

पणजी/मडगाव: शनिवारी गोव्यात दाखल झालेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी रविवारी पणजीत काही मंत्री-आमदारांसह मडगावात संघ परिवारातील नेत्यांच्या बैठका घेत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर निवडून आणण्याच्या सूचना केल्या.
संतोष यांनी रविवारी सकाळी मेरशी येथे उभारण्यात येत असलेल्या प्रदेश भाजपच्या नव्या मुख्यालय इमारतीच्या कामाची पाहणी केल्यानंतर पणजीतील पक्ष कार्यालयास भेट दिली. तेथे त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास ते उपस्थित राहिले.
त्यानंतर सभापती गणेश गावकर, मंत्री विश्वजीत राणे, आमदार नीलेश काब्राल, प्रेमेंद्र शेट यांच्यासह इतर काही मंत्री, आमदारांसोबत बैठका घेऊन राज्यातील राजकीय स्थिती आणि पक्ष संघटनेचा त्यांनी आढावा घेतला. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात स्वबळावर निवडून आणण्याच्या सूचना त्यांना केल्या.
‘कॅच द रेन’ उपक्रमाची गरज
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या नौदलाच्या जहाजांचा समावेश, ‘मेड इन इंडिया’ सी-२९५ विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण आणि स्वदेशी ‘लाँग रेंज लॅण्ड ॲटॅक क्रूझ मिसाईल’ची यशस्वी चाचणी यांसारख्या गोष्टींचा विशेष उल्लेख केला.
योगदिनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, ‘नागालॅण्ड बेबी लीग’सारख्या उपक्रमांतून बहरत असलेली भारतातील क्रीडा संस्कृती आणि नालंदा विद्यापीठ व केंद्रीय संस्कृत विद्यापीठासारख्या संस्थांच्या माध्यमातून प्राचीन ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचे प्रयत्न या सर्वांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
आसामची हरगिला आर्मी, मेघालयातील लिव्हिंग रूट ब्रिजेस यांच्या प्रेरणादायी कथा आणि मातीच्या गणेशमूर्तींची निवड करून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष आणि इतर कार्यकर्त्यांसोबत ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १३५ वा भाग ऐकला.
पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे ‘कॅच द रेन’ उपक्रम राबवण्याची गरज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अधोरेखित केली.
कुणाकडूनही तक्रार नाही : विश्वजीत राणे
‘‘मंत्री-आमदारांसोबतच्या बैठकीत कुणीही बी. एल. संतोष यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नाही. संघटितरित्या भाजपला स्पष्ट बहुमताने निवडून आणण्याबाबतच बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजप सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास साधला आहे. हा विकास जनतेसमोर ठेवून पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’’, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी पणजीतील बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला
या बैठकीत बी.एल. संतोष यांनी भाजपच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून आणि पक्ष संघटना अधिकाधिक बळकट करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. पणजीतील बैठकीनंतर संतोष यांनी संघ परिवारातील नेत्यांशी मडगावात समन्वय बैठक घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.