

युरी विरोधक आक्रमक!
राजकारणात यश टिकविणे अवघड असते, असे म्हणतात ते खरेच. जनता कधी आपला कल बदलणार, हे सांगता येत नाही. कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासाठी कुंकळ्ळी मतदारसंघ ‘सेफ’ आहे, असे कालपर्यंत वाटत होते. मात्र, युरी आलेमाव यांच्या विरोधात अनेक जण आता पुढे येत आहेत. युरींच्या विरोधात विरोधक आता बरेच आक्रमक झाले आहेत. जरी प्रत्यक्ष ग्राउंड स्तरावर विरोध दिसत नसला, तरी समाजमाध्यमांवर युरी यांच्या विरोधात आवाज बुलंद व्हायला लागला आहे. माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स व माजी पोलिस अधीक्षक सॅमी तवारीस, कुंकळ्ळी ट्रेडर्स संघटना, स्थानिक भाजप मंडळ व इतर अनेक जण युरी यांच्या विरोधात बोलायला लागले आहेत. युरी यांच्या आमदारकीवर व कामाच्या पद्धतीवर टीका व्हायला लागली आहे. आता हा विरोध केवळ समाजमाध्यमांपुरता मर्यादित राहतो की निवडणुकीच्या वेळी उद्रेक होऊन बाहेर येतो, हे पहावे लागणार.
दीपक पाऊसकर सज्ज
विधानसभा निवडणूक फक्त सहा महिन्यांवर पोहोचलेली असताना सावर्डे मतदारसंघात सध्या वातावरण तापले आहे. भाजप उमेदवारीसाठी तिघेजण शर्यतीत असताना, दुसऱ्या बाजूने माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी आपण गोवा फॉरवर्ड पक्षाच्या संपर्कात आहोत, असे स्पष्ट करत आपली भूमिका मांडली. मीराबाग बंधारा आंदोलनाच्या वेळी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सावर्डे मतदारसंघात जाऊन आपला पाठिंबा जाहीर केला, तेव्हाच सावर्डे मतदारसंघावर गोवा फॉरवर्डने लक्ष केंद्रित केले आहे, हे स्पष्ट झाले होते. आता त्यांच्या गळाला दीपक पाऊसकर यांच्यासारखा मोठा मासा लागल्याने सावर्डेही फॉरवर्ड होणार का, हे आता पाहावे लागेल. तूर्तास दीपक पाऊसकर सावर्डेत सज्ज झाले आहेत, एवढे मात्र खरे!
‘मांडवी एक्स्प्रेस’चा बर्थडे!
रेल्वेचाही वाढदिवस असतो का, असा प्रश्न कुणाला पडू शकतो. पण कोकण रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या मांडवी एक्स्प्रेसचा २७ वा वाढदिवस ७ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ७ जून १९९९ रोजी मुंबई-गोवा-कोकणला वेगवान आणि विश्वासार्ह जोडणी देणाऱ्या या लोकप्रिय गाडीने लाखो प्रवाशांच्या आठवणी, आनंदाचे क्षण आणि प्रवासकथा आपल्या डब्यांत जपल्या आहेत. मडगाव स्थानकावर सकाळी केक कापून या ‘वाढदिवसा’चा आनंद साजरा केला जाणार आहे. माणसांप्रमाणेच एका रेल्वेगाडीचा वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी परंपरा रेल्वेप्रेमींसाठी आकर्षण ठरणार असून, मांडवी एक्स्प्रेसबद्दलच्या जिव्हाळ्याची ती सुंदर अभिव्यक्ती मानली जात आहे.
