

मुख्यमंत्र्यांचा ‘थिंक टँक’ म्हणजे नक्की कोण?
काहीवेळा आपण ज्यांना आपले समजतो किंवा आपले हितचिंतक व मार्गदर्शक मानतो तेच आपल्या विनाशास कारण ठरतात. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ‘थिंक टँक’वर जास्त विश्वात ठेवू नये, ते त्यांना खड्ड्यात टाकणार, असे जाहीर वक्तव्य भाजपचे माजी मंत्री गोविंद गावडे यांनी ‘उटा’च्या सभेत बोलताना केले. आता मुख्यमंत्र्यांची ‘थिंक टँक’ कोणती? भाजपच्या वातानुकूलीन केबिनमध्ये सोफ्यावर बसून स्वतःला मोठे स्ट्रॅटेजी मास्टर समजणारे खोल विचारांचे व तत्पर म्हणून हजर राहणारे बिनकामाचे नेते आहेत? की कोणतीही निवडणूक न लढता किंवा कोणत्याही निवडणुकीत विजय हासील करण्याचे सोडा, भाजपच्या सभेला दहा कार्यकर्ते जोडण्याची ज्यांची ऐपत नाही; पण कोर टीमचे भाग आहेत व मुख्यमंत्र्यांचा ज्यांच्यावर विश्वास आहे ती ‘थिंक टँक’ मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भवितव्यास घातक ठरणार, असे गोविंद गावडेंना म्हणायचे आहे का?
हे स्मरणात आहे का?
गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन केदार नाईक यांना मांडवीवर रेईश-मागूस ते पणजी अशा उभारल्या जाणाऱ्या ‘रोप-वे’ची आठवण आहे की नाही, असा प्रश्न पडतो. पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन झाल्यानंतर रोप-वे काही महिन्यांत उभारण्यास सुरवात होईल, असे अनेकांना वाटत होते; परंतु त्याविषयी नाईक साहेब काहीच बोलले नाहीत. पर्यटनवाढीसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही संकल्पना मांडली होती, ती संकल्पना महामंडळाचे यापूर्वी होऊन गेलेले चेअरमन म्हणून कोणीही पुढे नेली नाही. आता केदार नाईक यांना तरी तो प्रकल्प पुढे न्यावा, असे वाटते की नाही, ते माहीत नाही. आता त्यांच्याच मतदारसंघातील लोक याविषयी विचारणा करतील तेव्हा कदाचित त्यांना स्मरण होईल नाही का?
गावडे यांचा बाण कुणावर?
म्हार्दोळच्या एसटी आरक्षण मेळाव्याकडे जाताना आमदार गोविंद गावडे यांना एका तरुणाने गाठले. धनगर समाजालाही एसटी दर्जा मिळावा, यासाठी त्याने पाठिंबा मागितला. ‘नेत्यांना उठा म्हणा’ असा सल्ला गावडेंनी दिला. त्यावर ‘आमचे लोक चाळवले आहेत,’ असे उत्तर आले. एवढे ऐकताच गावडेंच्या चेहऱ्यावरील भाव बदलले, ते संतापले आणि ‘मग तुम्ही मावळता...’ असे शब्द बाहेर पडले. संदेश धनगर समाजाला होता; पण त्या वाक्यातील रोख कुणाकडे होता, याचा अंदाज उपस्थितांनी लगेच बांधला. धनगर समाजाच्या मागणीपेक्षा त्या एका वाक्याचीच चर्चा अधिक रंगली. बाण धनगरांच्या प्रश्नावरून सुटला असला, तरी त्याचा नेम बाबू कवळेकरांकडेच होता, असे अनेकांना वाटून गेले!
विनय तेंडुलकरांचा ‘आत्मविश्वास’!
परवा सावर्डे येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी सावर्डेत मी पुन्हा येईन, असा आत्मविश्वास व्यक्त केला. पूर्वी त्यांनी मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार आहे, असे प्रतिपादन केले होते आणि त्यामुळे फोंड्यासारख्या मतदारसंघात त्यांना भाजपची उमेदवारी मिळू शकते, असे भाकित वर्तविले जात होते; पण आता त्यांनी फक्त सावर्डे मतदारसंघाला ‘निशाणा’ केले आहे. तसे पाहायला गेल्यास या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सभापती गणेश गावकर, संकेत आर्सेकर हे स्पर्धेमध्ये असल्यामुळे तेंडुलकरांचे हे वक्तव्य सध्या या भागात चर्चेचे केंद्रस्थान बनायला लागले आहे; पण काही का असेना, राजकीय नेत्यांचे ‘हौसले बुलंद’ असणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते. नाही का?
