खरी कुजबुज: काँग्रेस पुन्हा तेच करणार!

Khari Kujbuj Political Satire: ‘विजयचा दामू नाईक यांना फोन’ हे वाचल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना फोन केला, असे स्वतः फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस पुन्हा तेच करणार!

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू इच्छिणाऱ्या सर्वच पक्षांशी युती करण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर या प्रमुख नेत्यांनी जाहीर केले. परंतु, त्याअनुषंगाने वेणुगोपाल यांनी दोन दिवसांच्या गोवा भेटीत इतर पक्षांच्या कोणत्याही नेत्याची भेट घेतली नाही. गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेससोबत आहे. आपनेही युतीसाठी काँग्रेसला साद घातलेली आहे. तरीही निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर आलेली असतानाही काँग्रेस नेते पुढाकार घेत नसल्याचे पाहून, या पक्षांना काँग्रेस अखेरच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवणार आणि अधिकाधिक जागा स्वत:च्या पदरात पाडून घेणार, अशी शंका विरोधी पक्षांचे नेते आपापल्या पक्षप्रमुखांजवळ व्यक्त करीत आहेत.

विजय यांचा दामूंना फोन

‘विजयचा दामू नाईक यांना फोन’ हे वाचल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना फोन केला, असे स्वतः फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. आपण सलग तीन कार्यकाळ फातोर्ड्याचे आमदार आहोत. आता आपल्याला आमदार म्हणून १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. गेल्या १५ वर्षांत आपल्यावर दामू यांना फोन करण्याची पाळी आली नव्हती. पण काल फोन केला, असे त्यांनी सांगितले. सरदेसाई यांच्या हस्ते घोगळ येथील हनुमान मंदिराच्या विस्ताराची पायाभरणी झाली. या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यासाठी व मंदिरात राजकारण होता कामा नये, हे सांगण्यासाठी आपण दामू यांना फोन केला, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. काही का होईना, संकटमोचन हनुमान यांच्या निमित्ताने दोघेही राजकारणी एकमेकांशी बोलले, हे चांगलेच झाले नाही का, अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करू लागले.

महिला आयोग अध्यक्षपद अन् चर्चा

रंजिता पै यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली. पै यांचा कार्यकाळ मार्च महिन्यामध्ये संपला होता. पण त्यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यास सरकारला अडीच ते तीन महिने कसे काय लागले? सरकारची पै यांचीच नियुक्ती करायची होती, तर ती लगेच करता आली नसती का? आता उशीर झाला म्हणजे भाजपचे कार्यकर्ते किंवा सामान्य लोकांमध्ये चर्चा ही होणारच. आणखी एक महिला नेत्या या पदासाठी इच्छुक होती म्हणे. तिने फिल्डिंग सुद्धा लावली होती. पण शेवटी रंजिता पै यांचीच वर्णी लागली. मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही महिलांनीसुद्धा ज्येष्ठ नेत्याच्या आशीर्वादाने तयारी सुरू केली आहे. जर भाजपने ऐनवेळी मडगावमध्ये महिला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तर ज्येष्ठ व क्रियाशील कार्यकर्त्या तसेच प्रदेश समितीत महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या रंजिता पै यांची निश्चितच वर्णी लागली असती. त्यामुळे आपल्या मर्जीतील महिलेला उमेदवारी मिळावी म्हणून पै यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवून मार्ग मोकळा केला असावा, असा तर्क आता भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Electricity: खासगी कंपनीला 'पॉवर' नाहीच, राज्य सरकारकडून स्पष्ट; खात्याकडूनच होणार वीज वितरण

‘त्या’ विद्यापीठाने खरेदी केल्यात २५ बसेस!

हे स्पर्धात्मक युग आहे. या युगात तग धरायचा असेल तर स्पर्धा करावीच लागते. राज्यातील एका नव्याने सुरू झालेल्या विद्यापीठाने हळूहळू आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली आहे. या विद्यापीठाने गोव्यातील विविध भागांतून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी पंचवीस नव्या बसेस खरेदी केल्या आहेत. आपल्या काही शिक्षणसंस्था धड एक बस खरेदी करू शकत नाहीत. शिवाय या विद्यापीठाची जाहिरात मोठमोठ्या राष्ट्रीय चॅनेलवर होते. धोनीपासून अमिताभपर्यंत विद्यापीठाचे गुणगान गाताना दिसतात. मग, विद्यार्थी इतरत्र का जाणार? म्हणतात ना, ‘नडणी कशीय जावं, कोण्णो बरो हालुक जाय.

कुतिन्हो फॅमिलीला उमेदवारी मिळणार?

प्रतिमा कुतिन्हो यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्ष त्यांच्यासाठी नवा नाही. त्यांचे पतीराज सावियो हे मडगाव गट काँग्रेसचे संयोजक आहेत. प्रतिमा मॅडम यापूर्वी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा होत्या. नंतर त्या आम आदमी पार्टीत गेल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नावेली मतदारसंघातून याच ‘आप’च्या उमेदवारीवरून विधानसभा निवडणूक लढविली व त्या पराभूत झाल्या. त्यांचे पती सावियो यांनीही यापूर्वी मडगावातून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनाही अपयशच आले, हा आजमितीचा इतिहास आहे. आता पती व पत्नी दोघेही काँग्रेसमध्ये आहेत. त्यापैकी एकट्याला तरी हा पक्ष विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण मडगावात चिराग नायक हे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. तर नावेलीत सिप्रू. जोडीला वालंका आलेमाव या काँग्रेस पक्षात आल्या, तर त्याही उमेदवारीवर दावा ठोकतील. जर कुतिन्हो फॅमिलीमधील दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांची पुढील भूमिका काय असेल? हा सासष्टीत सध्या सर्वांत चर्चेचा विषय ठरत आहे.