‘एसजीपीडीए’ मार्केट
मडगावमधील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट म्हणजे भाजपचे ‘एटीएम’च. हे मार्केट बंद म्हणजे एटीएम चालू आणि मार्केट सुरू केल्यास एटीएम बंद, असा त्याचा अर्थ असल्याचे आमदार विजय सरदेसाई सांगतात. हे मार्केट भाजप सरकार असेपर्यंत सुरू होणार नाही. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा हे मार्केट सुरू होईल; तोपर्यंत नाही, असे विजयबाब सांगतात. कित्येक कोटी रुपये खर्चून बांधलेली घाऊक मासळी मार्केटची इमारत आणि त्याचे उद्घाटन न होणे म्हणजेच सरकारच्या अनागोंदी कारभाराचे एक उदाहरण आहे, असे नागरिक आता बोलू लागले आहेत. तिथे स्वच्छता नाही. दररोज सोपो गोळा केला जातो. मात्र, नेमकी ही रक्कम कुठे जाते याबद्दलसुद्धा प्रश्न आता विचारू लागले आहेत.
कौतुकची चर्चा
काँग्रेस पक्षाचे कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर यांचा वाढदिवस शुक्रवारी प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत साजरा झाला. वेरेकर यांनी सकाळी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते, तर दुपारी केक कापण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर खास मेजवानीचे आयोजन केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत फोंड्यात काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी राजेशबाब कामाला लागले आहेत, अशी चर्चा असतानाच फोंड्यात स्व. केतन भाटीकर यांचे बंधू कौतुक भाटीकर हे काँग्रेस तिकिटाच्या शर्यतीत असल्याचे पिल्लू कुणीतरी सोडले. काँग्रेसच्या आमदारांचे समर्थन कौतुक भाटीकरांना आहे, असा दावाही खबऱ्याने वेरेकरांच्या वाढदिवसाला हजर असलेल्यांसमोर केला. आता यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल.
वेंझीचे बाणावलीवरच लक्ष
आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांचा पूर्वी संपूर्ण गोव्यात वावर असायचा. राज्यस्तरीय प्रतिमा असलेला नेता अशी त्यांची ओळख निर्माण होत होती. मात्र, हल्लीच्या दिवसांत त्यांनी गोवाभर सुरू असलेला आपला संचार बंद करून फक्त बाणावलीवरच लक्ष केंद्रित केले आहे. या दिवसांत वेंझी बाणावलीच्या बाहेर फारशा कार्यक्रमांना जात नाहीत. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल हे गोव्यात आले तेव्हाही वेंझी त्यांच्याबरोबर दिसले नाहीत. सध्या बाणावलीवर मिकी आणि चर्चिल या दोघांनीही आपले लक्ष केंद्रित केले आहे. नाही म्हटले तरी या दोन्ही नेत्यांकडे अजूनही या मतदारसंघात बरेच समर्थक आहेत. अशा परिस्थितीत बाणावलीवरील लक्ष कमी झाल्यास त्याचा आपल्याला फटका बसू शकतो, असे वाटल्यामुळे वेंझी यांनी हा निर्णय घेतला तर नवल नाही.
जुने भाई, नवे टेन्शन!
एकेकाळी काही जणांच्या नावाने परिसरात धाक होता. गँग, कट्टे, बंदुका आणि भाईगिरी याशिवाय त्यांची ओळखच नव्हती. कालांतराने अनेकांनी तो मार्ग सोडला, संसार थाटला. काही तर समाजात मानाची माणसे म्हणून वावरू लागली. पण लोक म्हणतात, माणूस सुधारला तरी त्याच्या जुन्या आठवणी आणि काही ठिकाणी जुनी हत्यारे मात्र तशीच राहिली की काय? म्हापसा आणि शिरगाव येथे बंदुकीच्या गोळ्यांच्या घटनांनंतर पुन्हा एकदा जुन्या चर्चा रंगू लागल्या आहेत. माणूस सुधरतो, पण कपाटाच्या वरच्या माळ्यावर पडलेली वस्तू सुधारतेच असे नाही! त्यामुळे आता पोलिसांसमोरही एक वेगळे आव्हान उभे राहिले आहे. जे कालचे भाई आज सज्जन नागरिक झाले आहेत, त्यांच्याकडील जुनी हत्यारे शोधून जप्त करण्यासाठी पोलिस नेमकी कोणती युक्ती वापरणार, याची उत्सुकता वाढली आहे. काही जण तर गंमतीने म्हणतात, "पूर्वी पोलिसांना भाई शोधावे लागत होते, आता भाई सापडलेत; पण त्यांची हत्यारे कुठे आहेत, हे शोधावे लागणार!
