खरी कुजबुज: ठाकरेंचा सबुरीचा सल्ला!

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीची (पीएसी) नुकतीच काँग्रेस भवनात बैठक पार पडली. या बैठकीला ‘पीएसी’चे सदस्य माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची अनुपस्थिती होती.
Khari Kujbuj Political Satire:
Khari Kujbuj Political Satire:Dainik Gomantak
Published on
Updated on

ठाकरेंचा सबुरीचा सल्ला!

काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीची (पीएसी) नुकतीच काँग्रेस भवनात बैठक पार पडली. या बैठकीला ‘पीएसी’चे सदस्य माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या अनुपस्थितीविषयी पत्रकारांनीच त्यांना बैठकीला का गेला नाहीत, हे विचारायला हवे, असा सल्ला दिला. पाटकर पक्षाच्या बैठकीला आले नाहीत; परंतु त्यांनी आज मडगावात ‘टाऊन हॉल’ बैठक घेतली. त्यात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि ‘आप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी हजेरी लावली. त्यावरूनच ‘पक्षाला नुकसान पोहोचू नये, यासाठी सर्वांनी काम करावे. त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही. पक्षविरोधी कार्य होत असेल तर शिस्तपालन समिती निर्णय घेते,’ याची आठवण ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून करून दिली. त्यामुळे समझनेवाले को इशारा काफी होता है, एवढेच म्हणावे लागेल.

कुंकळ्ळीत लाव रे तो व्हिडिओ!

कुंकळ्ळीत स्थायिक झालेल्या मन्सूर नावाच्या युरी आलेमाव यांच्या एका कार्यकर्त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर बराच गाजत आहे. भाजपचे माजी आमदार क्लाफास डायस यांची साथ सोडून युरी आलेमाव यांच्या कळपात आलेला हा कार्यकर्ता आज जरी युरींचे गुणगान करीत असला तरी तीन महिन्यापूर्वी तो कार्यकर्ता युरींच्या विरोधात टीकात्मक व्हिडिओ व्हायरल करीत होता. कुंकळ्ळीकरांना वार्काचा आमदार नको. आपले मतदान कुंकळ्ळीत नेल्याचा खोटा दावा करून युरींनी स्थानिकांना फसविण्याचा डाव आखल्याचा आरोप त्यावेळी हा मन्सूर करीत होता. युरींना वार्कात पाठवा, अशी कडवी टीका करणाऱ्या त्या महाभागाने युरींचे गुणगान गायला सुरवात केल्यामुळे युरीविरोधक आता तो जुना व्हिडिओ व्हायरल करायला लागले आहेत.

नवी आघाडी?

काँग्रेसच्या बैठकीत फातोर्ड्यात काँग्रेस उमेदवार जाहीर करण्याची सूचना काँग्रेस प्रदेश समितीचे खजिनदार दत्ता नायक यांनी केल्याचे वृत्त पसरले असतानाच काल विजय सरदेसाई हे मडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात अमित पाटकर आणि व्हेन्झी व्हिएगस यांच्याबरोबर दिसले. वास्तविक या गोष्टीला एखादी साधी गोष्ट म्हणून पाहून सोडून देता आले असते; पण या दिवसात अमित पाटकर आणि विजय सरदेसाई यांच्यातील घरोबा जरा जास्तीचाच झालेला दिसत असताना आता त्यांना व्हेन्झी यांचीही जोड मिळालेली आहे. हे तिन्ही नेते एकत्र येणे म्हणजे एक नवीन राजकीय स्टेटमेंट तर नव्हे ना?

रोखठोक विजय...

विजय सरदेसाई हे नेहमीच रोखठोक बोलतात. त्यांच्या या स्वाभावाचे रविवारी मडगावच्या गोमंत विद्या निकेतनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित शिक्षकवर्गांना पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शिक्षकांसाठी टीचर्स टाऊन हॉल नावे कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षक व निन्मस्तर शिक्षकांच्या प्रलंबित समस्या जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम होता. यावेळी विजय सरदेसाई व व्हेन्झी व्हिएगस हेही उपस्थित होते. विजयनी सुरवातीला आपण राजकारणी आहोत, असे सांगताना जर तुमचे प्रश्न सरकार सोडवत नसेल तर या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करा व आम्हाला जिंकून आणा, आम्ही तुम्हाला न्याय देऊ, असे स्पष्टपणे आवाहन केले. यावेळी त्यांना पलीकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. विजयचा चेहराही यावेळी बराच खुलला होता. ते प्रसन्न मूडमध्ये नंतर सभागृहाच्या बाहेर निघाले.

