

पणजी: आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला पोक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि १ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पीडित मुलीने शाळेत मैत्रिणीला आणि शिक्षिकेला हा प्रकार सांगितला होता. एका भाड्याच्या खोलीत संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना आरोपी वडील रात्री तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत असे.
मुलीने विरोध केला आणि मासिक पाळी सुरू असल्याचे सांगितले, तरी त्याने अत्याचार सुरूच ठेवले. पीडितेने आईला का सांगितले नाही, असे विचारले असता, ‘घरचे माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत’ अशी भीती तिने व्यक्त केली होती. यानंतर शाळेतील शिक्षिकेने पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार नोंदविली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने १४ साक्षीदारांची तपासणी केली. मुलीने दिलेल्या जबानीवर बचाव पक्षाने उलटतपासणी घेतली; परंतु तिच्या साक्षीत अजिबात तफावत आढळली नाही. न्यायालयाने तिची साक्ष विश्वासार्ह मानली. वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराचे पुरावे आढळले. बचाव पक्षाने ‘मुलीचे शेजारच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि वडिलांनी विरोध केल्याने तिने खोटी तक्रार दिली’, असा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळला.
आरोपीला ठोठावलेली शिक्षा
भारतीय न्यायसंहिता कलम ६४ : २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम ४ : १० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम ६ : २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड.
पोक्सो कायदा कलम ८ : ३ वर्षे साधी कैद व १० हजार रुपये दंड.
शिक्षेतील सवलतही फेटाळली
आरोपी हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याचे सांगत शिक्षेत सवलत देण्याची विनंती बचाव पक्षाने केली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळली. हा गुन्हा अत्यंत घृणास्पद असून याने समाजाच्या विवेकबुद्धीला धक्का दिला आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश समाजात गेला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.