
Goa BJP State President Selection
पणजी: कधी नव्हे तो प्रदेशाध्यक्षपदी कोण, असा प्रश्न भाजप संघटनेसमोर उभा ठाकला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून अमूकच व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी असावी, असे काही नेत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे सध्या अमूकच व्यक्ती यापुढे प्रदेशाध्यक्ष असेल, असे कोणी सांगू शकत नव्हते.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे प्रदेश सरचिटणीपदी असताना विनय तेंडुलकर प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी तानावडे हे पुढील प्रदेशाध्यक्ष असतील, हे ठरून गेलेले होते. कार्यकर्तेही उघडपणे तसे सांगू शकत होते. तानावडे पुढे प्रदेशाध्यक्ष झालेही.
आता माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार दामू नाईक हे प्रदेश सरचिटणीसपदी आहेत. त्यापैकी कोण प्रदेशाध्यक्ष होईल, याचे नेमके उत्तर भाजपचा कार्यकर्ता देऊ शकत नाही. यातच वीज मंत्री आणि मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने युतीच्या चर्चेनेही गती घेतली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सपाटा लावला होता. त्यात सरकारी व संघटनात्मक बैठकांचाही समावेश होता.
त्यातच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याने त्याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. तानावडे यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचा आजवर चर्वितचर्वण करून गुळगुळीत झालेला मुद्दा माध्यमांसमोर मांडला, तरीही बैठकीत काहीतरी महत्त्वाची चर्चा झाल्याची वदंता होती.
माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासाठी सरकारमधील काही बडे नेते आग्रही आहेत. त्यांनी दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी त्यांचा भंडारी चेहरा संघटनेच्या प्रमुखपदी का हवा, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या जोडीने माजी मंत्री दिलीप परूळेकर, दयानंद मांद्रेकर, सध्याचे सरचिटणीस सावईकर आणि दामू नाईक यांची नावेही यासाठीच्या चर्चेत आणण्यात आली आहेत.
पक्ष संघटनेवर प्रदेशाध्यक्षांच्या रूपाने आपली पकड राहावी, यासाठी पुढे केले जाणारे मोहरे खरे प्रदेशाध्यक्ष ठरतात काय हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपच्या पद्धतीनुसार प्रदेशाध्यक्षाची निवड ही बिनविरोध होणार असली तरी संघटनेवर कोणाची हुकूमत आहे, हे जाणवल्यावाचून राहणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांतून नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव पुढे येईल, असे सोयीस्कर उत्तर यासंदर्भातील प्रश्नावर दिले जात असले तरी प्रत्यक्षात कोणत्याही एका नावावर प्रदेश पातळीवर अद्याप मतैक्य झालेले नाही, असे दिसते. संघटनपर्व काळात संघटनात्मक निवडणुका घेतल्या जात असून यंदा लागू झालेल्या वयाच्या निकषांमुळे भाजपच्या मंडळ पातळीवर नवे चेहऱे शोधण्याची वेळ भाजपवर आली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता फेटाळणारे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आता यावर्षी फेरबदल होतील, असे संकेत दिले आहेत. मात्र, हे फेरबदल कधी होतील, याबाबत स्पष्ट केलेले नाही. फेरबदलाची चर्चा चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र त्याला मुहूर्त सापडलेला नाही. मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता असल्याचे मत खासदार तानावडे यांनी व्यक्त केले होते. मात्र, काही दिवसांनी घुमजाव करत ही शक्यता फेटाळली होती. आता पुन्हा त्यांनी यावर्षी मंत्रिमंडळ फेरबदल शक्य असल्याचे स्पष्ट केले. यावरून खासदार तानावडे हेच या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत संभ्रमात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.