Khari Kujbuj Political Satire:
Migrants in Goa: गोव्यात 90 टक्के गुन्ह्यांसाठी परप्रांतीय जबाबदार? कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासात नेमकं काय समोर आलं?

रितेश नाईक यांची कामे

कुर्टी-खांडेपारचे सरपंच नावेद यांनी राजीव गांधी कलामंदिरचे अध्यक्ष तथा फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष रितेश नाईक यांचे बरेच कौतुक केले आणि रितेश नाईक यांच्या कामाच्या धडाडीमुळे पंचायत क्षेत्रातील अनेक विकासकामे मार्गी लागल्याचे कबूलच करून टाकले. कुर्टीत विसर्जन स्थळ आणि तळीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ रितेशरावांच्या हस्ते झाला, त्यावेळी नावेद बोलत होते. नावेद म्हणाले की, रितेश हे जरी शांत दिसत असले तरी त्यांच्याकडून होणारा कामाचा धडाका काही औरच असतो. विकासकामांचा पाठपुरावा करण्याबरोबर इतर कामांची गती कुठे पोहोचली, याचा आढावा रितेश यांच्याकडून पंच आणि नगरसेवकांबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांकडेही सातत्याने केला जातो, त्यामुळेच ही कामे होत आहेत. आता एका अर्थाने सरपंचाने रितेशरावांना आमदारच करून टाकले, अशी चर्चा यावेळी रंगली होती.

पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

रविवारचा दिवस गोव्याच्या राजकारणासाठी चांगलाच तापलेला दिसला. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद झाली आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कसे काम करत आहे, याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे शिक्षकांच्या प्रश्नावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. आमदार विजय सरदेसाई आणि आम आदमी पक्षाचे नेतेही यात सहभागी झाले. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्याने राजकीय चर्चेला आणखी रंग चढला. एकाच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची अशी लगबग पाहता निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले की काय, अशी चर्चा राज्यात रंगू लागली आहे. आता प्रत्येक पक्षाने आपापली मोर्चेबांधणी सुरू केली, असेच वातावरण आहे.

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: आघाडीसंदर्भात काँग्रेस-आरजीपी यांच्यातील चर्चेची पहिली फेरी पूर्ण; आप, गोवा फॉरवर्ड, गोवा काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचे संकेत

चर्चा कौतुकची!

फोंड्यात फिजिओथेरपी दिन साजरा करण्यात आला. फिजिओथेरपी आणि डॉ. केतन भाटीकर यांचे एक घट्ट नाते होते आणि फिजिओथेरपीतून केतन यांनी फोंडावासीयांकडे आपले असे एक नाते जोडले होते. फिजिओथेरपी दिन कार्यक्रम केतनविना म्हणजे उपस्थितांना कसेसेच वाटले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम खूप छान झाला. विशेष म्हणजे केतन यांचे बंधू डॉ. कौतुक भाटीकर यांनी हा कार्यक्रम भाटीकर ट्रस्टच्यावतीने आयोजित केला होता. केतन यांचे कार्य पुढे नेणार, असे कौतुक यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे कौतुक राजकीय क्षेत्रात पदार्पण करतात की काय? अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

तर सामान्यांचे काय?

