

धो धो आश्वासने!
जलवाहिन्यांतून पाणी येण्यापेक्षा आश्वासनेच अधिक वेगाने वाहताना दिसतात. गोव्यात आता पुढील वर्षापासून २४ तास पाणीपुरवठ्याचे नवे स्वप्न दाखवण्यात आले आहे. वर्षानुवर्षे पाण्याची गळती, अपुरा पुरवठा, कमी दाब आणि अनेक भागांत ठराविक वेळेपुरतेच येणारे पाणी यामुळे नागरिक हैराण असताना, मंत्री महोदयांनी पुढील वर्षी २४ तास पाणी देण्याचा दावा केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात एकच प्रश्न, आधी नळाला नियमित पाणी येऊ द्या, मग चोवीस तासांचे स्वप्न दाखवा! उन्हाळ्यात टँकरच्या मागे धावणाऱ्या आणि पावसाळ्यात गढूळ पाण्याची चिंता करणाऱ्या गोमंतकीयांना आता आश्वासनांच्या धबधब्यात न्हाऊ घालण्याचा हा नवा प्रयोग किती यशस्वी होतो, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मगोचा सर्व्हे
मगो पक्षाने विधानसभा निवडणूकपूर्व सर्वे केला जात असल्याचे जाहीर केले आहे. भाजपसोबत सत्तेत असलेल्या या पक्षाने साखळी, डिचोलीतही सर्वे करण्याचे ठरवल्याचे त्या पक्षाचे इरादे काही ठीक नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मंगळवारी होती. मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांना फोंड्यातील गैरप्रकार आताच लख्खपणे दिसू लागल्याचेही त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. त्यांनी या सर्व्हेत फोंड्यात मगो सर्वांत पुढे असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युती धर्म तो हाच काय, असा प्रश्न भाजपच्या धुरिणांना पडणे साहजिक आहे.
कुशावतीची युवा पिढीही शिकली राजकारण?
‘फुडले जोत वता, तशे फाटले वता’ अशी कोकणीत म्हण आहे. गोमंतकीय राजकारण्यांनी देशाला शिकवलेले पक्षांतराचे आणि आयाराम-गयारामचे राजकारण आता कुशावतीतील युवा पिढीही शिकू लागली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांना यंदा याच राजकीय रंगामुळे चांगलीच रंगत आली. केपे महाविद्यालयातील काही विजयी विद्यार्थ्यांनी रोहन गावस, तर काहींनी आमदार निलेश काब्राल यांच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. दोन्ही बाजू खूश! काणकोणमध्येही वेगळे चित्र नाही. काही विद्यार्थ्यांनी मंत्री रमेश तवडकर यांच्यासोबत फोटोसेशन केले, तर दुसऱ्याच दिवशी काहींनी काँग्रेस समर्थक असल्याचे सांगत पत्रकार परिषद घेतली. म्हणजे विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीतही आता ‘कोणाचा झेंडा?’ याचीच स्पर्धा सुरू झाल्याची कुजबुज आहे. राजकारण्यांकडून विद्यार्थी राजकारण शिकले की विद्यार्थ्यांनीच राजकारण्यांना नवा धडा दिला, हे मात्र कळायला मार्ग नाही!
विजय - पाटकर अभेद्य युती
विधानसभा अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडावेत यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांकडे सगळेच लोक येतात. पण, एका पक्षाचा पदाधिकारी हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावेत यासाठी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांकडे न जाता दुसऱ्या पक्षाच्या आमदाराकडे गेला तर त्याला काय म्हणायचे? सोमवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आपले प्रश्न घेऊन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्याकडे आल्याने हा प्रश्न सर्वांनाच पडल्याशिवाय राहिला नाही. काँग्रेसचे सध्या तीन आमदार आहेत, तरीही पाटकर यांना त्यांची आठवण न येता विजयची आठवण का म्हणून यावी? विजयकडे झालेल्या भेटीत काहीच राजकारण नाही, असे पाटकर म्हणतात. पण त्या दोघांत कसली छुपी युती तर झालेली नाही ना?
मराठ्यांची आंदोलन समिती!
