

पाऊस, प्रदेशाध्यक्ष आणि राजकीय शुद्धीकरण!
पावसाळा सुरू झाला की नद्या वाहू लागतात, ओढे भरू लागतात आणि रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य उघड्यावर येते. पण, यंदाच्या पावसाने आणखी एक गोष्ट वाहून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ती म्हणजे काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची! अलीकडेच पक्षाने प्रदेशाध्यक्ष बदलला आणि योगायोग असा की त्याच सुमारास पावसानेही दमदार हजेरी लावली. बस्स! मग काय, काही उत्साही कार्यकर्त्यांनी या दोन घटनांचा असा संबंध जोडला की ऐकणाऱ्यालाही हसू आवरणे कठीण. त्यांच्या मते, हा काही साधा पाऊस नाही. हा ‘बदलाचा पाऊस’ आहे. जसा पहिला पाऊस पडला की झाडांची धूळ धुतली जाते, रस्त्यांवरील मळ निघून जातो आणि वातावरणात ताजेपणा येतो, तसाच काहीसा परिणाम पक्षातही होणार आहे. नवीन प्रदेशाध्यक्षांच्या आगमनाने पक्षातील जुने वाद, नाराजी, मतभेद आणि गटबाजीचा चिखल वाहून जाणार, असा आशावाद काही जणांमध्ये आहे.
रात्रीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
गोवा काँग्रेस प्रदेश समितीचा अध्यक्ष बदलण्याचा ज्यावेळी निर्णय जाहीर झाला त्यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर हे मडगावच्या रवींद्र भवनात तियात्र पाहत होते. ज्यावेळी गिरीश चोडणकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची बातमी पाटकर यांना कळली, त्यावेळी त्यांच्यासाठी हा जणू रात्रीच्या वेळी केलेला ‘राजकीय सर्जिकल स्ट्राइक’ ठरला. असे म्हणतात, यापूर्वी पाटकर यांना अध्यक्षपदावरून बाजूला काढून गिरीश चोडणकर यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची तयारी झाली होती. पण, याची कुणकुण काही काँग्रेस आमदारांना लागली. त्यानंतर त्यांनी सूत्रे हलवत हा डाव हाणून पाडला होता. त्यामुळे आताही तसे काही होऊ नये, यासाठीच रात्रीच्या वेळी हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला असावा, असे सांगण्यात येत आहे. असे असेल तर हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ जबरदस्त होता, नाही का!
महापौरांची भेट सार्थक ठरो....
मळ्यातील झऱ्याला बाधक ठरणाऱ्या समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा होईल, असे उपाय महानगरपालिकेने योजले पाहिजेत, असे पणजीतील नागरिकांना सतत वाटत होते. सोमवारी महापौर रोहित मोन्सेरात यांनी या झऱ्याची पाहणी केली आणि त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक उपाययोजनांचे मूल्यांकन करण्यासाठी, काय उपाययोजना करता येतील, हे जाणून घेतले. महापौरांनी या झऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याकरिता उचललेले पाऊल नक्कीच सध्यातरी दिलासादायक आहे. परंतु खऱ्या अर्थाने झऱ्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात होईल आणि झऱ्याचा नैसर्गिक स्रोत सुरू राहील, झऱ्याला बाजूच्या गटारातील पाण्याची काहीही बाधा पोहोचणार नाही, ही सर्व कामे प्रत्यक्षात येतील तेव्हाच महापौरांची भेट सार्थक ठरली, असे म्हणता येईल.
मेरशीतील सिग्नल अन् भाजप नेत्याचाच आवाज..
मेरशीतील ट्रॅफिक सिग्नल सुरू झाले, पण त्याचा त्रास म्हणे मेरशी-सांताक्रूझमधून येणाऱ्या वाहनांना होत आहे. मेरशीकडून येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नलचा वेळ कमी ठेवला आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. यावर भाजपचे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य गिरीश उस्कैकर यांनी आवाज उठवला आहे. मेरशी जंक्शनवर कधी सिग्नल चालू असतात, तर कधी बंद असतात. गोव्यातील मेरशी हे वाहतुकीचे महत्त्वाचे जंक्शन आहे. या ठिकाणी दक्षिण गोव्याकडून व फोंड्याकडून येणाऱ्या वाहनांची संख्या काही कमी नाही. येथील वाहतूक व्यवस्थेच्या समस्येवर आता भाजपच्याच नेत्याने आवाज उठवला आहे, म्हणून बरे. इतर पक्षाचा कोणी असता, तर भाजपवालेच हा राजकीय स्टंट असल्याचे म्हणू लागले असते.
संजय बर्डेंचा साक्षात्कार...
राज्यात उष्म्याने लोक हैराण आहेत. त्यातच म्हापशाचे राजकारणही अधिक तापत आहे. समाजसेवक मयूर सावकार यांनी थेट भाजपच्या तिकिटावरच दावा ठोकल्याने काहींना धक्का बसलाय. पण, विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांचे कार्यकर्ते मात्र ‘चिल’ आहेत. तिकीट तर आधीच जोशुआबाबूंच्या खिशात ‘फिक्स’ आहे, उगीच कोणी कितीही उड्या मारल्या तरी काय फरक पडतो? असा त्यांचा आत्मविश्वास आहे. भाजपमध्ये हे सुरू असताना तिकडे काँग्रेसमध्ये तिकिटासाठी आधीच तिघे जण एकमेकांचे पाय ओढत रांगेत उभे आहेत. त्यातच संजय बर्डे यांचीही इच्छुकांमध्ये ‘एन्ट्री’ झाली. बर्डे म्हणतात, मी जन्मापासून काँग्रेसवादी. पक्षाने माझ्यासारख्या कष्ट करणाऱ्यालाच तिकीट दिले पाहिजे. विशेष म्हणजे, गोव्यात काँग्रेसची धुरा पुन्हा गिरीश चोडणकर यांच्याकडे आल्यामुळे बर्डे सध्या हवेत आहेत. चोडणकरांच्या ‘कमबॅक’मुळेच बहुधा, म्हापशातून आपण काँग्रेसचे तगडे दावेदार बनू शकतो आणि आपण कसे ‘कट्टर’ काँग्रेसमन आहोत, याचा अचानक साक्षात्कारही बर्डेंना झाला आहे.