रट्टामार ‘जेन-झी’
कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनामुळे सध्या जेन-झी जोमात आहे, तशातच सरकारला इशारा देण्यासाठी ‘उटा’च्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील काही ‘जेन-झी’ला पुढे काढली, ज्यांनी लिहून दिलेली भाषणे जोरदारपणे ठोकून दिली. त्यामुळे या ‘जेन-झी’ला चांगली सोशल प्रसिद्धीही मिळत आहे; पण त्याच प्रमाणात ट्रोलही होत आहे. काल या ‘जेन-झी’ वक्त्यांनी ‘उटा’च्या सभेत म्हार्दोळ येथील क्रांती मैदानाला चक्क आझाद म्हणून संबोधले. या ‘जेन-झी’च्या सामान्य ज्ञानाची सोशल मीडियावर ट्रॉलरूपी चर्चा झाली. असे म्हणतात, पूर्वी ही सभा आझाद मैदानावर होणार होती आणि तिथे बोलण्यासाठी या युवांनी आपली भाषणे तयार केली होती. अगदी रट्टा मारून म्हणतात तशी ती तोंडपाठ केली होती; पण सभेला तीन दिवस बाकी असताना सभेची जागा बदलली. मात्र, रट्टाबाज ‘जेन-झी’ला हे मैदानाचे नवीन नाव कळलेच नाही बुवा!
निवडणुकीची चाहूल
फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होणार, असे वारंवार सांगितले जात असतानाच आता निवडणूक अधिकाऱ्यांना बायंगिणी येथे ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’चे प्रशिक्षण देण्याची लगबग सुरू झाली आहे. म्हणजे निवडणुकीची तारीख अजून कागदावर यायची असली, तरी यंत्रांना मात्र आधीच ‘परीक्षेचा अभ्यास’ लावण्यात आला आहे! अधिकारी मशिन्स हाताळण्याचे धडे घेत आहेत आणि राजकीय मंडळी मतदारसंघ हाताळण्याच्या तयारीला लागली आहेत. फेब्रुवारीचा मुहूर्त सरकार सांगतेय, निवडणूक यंत्रणा तयारी करतेय; आता फक्त मतदारांना एवढेच कळायचे आहे की निवडणूक नेमकी कधी, हे समजण्यासाठी कोणत्या मशिनचे बटण दाबावे लागणार?
आरक्षणाची गतही फाेंडा निवडणुकीसारखीच?
‘एसटी’ना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सध्या गोव्यात वातावरण तापले आहे. भाजपनेही ‘एसटी’ना याच निवडणुकीत आरक्षण मिळणार अशातऱ्हेची हवा निर्माण केली आहे. असे जरी असले तरी तांत्रिक मुद्दा पुढे काढून हे आरक्षण स्थगित ठेवले जाणार, अशी भीती ‘एसटी’च्या लोकांमध्ये आहेच. राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी समाजमाध्यमांवरील आपल्या पाेस्टमध्येही हीच शंका व्यक्त केली आहे. आरक्षण मिळाल्यास नुवे हा मतदारसंघ राखीव हाेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुवेतील इच्छुक उमेदवारांनी आपला या आरक्षणाला पाठिंबा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत; पण राधाराव म्हणतात, भाजपने ही प्रक्रिया सुरू करण्यास जी अक्षम्य अशी दिरंगाई केली त्यामुळे निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे आरक्षणाची गतही फाेंडा पोटनिवडणुकीसारखी होईल आणि भाजप सगळा दोष निवडणूक आयोगाच्या माथी थापून स्वत: नामानिराळे राहतील. राधारावांचा हा मुद्दा कोणी खोडून काढू शकेल का?