‘टेढ़ी उँगली से घी नहीं निकलती’ असे हिंदीत वाक्य आहे. आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय जनतेच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, हे गणित आता जनतेला समजले असल्यामुळे आंदोलने वाढली. कोण आरक्षणाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहे, तर काही लोक आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागले आहेत. सरकारची मात्र यात ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी अवस्था झाली आहे. देशात सध्या ‘आरक्षण हटाव’ आंदोलन सुरू आहे. गोव्यात राजकीय आरक्षणाचा वाद आहेच. सरकारच्या निर्णयाविरोधात काही समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर आरक्षणाच्या समर्थनात ‘एसटी’ संघटना आग्रही आहेत. राज्यातील मराठा समाज संघटनेच्या आमसभेत म्हणे, आरक्षणाचा विषय बराच गाजला. समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजातील नेत्यांच्या ‘नरो वा कुंजरो वा’ नीतीबद्दल संताप व्यक्त केल्याची खबर आहे. एवढेच नव्हे, समाजाच्या आमसभेत म्हणे आरक्षणविरोधी आंदोलनाच्या विषयावर पुढील दिशा ठरविण्यासाठी खास समितीचे गठन करण्यात आले. आता पाहूया, त्यांची पुढील भूमिका काय असेल ते.
राजकीय महत्त्वाकांक्षांना सुरूंग
बहुचर्चित जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी), मंगळवारी धडक कारवाईचा बडगा उगारला असून, म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापे टाकल्याने राजकीय वर्तुळात जोरदार कुजबुज सुरू झाली. तारक आरोलकर सध्या पोलिस कोठडीत असतानाच ईडीच्या या एंट्रीमुळे अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले. एरवी, सत्ताधाऱ्यांशी त्यांची चांगलीच उठबस आणि घट्ट हितसंबंध असल्याचे बोलले जायचे; मात्र या ताज्या कारवाईमुळे हे सर्व दावे फोल ठरल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, या छाप्यांनंतर त्यांचे हितचिंतक आणि निकटवर्तीय मात्र पुरते हवालदिल झाले असून, तपास अधिकाऱ्यांच्या रडारवर पुढचा नंबर कोणाचा, या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच आगामी निवडणुकीच्या तयारीत असलेल्या तारक यांच्या या कारवाईमुळे आणि अटकेमुळे राजकीय भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘एनएसयूआय’चा विश्वासघात झाला?
काणकोणमधील श्री मल्लिकार्जून आणि चेतन मंजु देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळावर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी फोटो काढला आणि एनएसयुआय पुरस्कृत पॅनल निवडून आल्याचा दावा केला. मात्र, हा दावा मंडळाने खोडून काढला. दुसऱ्यांच्या विजयाची माळ आपल्या गळ्यात घालून घेण्याचा हा कसला अट्टाहास? या प्रकारामुळे इतर विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’ची अक्षरशः थट्टा करत आहेत, परंतु एनएसयूआय म्हणते आमचा घात केला. जनरल सेक्रेटरीच्या निवडणुकीत आम्ही आमचा प्रतिनिधी उतरवला नाही, कारण बिनविरोध निवडलेल्या उमेदवाराने आम्हाला शब्द दिला होता. राजकारणात घातपात होतातच, हे माहीत असूनही ‘एनएसयूआय’ नेतृत्वच कमी पडले म्हणावे लागेल. भाजप पक्षाने आपल्या संघटनांना महाविद्यालयीन, विद्यापीठ निवडणुका गांभीर्याने घेण्यास सांगितले आहे आणि काँग्रेसला मात्र काहीच पडून गेलेले नाही, ही मोठी शोकांतिका. गोव्यातील एक महत्त्वाची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयला आपला अध्यक्ष निवडता आलेला नाही.
बाशिंग बांधून तयार आम्ही...
