Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

Khari Kujbuj Political Satire: कुडचडे मतदारसंघाचे आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपद मिळाले आणि फुटिरांना जागा करून देण्यासाठी मंत्रिपदावर पाणीही सोडावे लागले होते.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

युतीचा आवेश संपला का?

आम आदमी पार्टी आमच्‍याबरोबर येवो अथवा न येवो, आम्‍ही युती करणारच असे म्‍हणत दिवाळीच्‍या पूर्वसंध्‍येस गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि आरजीचे नेते एकमेकांच्‍या हातात हात घालून फातोर्डा येथील व्‍यासपीठावर दिसले होते. मात्र त्‍यानंतर लगेच काँग्रेसने युतीचा निर्णय योग्‍यवेळी घेतला जाईल, असे सांगून अजूनही आपण या युतीसाठी तयार नाही, हे दाखवून दिले. अशातच दोन दिवसांपूर्वी आरजीचे मनोज परब यांनीही, ज्‍यांना पोगो धोरण मान्‍य असेल त्‍यांच्‍याबरोबरच आम्‍ही युती करू असे म्‍हटले. त्‍याला काल गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी उत्तरही दिले. मराठीत एक म्‍हण आहे, ‘नकटीच्‍या लग्‍नाला अठरा विघ्‍ने’ गोव्‍यातील अजूनही न झालेल्‍या विरोधकांच्‍या युतीबद्दल हेच म्‍हणायचे का? ∙∙∙

काब्राल समर्थकांना मंत्रिपदाची आशा!

कुठलेही काम होण्यासाठी तसा वेळ आणि योग यावा लागतो. कुडचडे मतदारसंघाचे आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपद मिळाले आणि फुटिरांना जागा करून देण्यासाठी मंत्रिपदावर पाणीही सोडावे लागले होते. आता ज्या आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना व काही माजी आमदारांना महामंडळे देण्यात आली. नीलेश काब्राल सध्या कोणत्याही पदा शिवाय आहेत. कुडचडेचे काही बुधवंत दावा करतात, की त्यांनी काब्राल यांना कोणतेही पद न देण्यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे काब्राल बिनपदाचे आमदार आहेत, असा काब्राल विरोधकांचा दावा आहे. नीलेश काब्राल यांना मंत्रिपद मिळणार असा विश्वास काब्राल समर्थकांना आहे. दिवंगत मंत्री रवी नाईक यांच्याकडील खाती नीलेश काब्राल यांना मिळणार नीलेश काब्राल यांनी पक्षासाठी केलेल्या त्यागाचे फळ त्यांना जरूर मिळणार, अशी भाबडी आशा काब्राल समर्थकांना आहे. आता बघू तो काळ, तो योग आणि ती वेळ कधी येते.

बाबू नायक मुख्यमंत्री?

मडगावात नेहमीच वेगळ्या प्रकारचे राजकारण चालते. अनेकांनी आजवर त्याचा विदारक अनुभवही घेतला आहे. पण काही व्यक्ती अशा असतात, की त्यांची अनुभवातून शहाणे होण्याची तयारी नसते. संपलेल्या आठवड्यात मडगावातील अशाच एका संघटनेने दिवंगत रवी नाईक यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. त्यांत काहींना बाबू नायकांचीही आठवण झाली. तेथवर ठीक पण त्यांनी १९८० मधील राजकारणाची माहिती देताना त्यावेळी बाबू नायक मुख्यमंत्री होणार होते? असे ठोकून दिले. त्यावेळी बाबू व विली यांच्यात वादात बाबूंनीच राणे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले, हे खरे. त्यानुसार राणे मुख्यमंत्री झाले, पण तरीही बाबू -विली वाद संपला नाही, पण त्यानंतर दोन मंत्र्यांना हटवून बाबू व विलींना मंत्रिपदी बसविले. त्याचा परिणाम १९८५ मधील निवडणुकीत दिसून आला. ही वस्तुस्थिती असताना काहीजण ठोकून देत असतात, हे खरे! पण ते कोणाची खुशामत करण्यासाठी हा प्रश्न रहातोच

मतदारसंघात लुडबुड

सत्ताधारी पक्षातील एक पदाधिकारी पक्षाच्या उत्तर गोव्यातील समितीवर मोठ्या पदावर कार्यरत होता. पण एका कथित प्रकारानंतर त्याला बढती देणे पक्षाकडून टाळण्यात आले. त्याच दरम्यान त्याच्याकडून उत्तरेतील संबंधित मतदारसंघातील प्रभारीपद काढून घेत, त्याच्याकडे किनारी भागातील मतदारसंघाचे प्रभारीपद सुपूर्द करण्यात आले. असे असूनही त्याने आपले लक्ष आपल्या घरच्या मतदारसंघाकडे कायम ठेवत, या मतदारसंघातील लुडबुड कायम ठेवली आहे. किनारी मतदारसंघात त्याचे लक्ष नावापुरते असते! पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी या पदाधिकाऱ्याने सर्व इच्छुकांना उमेदवारीचे आमिष दाखवून हवेत तरंगत ठेवले आहे. त्यांचा हा डाव लक्षात आलेल्या काही इच्छुकांनी त्या पदाधिकाऱ्याला बाजूला सारण्यात यावे, असा जोर पक्षाकडे धरल्याची चर्चा आहे.

