

पेडणे: मालमत्तेच्या वादातून बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून एका महिलेला तसेच तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार मांद्रे परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिलेला शिवीगाळ व मारहाण करण्यासह तिच्या मोबाईलची मोडतोड करून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केल्याचा तसेच महिला व तिच्या अल्पवयीन मुलाला खोलीत कोंडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मधलामाज-मांद्रे येथील एका महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची माहिती दिल्याचे नोंदीत नमूद आहे. तक्रारीमध्ये ६ मे ते ५ जून २०२६ या कालावधीशी संबंधित घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुचिता म्हामल, तिचा भाऊ मांगीश चोडणकर (रा. तार-शिवोली), सुचिताची मुलगी, सुचिताची बहीण किशोरी व तिचा पती किशोर (दोघेही रा. शिवोली), मनीषा हरमलकर (रा. मधलामाज-मांद्रे) यांच्यासह दोन अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरुषाचा उल्लेख पोलिस नोंदीत आरोपी म्हणून करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलाचा या घटनेत समावेश असल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसोबत गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट २००३ मधील कलम ८ अंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, हे सर्व आरोप तक्रारीच्या आधारे नोंदविण्यात आले असून त्याची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. मांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास हाती घेतला आहे.
अश्लील व अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ
पोलिस तक्रारीतील आरोपानुसार, मालमत्तेच्या वादातून संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून तक्रारदार महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर महिलेला अश्लील व अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यात महिलेला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाईल हँडसेटची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
मारहाणीत मुलाला दुखापत
या प्रकरणात तक्रारदार महिलेच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. त्याला चारही बाजूंनी घेरून त्याचा मार्ग अडवण्यात आला तसेच त्याला थपडा व ठोशांनी मारहाण करून दुखापत केली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. तक्रारदार महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याचे व गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली. त्यानंतर दोघांना एका खोलीत कोंडून ठेवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.