

डॉ. नाऊ वरक
एम. के. शेख यांना ९ सप्टेंबर रोजी काँग्रेसने गोवा फॉरवर्डशी युतीची बोलणी करण्यासाठी सरदेसाई यांच्याकडे पाठविले होते. ज्या एम. के. शेखांमुळे सरदेसाई यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता, त्याच शेख यांनी सरदेसाई यांची घरवापसी करावी, असे काँग्रेसला वाटत आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीला दहा महिने असताना विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष अधिकृतरित्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. १९ मार्च २०१९ ला ज्यावेळी प्रमोद सावंत हे मनोहर पर्रीकर यांचे उत्तराधिकारी झाले, त्याचवेळी ही युती संपल्यात जमा होती. गोवा काँग्रेसचे तत्कालीन महासचिव विजय सरदेसाई यांना २०१२ ची विधानसभा निवडणूक फातोर्डा मतदारसंघातून लढवायची होती. मात्र मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून एम. के. शेख यांना काँग्रेस ‘हायकमांड’ने फातोर्डाचे तिकीट दिले.
स्वतः सोनिया गांधी फेब्रुवारी २०१२ मध्ये शेख यांच्या प्रचारासाठी फातोर्ड्यात आल्या. शेख यांना फक्त ६६० मते मिळाली. अपक्ष सरदेसाई यांनी १९३९ मतांनी भाजपच्या दामू नाईक यांचा पराभव केला. याच एम. के. शेख यांना ९ सप्टेंबर रोजी काँग्रेसने गोवा फॉरवर्डशी युतीची बोलणी करण्यासाठी सरदेसाई यांच्याकडे पाठविले होते. ज्या एम. के. शेखांमुळे सरदेसाई यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्याच शेख यांनी सरदेसाई यांची घरवापसी करावी, असे काँग्रेसला वाटत आहे.
एका बाजूने भाजपने विकासकामांच्या उद्घाटनांची सुरुवात जोमाने सुरू केली आहे. तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्या युतीच्या रेशीमगाठी जुळत नसल्याचे दिसते. पर्वरीतील उन्नत मार्गाचे उद्घाटन मतदारांवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. गृहआधार योजना व दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणारी वाढीव रक्कमही मतदारांना भाजपकडे आकर्षित करेल. मार्च २०२३ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १००० रुपयांची मदत जाहीर केली.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने २३० जागांपैकी १६३ जागा जिंकल्या. मध्यप्रदेशातील २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतही सर्व २४ जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसने निवडून आल्यास ‘नारी सम्मान’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच घरगुती गॅस ५०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते.
महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला( काँग्रेस १३, शिवसेना-उबाठा ९ व राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार ८) ४८ जागांपैकी ३० जागांवर विजय मिळाला. तर भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीला अनुक्रमे ९ व ७ जागांवर संंतुष्ट व्हावे लागले. मध्यप्रदेशप्रमाणेच महायुतीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीअगोदर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ऑगस्ट २०२४ पासून राबविली. याचाच अभूतपूर्व परिणाम म्हणून नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागांपैकी २३७ जागा जिंकली. याच धर्तीवर भाजप गोव्यातही प्रयत्न करत आहे.
गणेश चतुर्थीनंतर लगेचच गृह आधार योजना व दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत ५०० रुपयांची वाढ करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. गोवा उज्वला योजनेअंतर्गत वार्षिक ३ घरगुती गॅस सिलिंडर देण्याचे कामही ५ सप्टेंबर २०२६ पासून मार्गी लागल्याचे दिसते. या तिन्ही योजना आगामी निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरणार आहेत. अशा परिस्थतीतीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड मधील कलहाचाच आवाज दिवसेंदिवस वाढत आहे.
२०१२ नंतर विजय सरदेसाई यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांनी मनोहर पर्रीकरांचे मुख्य विरोधक म्हणून काम केले. २००७ च्या निवडणुकीत दिगंबर कामत विरुद्ध मनोहर पर्रीकर अशी लढत पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे २०१२ ते २०१७ हा कालखंडात सरदेसाई विरुद्ध पर्रीकर असे समीकरण होते. मात्र, २०१७ च्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस व सरदेसाई यांमधील वाद चिघळला. मनोहर पर्रीकरांच्या संगनमताने त्यांनी थेट भाजपशी युती केली. काँग्रेसच्या जडणघडणीतून नेते झालेले सरदेसाई भविष्यात त्रासदायक ठरतील म्हणून भाजप या युतीकडे तात्पुरती योजना समजत होता.
भाजपमध्ये ते किती काळ टिकतील यावरही बऱ्याचजणांना शंका होती. त्यामुळे भाजप काँग्रेसमधून एखादे घाऊक पक्षांतर घडेल या अपेक्षेत होता. काँग्रेसमधून पक्षांतर होऊ शकते याची अनेकांना खात्री होती. याच काळात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर होते. पर्रीकरांच्या निधनानंतर काँग्रेसच्या १० आमदारांनी जुलै २०१९ मध्ये पक्षांतर केले.
‘गोवा प्रथम’ या मुद्द्यावर तिसऱ्या आघाडीची सध्या चर्चा सुरू आहे. या तिसऱ्या आघाडीत ‘रेव्होल्यूशनरी गोवन्स’ हा पक्षाचा समावेश नाही. अशा तिसऱ्या आघाडीमुळे काँग्रेस किंवा गोवा फॉरवर्डला राजकीय फायदा होईल याची शक्यता कमी आहे. तसेच अशा निवडणूकपूर्व तिसऱ्या आघाडीवर मतदार विश्वास ठेवणार नाहीत व त्याचा फायदा भाजपलाच होईल. २०२१ नंतर गोव्यातील राजकारण प्रमोद सावंत गट आणि विजय सरदेसाई गट यांमध्ये विभागले गेले. राजकीय पक्षांपेक्षा या दोन व्यक्तींमधील शाब्दिक चकमकींनी गोव्यात वैचारिक ध्रुवीकरण झाले. काँग्रेसने हे ध्रुवीकरण सामावून घ्यायला हवे होते. रेवडी संस्कृती आणि महागाई या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेसला पक्षाचे बळ वाढविण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे भाजपला प्रमोद सावंतांशिवाय गत्यंतर नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसला विजय सरदेसाईंशिवाय पर्याय नाही.