मी तयार आहे, निवडणूक लढवण्यास, अशा घोषणा वल्गना केल्या म्हणून कोणाला एखादा पक्ष तिकीट देईल, याची शाश्वती नसते. पक्षाची तयारी असायला नको का? ही तिकीट म्हणजे कदंबची तिकीट देण्याइतपत सोपी नव्हे. राजकारणात चाणक्यनीती, कूटनीती, शकुनीनीती असे डावपेच रचावे लागतात. शह-काटशह देऊन सोंगट्या हलवाव्या लागतात आणि ते सर्व माफ असतं. गोव्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या आगामी गोवा भेटीमुळे निवडणुकीचं वातावरण चवथीच्या वातावरणाइतकंच गियरमध्ये पडत आहे. गोव्याचं साक्षरता प्रमाण फार उच्च. शिकलेले लोक. हे सायलंट मतदार नव्या विधानसभेचा आकृतीबंध कसा घडवतील, याचा अंदाज करणं कठीण. कारण मतदारांनी अनेकदा आपला कौल असा दिला आहे की राजकीय विश्लेषकांनी तोंडात बोटे घातली आहेत. ‘इनफ इज इनफ’. बघू.
‘जना’ ला आनंद
काणकोण महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत ‘एनएसयुआय’ आणि ‘जनसेना’च्या पॅनलने बाजी मारली. त्यामुळे विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर काणकोणमधून लढवण्यास इच्छूक असलेल्या चेतन देसाई आणि जनासेनाचे प्रमुख जनार्दन भंडारी भलतेच आनंदी झाले. २०२२ मध्ये काँग्रेसने काणकोणमध्ये उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता. चोडणकर पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भंडारी यांनी पक्षाच्या कामात स्वत:ला झोकून देत, तरुणाईला संघटित करण्याचे कामही सुरू केले आहे. तर, चेतन देसाई यांनीही उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. पण, काणकोणची उमेदवारी या दोघांतील एकाला मिळणार? की गिरीश वेगळ्याच व्यक्तीचा शोध घेणार? पाहून पुढे
राधारावांचे तीर नेमके कुठल्या दिशेने?
नुवे मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारीची बोली लावली असून ४ कोटी रुपये कोण देणार त्याला काँग्रेस उमेदवारी देणार, असा आरोप आज राधाराव ग्रासियस यांनी केला आहे. यापूर्वी राधाराव यांनी नुवे मतदारसंघातील क्लब्सवर देणग्यांचा पडणारा पाऊस हा मतदारसंघ एसटीसाठी राखीव ठेवण्यात येणार अशी हूल उठल्यावर बंद झाला, असा पोस्ट आपल्या फेसबुकवर टाकला होता. सध्या राधाराव अशी राजकीय फटकेबाजी मोठ्या नेटाने करत आहेत. मात्र, त्यांचा रोख नेमका कुणावर आहे ते मात्र कळत नाही बुवा!
अशीही कचराकुंडी
पुलावरून कचरा फेकणे म्हणजे जणू आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी सार्वजनिक जागेला कचरापेटी समजण्याचा नवा शिष्टाचारच काहींनी अंगीकारला आहे. मात्र, कुठ्ठाळीतील एका रहिवाशाने मंगळवारी अशाच प्रकारे कचरा फेकणाऱ्या इसमाला चांगलेच धारेवर धरत, ‘हा पूल तुमच्या घरामागची कचराकुंडी आहे का?’ असा सवाल केला. पुलावरून कचरा फेकताना परिसराचे सौंदर्य आणि स्वच्छतेची आठवण झाली नाही, पण रहिवाशाने जाब विचारताच ‘स्वच्छतेची घंटी’ मात्र जोरात वाजली. आता कचरा फेकण्यापूर्वी हात थांबतो की नाही, यावर या नागरिकाची मेहनत वाया गेली की सत्कारणी लागली, हे ठरणार आहे.
नगराध्यक्षांचीच ‘बॅटरी’ गायब!
चोरटे काय चोरतील, याचा नेम नाही! गोव्यात चोरीचे प्रकार वाढत असतानाच कुंकळ्ळीत चोरट्यांनी भलताच प्रताप केला. नगरपालिकेच्या आवारात नगराध्यक्षांची ‘ऑन ड्युटी’ कार उभी होती. चोरट्यांनी थेट कारची बॅटरीच लंपास केली. चालकाने कार सुरू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कार सुरू होईना. तपास केला असता बॅटरीच गायब असल्याचे लक्षात आले. आता नगरपालिकेच्या आवारात नगराध्यक्षांचीच गाडी सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्यांच्या वाहनांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांना ही गाडी नगराध्यक्षांची आहे, हे माहीत नव्हते की माहीत असूनच ‘नेमका निशाणा’ साधला, याचीही कुजबुज सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून आता काय समोर येते, हे कळेलच. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले आहेत. काहींची तर झोपच उडाली म्हणे.
