

पणजी: विधानसभेत सत्ताधारी, विरोधी आमदारांमध्ये जनतेच्या प्रश्नावरून चर्चा, संवाद होणे, त्यातून मार्ग काढून जनतेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कायदे तयार होणे महत्त्वाचे असते. लोकशाही सशक्त करण्यासाठी विधानसभा हे व्यासपीठ असते. त्यामुळे तेथे अशा प्रश्नांवर चर्चा होणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
गोवा राज्य विधानसभेच्या संकुलास २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी आयोजित रौप्यमहोत्सवी सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती गणेश गावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आजी-माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, उपसभापती तसेच खासदारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, विधिमंडळ कामकाजमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे तसेच कर्नाटक विधानसभेचे सभापती जी. एस. पाटील उपस्थित होते.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, की ‘‘निसर्ग, संस्कृती आणि जीवनशैलीमुळे गोव्याची संपूर्ण जगाला ओळख आहे. पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर १९६४ मध्ये गोव्यात विधानसभा अस्तित्वात आली. सध्या सुरू असलेल्या विधानसभा संकुलात गेल्या २५ वर्षांत सामाजिक, आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेचे अनेक प्रश्न, समस्या मांडल्या. यात योगदान दिलेल्या तसेच विधानसभेची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी काम केलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करतो.’’
‘‘आकारमानाने देशातील छोटे राज्य असलेल्या गोव्याचा विकास निरंतर सुरू आहे. तरीही निसर्ग, पर्यावरण, संस्कृती जपण्याचे आव्हान गोव्यासमोर कायम असून, दुसऱ्या बाजूला आर्थिक विकासही साध्य करायचा आहे’’, असेही ओम बिर्ला यावेळी म्हणाले.
‘‘गोव्याचे विधानसभा संकुल गेल्या २५ वर्षांपासून लोकशाहीच्या प्रवासातील साक्षीदार आहे. या संकुलात या २५ वर्षांत लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, कायदे करण्यात आले, धोरणे ठरविण्यात आली. त्याचा जनतेला फायदा मिळाला’’, असे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू म्हणाले. ‘‘विधानसभेत विरोधी आमदारांची भूमिका महत्त्वाची असते. सरकारला प्रश्न विचारून जनतेचे प्रश्न सोडविणे हे त्यांचे काम असते. त्यासाठी त्यांनी काम केले पाहिजे’’, असेही त्यांनी सांगितले. सोबतच, ‘‘लोकशाही बळकट करण्यासाठी राज्याचा आर्थिक, पायाभूत साधनसुविधांच्या बाबतीत विकास घडवून आणणे महत्त्वाचे आहे’’, असेही राज्यपालांनी नमूद केले.
सभापती गणेश गावकर यांनी प्रास्ताविक केले. मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मनोगत व्यक्त केले, तर उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आभार मानले. या कार्यक्रमात गोवा विधानसभा आणि सचिवालयाच्या इमारतीचे चित्रण असलेली विशेष ‘माय स्टॅम्प’ आणि विशेष टपाल आवरण जारी करण्यात आले.
अन्य राज्यांतील कामगारांना गोव्यात मिळतोय रोजगार
‘‘गोवा लहान राज्य असले, तरी या राज्याने इतर राज्यांतील कामगारांना रोजगार आणि दोन वेळचे अन्न दिले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गोव्याची परंपरा आहे. त्याचा फायदा इतर राज्यांतील कामगारांना होत आहे. लहान राज्य असल्याने गोव्यातील लोकप्रतिनिधींचा मतदारांशी जवळून संबंध येतो. त्यामुळे त्यांची जबाबदारीही वाढते’’, असेही ओम बिर्ला म्हणाले.
विधानसभांमध्ये तंत्रज्ञान वापरा!
‘‘विधानसभांमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील अंतर कमी होते. त्यातून जनतेचा विकास होतो. गोव्यासह इतर सर्वच राज्यांनी अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देणे गरजेचे आहे. विधानसभेत अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने लोकशाही सुदृढ होते. त्यामुळे प्रत्येक राज्याने विधानसभा श्रेष्ठ बनविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा’’, असे आवाहन ओम बिर्ला यांनी केले.
‘विकसित भारत-२०४७’ स्वप्नपूर्तीत योगदान
‘‘विकसित भारत-२०४७’चे स्वप्न साकार करण्यात गोवा विधानसभेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने यात राज्यातील युवक, महिला तसेच तळागाळातील जनतेची भागीदारी महत्त्वपूर्ण आहे’’, असेही ओम बिर्ला यांनी यावेळी नमूद केले.
माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी गोवा विधानसभेला देशातील पहिली ई-विधानसभा बनविली. शिवाय विधानसभेचे कामकाजही राजभाषा कोकणीतून सुरू केला. तळागाळातील जनतेचा विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने विधानसभेत अनेक कायदे केले. त्याचा गोमंतकीय जनतेला मोठा फायदा होत आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.