म्हापसा शहरातील गणेशपुरीसारख्या उच्चभ्रू वस्तीत भरवस्तीत असलेल्या एका माजी नगराध्यक्षांचा बंगला अज्ञात चोरट्यांनी बिनदिक्कत फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आणि आता पोलिसांचा तपास सुरू आहे. ही घटना म्हणजे म्हापसा पोलिसांच्या सुस्तावलेल्या यंत्रणेच्या तोंडावर मारलेली जोरदार चपराक आहे. शहरात चोरांचा सुळसुळाट इतका वाढलाय की, ज्यांनी शहराचा गाडा हाकला, त्या माजी लोकप्रतिनिधींची घरेही आता सुरक्षित उरलेली नाहीत. जर ‘व्हीआयपीं’च्या बंगल्यांवर चोरटे सहज हात साफ करून पसार होत असतील, तर गल्लीबोळातील सामान्य जनतेने सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून ठेवायची? रात्रीची पोलिसांची गस्त फक्त नावापुरतीच उरली आहे का? असा संतप्त सवाल आता शहरात दबक्या आवाजात नव्हे, तर उघडपणे विचारला जात आहे. म्हापसा पोलिस नेमकी कोणाची सुरक्षा करत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे.

‘उज्ज्वला’ योजनेवर प्रश्‍न

निवडणुका जवळ आल्या की राजकारणी विशेष करून सत्तेत असलेले मंत्री, आमदार मोफत योजनांचा पाऊस टाकतात. भाजप सत्तेवर आल्यास सर्व गॅस ग्राहकांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुमारे साडेचार वर्षांपूर्वी केली होती. नंतर डॉ. सावंत ती घोषणा विसरले. आता निवडणूक जवळ आल्यामुळे मुख्यमंत्री उज्ज्वाला योजनेचे फॉर्म बाहेर काढले आहेत. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाच्या खात्यात दोन हजार सातशे रुपये जमा होणार आहेत. हा फायदा घेण्यासाठी सगळ्यात पुढे कोण असेल तर ते जे दिवसाला दोन हजार सातशे रुपये व त्याहून जास्त कमावतात. ज्यांना खरीच या अनुदानाची गरज आहे, ते मागच्या रांगेत आहेत. ज्यांच्याकडे गॅस घेण्याची ऐपत नाही त्यांचे समजू शकतो. मात्र, श्रीमंतांना ही योजना का? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

धनवानांनी बोध घ्यावा!

आपल्या सरकारने राज्यातील सर्व गॅस ग्राहकांना खुश करण्यासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. यात सगळ्या गरीब-श्रीमंतांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. सरकार सुमारे दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये गॅस ग्राहकाच्या खात्यात टाकणार आहे. यासाठी सरकारने फॉर्म काढले आहेत. आमदारांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन हे अर्ज भरून घेतात. सासष्टीतील एका आमदाराला याचा वेगळाच अनुभव आला. एका शिक्षिकेने त्या मोफत गॅस अर्जावर जे लिहिले ते वाचून आमदाराचे कार्यकर्ते अचंबित झाले. त्या शिक्षिकेने अर्जावर आपली सर्व माहिती दिली व लिहिले की, मी गॅस घेण्यास समर्थ आहे. सरकार मला वेतन देते. मला मोफत दिलेले किंवा भीक घेण्यात रस नाही. मला मोफत गॅस सिलिंडर नकोत. खरोखरच धनवानांनी यातून बोध घ्यायला नको का?

जेन झी, आल्फा नंतर बिटा

‘जेन झी’ म्हणजे १९९७-२०१२ दरम्यान जन्मलेली पिढी. ‘जेन आल्फा’ म्हणजे २०१३-२०२४ दरम्यान जन्मलेली मुले. ‘जेन झी’ची वाढ सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या उदयासोबत झाली. तर ‘जेन आल्फा’ ही ‘ए-आय’वर वाढलेली पिढी आहे, जी लहानपणापासूनच स्मार्ट डिव्हाइस, व्हॉइस असिस्टंट आणि गेमिफाइड शिक्षणाशी परिचित आहे. भविष्यात ‘जेन बिटा’ (२०२५-२०४० अंदाजे) ही पिढी येणार. ती ए-आय, रोबोटिक्स, आणि बायोटेक्नॉलॉजीसोबत वाढेल. प्रत्येक नवीन पिढीचे वैशिष्ट्य त्या काळातील जागतिक घटना आणि तंत्रज्ञान ठरवतील. तंत्रज्ञानाचा विस्तार, नवीन शोध किती गतीने होत आहे याची कल्पना सामान्यांना नाही. एक खरे या सर्व पिढ्या डिजिटल संस्कृतीत पूर्णपणे बुडालेल्या व एकजीव, समरस झालेल्या असतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काळाचा महिमा अगाध!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com