अविनाशभाईंची जय्यत तयारी पण....
मडगाव पालिकेची निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. निवडणूक कधी होणार, हे अजून निश्चित झाले नसले तरी अनेक आजी माजी नगरसेवक या खेपेला आपले नशीब पुन्हा आजमावण्यासाठी तयारीला लागले आहेत. यात अविनाश शिरोडकर या माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. यापूर्वी ते दोनदा प्रभाग १९ मधून नगरसेवक म्हणून जिंकून आले होते. मागच्या खेपेला हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली. या प्रभागातून लता पेडणेकर या जिंकून आल्या होत्या. आता या प्रभागात पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी अविनाशबाबाने जय्यत तयारी केली आहे. अनेक सामाजिक संघटनेशी त्यांचा निकटचा संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांची सर्व मदार आता दिगंबर कामत यांच्यावर अवंलबून आहे. त्याला तसेच कारण आहे. लता मॅडमलाही म्हणे, पुन्हा एकदा नगरसेविका बनायचे आहे. अविनाशच्या पुढील राजकीय वाटचालीत त्या अडथळा बनत आहे. त्याही कामत यांना जवळच्या आहेत. आता बाबा कुणाच्या बाजूने आपला कौल देतात यावरच अविनाशभाईंचे भवितव्य ठरणार.
शेखर सायबाची वर्णी...
दक्षिण गोवा व कुशावती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून शेखर प्रभुदेसाई यांची वर्णी लागली. त्याबाबत सरकारी आदेशही जारी झाला. या जिल्ह्यातील ‘एसपी’ पदावरून संतोष देसाई हे रविवारी (ता.३१) सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवावाढ मिळणार, अशी पूर्वी अटकळ होती. त्याविषयी पोलिस खात्यात तशी जोरदार चर्चाही सुरू होती. मात्र, ही चर्चा शेवटी निरर्थक ठरली. या ‘पोस्टिंग’ साठी शेखर प्रभुदेसाई तसेच टिकम सिंग वर्मा यांची नावे चर्चेत होती. अखेर शेखर सायबाने बाजी मारली. कोकण रेल्वे पोलिस अधिक्षक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. आता त्यांना दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. प्रभुदेसाई यांना यापूर्वी या जिल्ह्यात सुरवातीला उपअधीक्षक तसेच नंतर अधीक्षक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे हा जिल्हा त्यांना मुळीच अपरिचित नाही, हे विशेष.
जोसेफ सिक्वेरा काय करतील?
कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. आमदार होण्याची इच्छा बाळगणारे सिक्वेरा सध्या भाजपमध्ये आहेत. कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर आल्यानंतर किती सक्रिय होतील, त्यावरच जोसेफ यांची भूमिका ठरणार आहे. भाजपची उमेदवारी मायकल लोबो यांना मिळाली, तर जोसेफ काय करतील, हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे कळंगुटमध्ये येत्या काही महिन्यांत राजकीय हालचाली वाढतील, असे दिसत आहे.
मिकी को गुस्सा क्यों आता है?
मिकी पाशेको हे काँग्रेस पक्षात नाहीत, पण तरीही स्वतःला काँग्रेस समर्थक म्हणवून घेतात. गिरीश चोडणकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमल्यावर मिकी यांनी या निर्णयावर आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. गोव्यातील काँग्रेस संपवण्यासाठी गिरीश यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे, अशी टीका त्यांनी केली. वास्तविक मिकी काँग्रेस पक्षात नसल्याने काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, त्यावर बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. पण २०२२ मध्ये मिकी काँग्रेस उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी करत होते. त्यावेळी आपला पत्ता गिरीशने कापला, असे वाटत असल्यामुळे ते आता त्यांच्यावर आगपाखड तर करत नाहीत ना, असा सवाल उपस्थित होत आहे. काहीही असो, एकेकाळी मनोहर पर्रीकर यांनी पाशेकोंचा पूर्ण वापर करून घेतला होता, यातही तथ्य आहे.
पाशेकोंची डरकाळी...
माजी मंत्री मिकी पाशेको यांनी सोमवारी नव्या वादाला तोंड फोडले. पाशेको यांनी सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे तिकीट मिळवून देण्याच्या बदल्यात पक्षाच्या निधीच्या नावाखाली आपल्याकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा पाशेको यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केला. तत्कालीन काँग्रेसच्या गोवा प्रभारींनी आपल्याकडे पक्षनिधी म्हणून पैशांची मागणी केली, त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते, असा जाहीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पाशेको यांनी हा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. कारण काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी पैसे घेतल्याचे कोण म्हणतात, ते दाखवावे, असे म्हटले होते. आता पाशेको यांनी जाहीरपणे आरोप केला असल्याने त्यावर काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.