Khari Kujbuj Political Satire
Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

बंगल्यांमध्ये राहणारे भाटकार!

विरोधक मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारे भाटकार आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य व गरीब लोकांचे प्रश्न कळणार कसे? असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात. माझे घर योजना ही बंगलेवाल्यांसाठी नाही, असेही मुख्यमंत्री म्हणतात. या विरोधकांची मनोवृत्ती पाड आहे. त्याचमुळे ते या योजनेला विरोध करतात, ही योजना गोमंतकीयांसाठी नाही, अशी विरोधकांची धारणा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. आज रवींद्र भवनात अर्ज घेण्यासाठी ज्या लोकांना आणण्यात आले होते, त्यातील जास्तीत जास्त व त्यांच्या वेशभूषेवरून ते गोमंतकीय वाटत नव्हते. तरी ही योजना गोमंतकीयांसाठीच असे भासविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्ज घेण्यास नाईक, डिसोझा, बोरकर, वाझ या आडनावांच्या केवळ पाच लोकांना मंचावर बोलविण्यात आले. असे विरोधक उलट टिका करताना दिसत होते.

मेट्टींनी वाद का वाढवला?

गोव्यात कन्नडिगांची संख्या मोठी आहे, ती सतत वाढत आहे, हेही खरे. जुवारीनगरात झालेल्या कन्नड सांस्कृतिक उत्सवांतून मात्र एक नवा वाद तयार होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण या उत्सवांत बोलताना कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिध्दण्णा मेट्टी यांनी कन्डिगांना घाटी संबोधू नये, असे केलेले आवाहन. प्रत्यक्षात घाटावरून आलेल्यांना गोव्यात सर्रास घाटी संबोधले जाते, केवळ कन्नडिगांनाच नव्हे, तर गोव्याबाहेरील कोणालाही तसे संबोधले जाते. त्या मागे त्यांना हिणवण्याचा हेतू नसतो. पण काहींना तसे म्हटले की पोटात दुखते. कारण त्यांच्या मनांत असलेला न्यूनगंड असे मानले जाते. गोव्यात आलेले असे परप्रांतीय वेगळे गट तयार करतात, उत्सव करतात व त्यांतून स्थानिकांच्या मनांत तशीच भावना तयार होऊ शकते, याकडे मात्र ते लक्ष देत नाहीत. मेट्टी यांनी निवडणुकीत कन्नडिगांना उमेदवारी देण्याबाबत केलेल्या मागणीमुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या खऱ्या.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

प्रदेशाध्यक्ष दामूंची तंबी, अन्‌ पदाधिकारी!

माजी कृषिमंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार स्‍व. रवी नाईक यांच्‍या निधनामुळे फोंड्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काहीजण भाजप उमेदवारीवर दावा करीत आहेत. त्‍यामुळे फोंड्यातील राजकीय वातावरण तापलेले असल्‍याचे लक्षात घेऊन प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी उमेदवारीवर दावा करणाऱ्यांना अप्रत्‍यक्षरीत्‍या तंबी दिली. उमेदवारीचा स्‍वत:हून दावा करणे किंवा स्‍वत:ची भूमिका मांडणे अशा गोष्‍टींना भाजपात कधीही स्‍थान नसते. असे जे बोलतात त्‍यांना भाजप कळलेलाच नाही, असा त्‍याचा अर्थ होतो. निवडणुकांमध्‍ये उमेदवारी कुणाला द्यायची हे पक्षावर अवलंबून असते. त्‍यात पक्षाचीच भूमिका अंतिम असते, असे ते म्‍हणाले. दामूंनी ही वक्तव्‍ये इतक्‍या आक्रमकपणे नेमकी कुणाबाबत केली असतील? असा प्रश्‍‍न फोंड्यातील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे.

‘झेडपी’बाबत काँग्रेस स्‍वस्‍थ!

गोव्‍यातील झेडपी निवडणूक अवघ्‍या दोन महिन्‍यांवर आलेली असतानाही काँग्रेसने या निवडणुकीबद्दल अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. एकाबाजूने भाजपसह आप, गोवा फॉरवर्ड आणि आरजी पक्षही या निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्‍याच्‍या तयारीत असताना काँग्रेसच्‍या गोटात अजूनही जी शांतता आहे त्‍याबद्दल आश्‍चर्य व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. पन्नासही मतदारसंघात उमेदवार उभे करण्‍याची आमची तयारी आहे, असे काँग्रेस सांगत असली तरी ग्राऊंड लेव्‍हलवर अगदी उदासीनता दिसत आहे. बाकीचे सगळे पक्ष झेडपी निवडणुकीला विधानसभेची सेमीफायनल म्‍हणून पहात असताना, काँग्रेसला या सेमी फायनलमध्‍ये कुठलीही रुची नाही, असे म्‍हणायचे का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com