

पणजी: देशातील वाहनविक्री आणि विद्युत वाहनांच्या वापराबाबत प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याने पुन्हा एकदा देशात अव्वल स्थान पटकावले आहे. यंदाच्या मार्च महिन्यात एकूण वाहनविक्रीत विद्युत वाहनांचे प्रमाण १९.४५ टक्के इतके नोंदवले असून, हा देशातील सर्वाधिक आकडा आहे.
पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वाटचाल करणाऱ्या राज्यांमध्ये गोवा पुन्हा एकदा आदर्श ठरला आहे. राज्यांनुसार तुलना केली असता, केरळ १७.७० टक्क्यांसह दुसऱ्या, कर्नाटक १६.८५ टक्क्यांसह तिसऱ्या, तर ओडिशा १५.०१ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
पुडुचेरी आणि मध्य प्रदेश यांचाही या यादीत उल्लेखनीय सहभाग दिसून येतो. मात्र, या सर्व राज्यांना मागे टाकत गोव्याने सातत्याने वर्चस्व राखले आहे. वाहनविक्रीच्या एकूण संख्येच्या दृष्टीने चित्र काहीसे वेगळे आहे. महाराष्ट्र राज्य सुमारे ३३ हजार वाहनांच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तमिळनाडू (२५ हजार) आणि कर्नाटक (२४ हजार) ही राज्ये आहेत.
...या कारणांमुळे वाढला वापर
तज्ज्ञांच्या मते, गोव्यात विद्युत वाहनांच्या वाढत्या वापरामागे अनेक घटक कारणीभूत आहेत.
राज्य शासनाकडून दिले जाणारे प्रोत्साहन, करसवलती, तसेच चार्जिंग केंद्रांची वाढती संख्या यांमुळे नागरिकांना हा पर्याय अधिक सोयीस्कर वाटत आहे.
गोव्याचे भौगोलिक क्षेत्र लहान असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठी विद्युत वाहने अत्यंत उपयुक्त ठरतात.
पर्यटनप्रधान अर्थव्यवस्थेमुळे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीला अधिक महत्त्व दिले जात आहे.
शहरांमधील कमी अंतर, इंधनाच्या वाढत्या किमती, तसेच पर्यावरणाबाबत वाढती जाणीव यांमुळे सामान्य नागरिकही विद्युत वाहनांकडे वळतात. दुचाकी वाहनांच्या बाबतीत विशेषतः हा कल अधिक स्पष्ट दिसून येतो.
...तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदर्श राज्य : कमी खर्च, सोपी देखभाल आणि शांत प्रवास यांमुळे या वाहनांना वाढती पसंती मिळत आहे. तज्ज्ञांनी असेही नमूद केले आहे की, भविष्यात जर चार्जिंग पायाभूत सुविधा आणखी मजबूत केल्या आणि ग्रामीण भागातही त्याचा विस्तार झाला, तर गोवा केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदर्श राज्य ठरू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.