सिग्नल बंद, पण कॅमेऱ्यांची नजर सुरू?
पर्वरी ते पणजीच्या मार्गावर महत्त्वाचे सिग्नलच बंद पडलेले दिसत असल्याने वाहनचालकांमध्ये सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. रोज सिग्नल पाहून गाडी थांबवायची सवय असलेल्या चालकांना आता सिग्नलऐवजी वाहतूक पोलिसांचा हात पाहावा लागत आहे. पण खरी धाकधूक दुसरीच! सिग्नल बंद असला तरी कॅमेरा सुरू आहे की बंद, हे कळणार कसे? सिग्नलने ‘गो’ म्हटले म्हणून पुढे जायचे आणि नंतर कॅमेऱ्याने ‘चलन’ म्हटले तर? त्यामुळे वाहनचालकांची चर्चा अशी, ‘सिग्नल बंद आहे हे सरकारला दिसत नसेल, तर कॅमेऱ्याला मात्र आम्ही दिसतोय का?’ सरकारने आता सिग्नल बंद असताना कॅमेरेही बंद आहेत की अजूनही ‘ऑन ड्युटी’वर आहेत, एवढे तरी स्पष्ट करावे.
कॅमेऱ्याची नजर, टॅक्सीवाल्यांची कसरत
टॅक्सी चालकांच्या गप्पांमध्ये सध्या एक विषय चांगलाच रंगतोय. तो म्हणजे, कॅमेऱ्यांची नजर आणि चलनांचा मारा! गाडीने थोडा जरी वेगाचा टप्पा ओलांडला की मालकाच्या मोबाईलवर चलन हजर आणि पार्किंगच्या रेषेबाहेर गाडीचे चाक जरा जरी गेले तरी कॅमेऱ्याची नजर चुकत नाही म्हणे. त्यामुळे दिवसभर टॅक्सी चालवून मिळणाऱ्या पैशातून नेमकं घर चालवायचं की चलन भरायचं, असा प्रश्न चालक-मालकांना पडला आहे. सरकारने कॅमेरे बसवले, पण सर्वाधिक ‘नुकसान’ सध्या टॅक्सीवाल्यांनाच होत असल्याची मिश्किल चर्चा सुरू आहे.
तानावडेंची नवी ‘इनिंग’
गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. या पदावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक १६ वर्षे होते. तानावडे सूत्रे स्वीकारण्याच्या सोहळ्याला श्रीपाद नाईक हे हजर नव्हते. कदाचित पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे तसे झाले असावे. मात्र, त्याची दखल उपस्थितांनी घेतली. ‘भाऊ का आले नाहीत?’ अशी दबक्या आवाजातील चर्चा तेथे ऐकू येत होती. श्रीपाद नाईक कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर तानावडेंच्या सूत्रे स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला शोभा आली असती. मावळत्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत नव्या अध्यक्षाने सूत्रे स्वीकारणे म्हणजे निवडणुकीत पराभूत करून विजय मिळवण्यासारखेच आहे, असा सूर यानिमित्ताने ऐकू आला.
फोंडा मतदारसंघ कोणाचा?
माजी आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्याच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट सुटण्याचे नावच घेताना दिसत नाही.या निधनामुळे जाहीर झालेली पोट निवडणूक ऐनवेळी रद्द झाल्यामुळे सध्या फोंड्याला आमदारच नाही. त्यामुळे दाव्या-प्रति दाव्यांना ऊत येऊ लागला आहे. फोंड्यात आपले वर्चस्व असल्याचा दावा मगो पक्ष करताना दिसत असून भाजपही त्यात मागे नाही. दुसऱ्या बाजूला भाजप-मगोच्या या ‘तू तू मै मै’मध्ये आपली पोळी भाजली जाणार असल्याची स्वप्ने काँग्रेस रंगवताना दिसत आहे. पण या सर्वांत फोंड्यातील प्रत्येक मताला किंमत प्राप्त झाली असून पुढील चार-पाच महिने तरी फोंडेकरांची स्थिती ‘चित भी मेरा और पट भी मेरी’ अशी असणार आहे, एवढे मात्र निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.