विरियातोंना नक्की काय संदेश!

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल गोवा दौऱ्यावर आले. या दौऱ्यात पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे त्यांनी ‘वन टू वन’ ऐकले आणि त्यांना आश्वस्त केले. बैठकांच्या दिवशी सुरुवातीला खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची भेट घेण्यात आली. त्यानुसार ते सकाळी नऊ वाजताच वेणुगोपाल यांना भेटून निघून गेले. त्यानंतर ते परत बैठकीलाही आले नाहीत. त्यामुळे विरियातो यांची अनुपस्थिती अनेकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी गाडीचा मार्ग बदलून वेणुगोपाल यांनी चिखली येथे विरियातो ज्या शेतात काम करीत होते, त्या शेतात जाऊन त्यांची भेट घेतली. विरियातोंबरोबर त्यांनी भोजनही घेतले .त्यामुळे वेणुगोपाल यांनी विरियातोंना नक्की काय संदेश दिला, हे मात्र गुलदस्त्यातच राहणार आहे.

ओंकारनंतर बिबटे...

काही महिन्यांपूर्वी ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने महाराष्ट्र-गोवा सीमेवर असा काही धुमाकूळ घातला होता की, वनखात्यापासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांचीच धावपळ उडाली होती. आता त्याची चर्चा थांबते न थांबते, तोच बिबट्यांनी विविध भागांत दर्शन द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ‘ओंकार गेला अन्‌ बिबटे आले!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

धीरयो थांबेना, कोलवात ‘सेटिंग’

कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धीरयो काही केल्या बंद होण्याचे नाव घेत नाही. शनिवारी या भागात दोन ठिकाणी रेड्यांच्या झुंजी आयोजित केल्या होत्या व त्या यशस्वीपणे पारही पडल्या. त्यामागे याच ठाण्यातील एका पोलिसाचा आशीर्वाद होता, असे उघड होत आहे. हा पोलिस कोण, हे सायब लोकांना माहीत नाही, अशी भाबडी कल्पना करू नये, हा... सायबांचा लाडका असलेला हा असामी कामावर तसा कमीच दिसतो. मात्र, त्यांच्यासाठी कलेक्शनचे काम तो इमानेइतबारे करतो. ही त्याची खरी ड्युटी. धीरयोंचे सर्व सेटिंग त्याच्या संमतीशिवाय होत नाही. एका झुंजीमागे पंचवीस हजार असा रेट. नावात ‘कुल’दीपक असलेल्या या पोलिसाचा थाटही वेगळाच... तो कुणाला जुमानत नाही. ठाण्यातील अन्य पोलिस या कलेक्शनवाल्या पोलिसाच्या नावाने बोटे मोडीत असले, तरी तो मात्र बिनधास्त आहे. शेवटी ‘जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस’ म्हणतात ते खोटे नाही.

Khari Kujbuj Political Satire
Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

दुसऱ्या फळीतील एसटी नेते बाजूला?

वास्तविक एसटी संदर्भातील कुठलाही प्रश्न असो, सरकार किंवा एसटीचे प्रमुख नेते अडचणीत येत आहेत, असे वाटल्यास प्रभाकर गावकर, अँथनी बार्बोजा आणि अन्य दुसऱ्या फळीतील नेत्यांना ढाल म्हणून पुढे केले जात असे. मात्र, रविवारी एसटी नेत्यांची मडगावात बैठक झाली; पण त्या बैठकीपासून दुसऱ्या फळीतील नेत्यांना तेही मडगावात असूनही बाजूला ठेवल्याचे दिसून आले. कदाचित एसटींना आरक्षण मिळणे आता कठीण असे दिसू लागल्यावर ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील मतभेदांची दरी वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली की, या ज्येष्ठ नेत्यांना सूत्रे आपल्याच हाती राहावीत असे वाटल्यामुळे ही दक्षता घेण्यात आली? काय बरे असेल खरे कारण?

दुसऱ्या फळीतील एसटी नेते बाजूला?

वास्तविक एसटी संदर्भातील कुठलाही प्रश्न असो, सरकार किंवा एसटीचे प्रमुख नेते अडचणीत येत आहेत, असे वाटल्यास प्रभाकर गावकर, अँथनी बार्बोजा आणि अन्य दुसऱ्या फळीतील नेत्यांना ढाल म्हणून पुढे केले जात असे. मात्र, रविवारी एसटी नेत्यांची मडगावात बैठक झाली; पण त्या बैठकीपासून दुसऱ्या फळीतील नेत्यांना तेही मडगावात असूनही बाजूला ठेवल्याचे दिसून आले. कदाचित एसटींना आरक्षण मिळणे आता कठीण असे दिसू लागल्यावर ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील मतभेदांची दरी वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली की, या ज्येष्ठ नेत्यांना सूत्रे आपल्याच हाती राहावीत असे वाटल्यामुळे ही दक्षता घेण्यात आली? काय बरे असेल खरे कारण? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com