रोहनचे २६ हजार लाेकांचे कुटुंब
सुभाष फळदेसाई यांनी आपली कुडचडेतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर हा मतदारसंघ अकस्मात पुन्हा एकदा चर्चेत आला. फळदेसाई यांनी आपल्या दाव्याचे समर्थन करताना, आपला जन्म कुडचडेत झाला असल्याचे म्हटल्यावर या मतदारसंघातील आणखी एक भाजपचे इच्छुक असलेले रोहन गावस देसाई यांनी कुडचडेतील सर्व २६ हजार मतदार आपले कुटुंबीय, असे म्हटले. एक मात्र खरे, रोपटी आणि माडाचे कवाथे वाटण्याची मोहीम रोहन गावस यांनी हाती घेऊन त्यांनी सर्व मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे अलीकडच्या काळात रोहनचा कुडचडेमधील कनेक्ट बराच वाढला आहे, यात दुमत नाही. अशातच त्यांनी आता ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम हाती घेऊन कुडचडेतील युवकांना तिरंग्याचे वाटप सुरू केले आहे. १२ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या युवा दिनाच्या कार्यक्रमालाही रोहनच्या कार्यालयात लोकांची गर्दी होती, ते पाहिल्यास रोहनही आता मतदारसंघात दमदारपणे कार्य करत आहेत, हे दिसून येते. यामागे निवडणुकीचे गणित आहे, हे वेगळे सांगण्याची गरज आहे का?
कुडचडेत गुप्त बैठक!
न्याय देणाराच जर कायदा मोडायला लागला तर शिक्षा कोणाला देणार? टिळक पुण्यतिथीला एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याने गुप्त बैठक घेतली. ही बैठक एका भावी उमेदवाराच्या घरी झाली. बैठकीला स्थानिक नेते व त्या पक्षाचे काही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर एका नव्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबद्दल त्या बड्या नेत्याने आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. पक्षश्रेष्ठीने या नव्या युवा नेत्याला उमेदवारी देण्याचे जवळ जवळ निश्चित केले असून पक्ष कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे संकेत त्या राष्ट्रीय पक्षाच्या बड्या नेत्याने बैठकीत दिले. याचा अर्थ येणाऱ्या निवडणुकीत कुडचडे मतदारंघात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कळंगुटमधील ‘स्पा’
कळंगुटमध्ये बेकायदा ‘स्पा’ आणि डान्सबार सुरू आहेत, यावर स्थानिकांचा संताप वाढतोय; पण प्रशासनाला बहुधा हा प्रकार ‘पर्यटन विकासा’चाच नवा अध्याय वाटत असावा! नियमांची पाटी लावायची, तक्रारींची दखल घ्यायची आणि मग सगळे सुरळीत सुरू ठेवायचे, असा काहीसा कारभार दिसतोय. कळंगुटची ओळख समुद्रकिनाऱ्यापेक्षा आता अशा उद्योगांनीच होणार की काय, अशी शंका स्थानिकांना येऊ लागली आहे. कायद्याची टपली आधी कोणाला बसते, याचीच उत्सुकता आहे.
‘त्याकडे’ कोणाचे लक्ष?
काणकोणात ‘ए-आय’ कॅमेऱ्यांच्या वायरिंगसाठी महामार्गाच्या दुभाजकांची अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी कॅमेरे बसवायचे; पण त्यासाठी रस्त्याचीच सुरक्षितता धोक्यात आणायची, हा विकासाचा नवा नमुना म्हणायचा का? वायरिंगचे काम झाले, कॅमेरेही डोळे उघडे ठेवून उभे राहतील. मात्र, त्यांच्या खाली उद्ध्वस्त झालेले दुभाजक आणि अस्ताव्यस्त रस्ता पाहण्याची जबाबदारी कोणाची? ‘ए-आय’ कॅमेऱ्यांना सगळे दिसेल; पण कामानंतरची ही दुरवस्था संबंधित यंत्रणेला दिसणार तरी कधी?
श्रावणाचीगोड फोडणी
स्वपक्षीय असो वा विरोधी पक्षातील नेता. डाव, प्रतिडाव, आरोप-प्रत्यारोप, अंतर्गत कलह हे राजकारणाचे अविभाज्य पैलू मानले जातात. मात्र, याहीपलीकडे मानवी स्नेहभाव जपला जातो, हे श्रावणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकारी मंत्री व आमदारांसह पणजीत ‘श्रावण थाळी’चा आस्वाद घेतला. श्रावणात उपवास, सात्त्विक आहार, संयमाला महत्त्व असते; त्याचबरोबर एकत्र बसून संवाद साधण्याची संधीही मिळते. त्यामुळे या थाळीत आपुलकी, सुसंवाद व संघभावनेचीही चव अनुभवायला मिळाली असावी. रोजच्या राजकीय गरमागरम चर्चांमध्ये अशी एखादी ‘सात्त्विक’ बैठक झाली तर लोकशाहीच्याही तब्येतीला थोडा फायदा होईल, एवढे मात्र नक्की!
