिन सरकारने राज्याचा दुप्पट विकास साध्य केल्याचाही दावा त्यांनी केला.
असाही हजरजबाबीपणा!
विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला शेजारील महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कर्नाटक विधानसभा सभापती जी. एस. पाटील यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. हीच संधी साधत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकप्रतिनिधीने हजरजबाबी कसे असावे? हे दाखवून दिले. गोवा आणि शेजारील राज्यांतील नाते पुढील काळात आणखी सदृढ व्हावे अशी इच्छा व्यक्त करतानाच, ‘‘मी शेजारील राज्ये म्हटलेले आहे. त्यात म्हादईही आली’’, असेही त्यांनी नमूद केले. या तिन्ही राज्यांत म्हादईवरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी सभापतींनीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या केल्याचे लपून राहिले नाही.
रूपकला बढती की काय...
फोंडा पालिकेचे नगरसेवक रूपक देसाई यांचा वाढदिवस फोंड्यात मोठ्या धडाक्यात साजरा झाला. फोंड्याचे नगरसेवक असलेले रूपक हे सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम करतात. रवी पात्रांवचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे आणि आता रवींचे पुत्र रितेश नाईक यांच्यासोबत कायम असलेल्या रूपक देसाईंच्या वाढदिवसाला खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू बाब उपस्थित राहिले. दामू बाबनी रूपक यांच्या घरी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आता रूपक भाजपचे एक पदाधिकारी असल्यामुळे दामू बाबना शुभेच्छा देणे इष्ट आहेच. पण वाढदिवस सोहळ्याला उपस्थित गर्दी, त्यातही भाजपचे नेते पाहून फोंड्याचे नगरसेवक असलेल्या रूपकना आता नगराध्यक्षपदी बढती मिळते की काय, अशी चर्चा होताना दिसली.
भगव्या सदऱ्याचा अधिकारी
नागरी पुरवठा खात्यातील धान्य खरेदी प्रकरणातील घोटाळा काही वर्षांपूर्वी बराच गाजला होता. त्यावेळी तत्कालीन संचालकांना हे प्रकरण भोवले आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर निलंबनाच्या काळातही हे संचालक पणजीतील आल्तिनोवर फाईल घेऊन ये-जा करताना अनेकांच्या नजरेस पडत होते. त्यामुळे निलंबनाचा काळ संपल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होणार, अशी चर्चा त्यावेळीच सुरू झाली होती आणि सरकारने त्यांचे पुनर्वसनही केले. सध्या ते दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवरील एका नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, पुनर्वसनानंतर त्यांच्या पेहरावात झालेला बदल सध्या नगरपालिकेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. कधी-कधी भगव्या रंगाचा सदरा घालून ते कार्यालयात येतात म्हणे! आता भगवा रंग निवडण्यामागे नेमके काय कारण आहे, हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडणे साहजिकच.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.