चर्चिल गिरीशवर खूश!
राजकारणात कधी काय घडणार, हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर या दोघांनाही यापूर्वी राजकीय विरोधक म्हणून ओळखले जायचे. मात्र, चर्चिल आलेमाव यांनी आपली कन्या वालंका आणि पुत्र सावियो यांच्यासह गिरीश चोडणकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदनही केले. यामागचे कारण तसे उघड आहे. चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका ही यावेळी पुन्हा एकदा नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून, काँग्रेसची उमेदवारी तिला मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच आलेमाव यांनी गिरीश चोडणकर यांची स्तुतीही केली. गिरीश चार वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत, त्यावरून त्यांची हुशारी दिसून येते, असे चर्चिल म्हणाले. आमंत्रण दिल्यास आपण काँग्रेसमध्ये सामील होण्यास तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. चर्चिल यांची ही भूमिका त्यांच्या राजकारणाला शोभेशीच म्हणावी लागेल. राजकारणात कधीही कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. यावर चर्चिल यांचा ठाम विश्वास आहेच म्हणा आणि बघूया... या भेटीतून चर्चिल यांच्या हाती काय लागते ते.
सुधीरभाई झळकले तर!
वाढत्या महागाईविरोधात शनिवारी म्हापशात काँग्रेसचा जोरदार आक्रोश पाहायला मिळाला. पक्षाचे बडे नेते आणि स्थानिक मंडळी रस्त्यावर उतरली होती. विशेष म्हणजे, म्हापसा मतदारसंघातून आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या सगळ्याच उमेदवारांनी तिथे हजेरी लावली होती. पण, या सगळ्या गर्दीत खरे आकर्षण ठरले ते सुधीर कांदोळकर! तसे सुधीरभाई काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये फार क्वचितच दिसतात. पण शनिवारची त्यांची उपस्थिती बरेच काही सांगून गेली. गेल्या काही दिवसांपासून ‘भाई लवकरच कमळ हातात धरून भाजपात जाणार,’ अशा जोरदार वावड्या उठल्या होत्या. पण आज थेट सरकारच्याच विरोधात निषेध मोर्चात फलक घेऊन उभे राहत सुधीरभाईंनी तूर्तास तरी विरोधकांच्या तोंडाला कुलूप ठोकले, खरे. आता ही भाईंची काँग्रेसवरील खरी माया आहे की भाजपात जाण्यापूर्वीची फक्त हवेची चाचपणी, हे बघणे म्हापशेकरांसाठी नक्कीच मनोरंजक ठरेल!
बेकायदा शस्त्रे येतात कशी?
म्हापशात एका युवकाने कट्ट्यातून (देशी बनावटीची बंदूक) गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्याच रात्री डिचोलीत शिवसेनेच्या राज्यप्रमुखांवर त्यांच्या पुतण्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये जी शस्त्रे वापरण्यात आली, ती बेकायदेशीर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे युवकाच्या घरी देशी कट्टा आला कोठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याशिवाय डिचोलीतील घटनेत गोळी झाडणाऱ्या संशयित आरोपीकडे आलेली बंदूकही बेकायदेशीर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांवरून राज्यात सर्रासपणे बेकायदेशीर शस्त्रविक्री होत आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अगोदरच राज्यात सर्रासपणे अमली पदार्थांचा विक्री व्यवहार होत आहे. आता बंदूक, कट्टा, पिस्तूलसारखी शस्त्रे जर बेकायदेशीरपणे सहज उपलब्ध होत असतील, तर ती बाब नक्कीच गंभीर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.