सावध भूमिका!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सध्या इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. शिवोली, साळगाव, म्हापसा, कुडचडे, मांद्रे असो की हळदोणे, प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त नावे शर्यतीत दिसत आहेत. हळदोणेतही हीच हवा आहे. मंगळवारी माजी आमदार ग्लेन टिकलो यांना याबाबत छेडले असता, त्यांनी मुत्सद्दीपणे, ‘मतदारसंघात कमळ तर फुलणारच!’ असे गुळगुळीत उत्तर देऊन वेळ मारून नेली; पण हे ‘कमळ’ नक्की कोणाच्या हातात फुलणार, हे सांगणे मात्र त्यांनी खुबीने टाळले. सध्या या मतदारसंघात एका विद्यमान झेडपी सदस्याचे आणि एका माजी नगरसेवकाचे नाव आघाडीवर असून, या दोघांचेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मधुर संबंध आहेत. तिकडे टिकलोंनीही माध्यमांसमोर, मीच उमेदवार असा आव आणणे किंवा तिकीट नाकारले तर अपक्ष लढेन, अशी डायलॉगबाजी करणे शहाणपणाने टाळले. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि अवेळी उफाळून आलेली ‘माझी उमेदवारी’ची लहर भविष्यात आपल्याच अंगाशी येऊ शकते, हे टिकलो ओळखून आहेत. त्यामुळेच सध्या तरी पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून न घेता, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवत त्यांनी स्वतःची बाजू सुरक्षित ठेवली आहे.
अजूनही कृत्यात सुधारणा नाहीच!
आपल्या बॉसची खुशामतगिरी करणाऱ्या बंदर कप्तान खात्यातील वरिष्ठ लिपिकाच्या कृत्यावर काही दिवसांपूर्वी या सदरातून प्रकाश टाकण्यात आला होता. त्यानंतर हा वरिष्ठ लिपिक दोन-तीन दिवस खुर्चीवरून जास्त हललाच नाही. नेहमीप्रमाणे इकडे-तिकडे गेलाही नाही, त्यामुळे खात्यात आश्चर्य व्यक्त होऊ लागले; पण ‘दोर जळाला तरी पीळ कायम’ म्हणतात, तसा त्याने प्रत्ययही दिला. वरिष्ठांचे कान भरण्याचे काम अंगवळणी पडल्यामुळे महाशयांनी उशिरापर्यंत कार्यालयात थांबून ज्या गोष्टी आपल्या बॉसला सांगायच्या त्या सांगायचे काही सोडले नाही. या सर्व बाबी बॉसला निश्चित माहीतही असतील; पण ते त्या वरिष्ठ लिपिकाच्या कृत्याकडे डोळेझाक का करतात? असा प्रश्न येथील कर्मचारी विचारत आहेत. त्याच्या कृत्यामुळे सर्व कर्मचारी सध्या हवालदिल आहेत. आता किमान या खात्याचे मंत्री तरी याकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत.
महापालिका इमारत अन् फुर्तादोंचे प्रयत्न
माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी समाजमाध्यमात सध्या एक पोस्ट अपलोड केली आहे. त्यांनी महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचे छायाचित्र त्याबरोबर जोडले असून, आठ वर्षांपासून महापालिकेची ही इमारत प्रत्यक्षात साकार होऊ शकली नाही. या इमारतीत काही परदेशी वाणिज्य दूतावासांना कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशी व्हिसासाठी गोव्याबाहेर जावे लागले नसते, असे फुर्तादोंना वाटते. विशेष बाब म्हणजे फुर्तादो यांच्या काळात या इमारतीचा आराखडा तयार झाला होता. इमारतीचे छायाचित्र पाहिल्यानंतर तिची भव्यता दिसून येते. या इमारतीसाठी ‘जीसुडा’ने १२ कोटी मंजूर केले होते आणि ६५ कोटींमध्ये ही इमारत पूर्ण होणार होती; पण पुढे कालांतराने फुर्तादो यांना महापौरपदावरून जावे लागले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारतीचा पायाभरणी समारंभ होऊनही तिचे काम होऊ शकले नाही. ते काम का होऊ शकले नाही, त्याला काय अडचणी आहेत किंवा कोणी त्या कामाला अडथळा आणला? याची सर्व उत्तरे सत्ताधाऱ्यांना माहीत आहेत; पण कोणीही त्यावर बोलणारही नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.