Land Dispute Case: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा
Swami Shivanand SaraswatiDainik Gomantak

Kavale Math Conflict: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा

Swami Shivanand Saraswati Land Dispute Case: ‘‘कवळे मठाचे स्वामी शिवानंद सरस्‍वती हे विश्वस्त मंडळ व उच्च न्यायालयाने मंजूर करून दिलेली नियमावली मान्य करायला तयार नसले तरी या नियमावलीच्या कागदपत्रांवर खुद्द त्यांनी सही केलेली आहे.
Published on

पणजी: ‘‘कवळे मठाचे स्वामी शिवानंद सरस्‍वती हे विश्वस्त मंडळ व उच्च न्यायालयाने मंजूर करून दिलेली नियमावली मान्य करायला तयार नसले तरी या नियमावलीच्या कागदपत्रांवर खुद्द त्यांनी सही केलेली आहे.

त्यामुळे ‘ही नियमावली आपल्याला मान्य नाही व आपण नवे विश्वस्त मंडळ नेमले आहे, जे आपल्याला जमीन विक्री संदर्भात संपूर्ण अधिकार मिळवून देते’, अशी जी स्वामी भूमिका मांडतात, त्यात तथ्य नाही’’, असा दावा जुन्‍या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केला आहे.

जुन्या विश्वस्त मंडळातील एक सदस्य चंद्रकांत धुमे यांनी दिलेल्या माहितीनुसार- स्वामी जरी धर्मादाय आयुक्तालय (मुंबई) यांच्याकडे मठाची नोंदणी झाली नसल्याचे सांगत असले तरी प्रत्‍यक्षात स्वामी हे प्राप्‍ती करामध्‍ये सूट घेतात व सर्व पद्धतीच्या धर्मादाय कार्यात सहभागी होतात - याचा अर्थ असा, मठ धर्मादाय आयुक्तांकडे नोंद झालेला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व नियम, कायदे मठाला व स्वामींच्‍या व्यवहारांना लागू होतात.

Land Dispute Case: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा
Kavale Math: शिवानंद स्वामींविरोधात गुन्हा नोंद झाल्याच्या बातमीमुळे खळबळ! मनमानी कारभारावरून वेगवेगळे मतप्रवाह

परिणामी त्यांना सर्व मठाच्या व्यवहारांमध्ये धर्मादाय आयुक्तांची मान्यता घेणे जरुरी ठरते. तशी मान्‍यता घेतली नसेल तर सर्व व्यवहार बेकायदा ठरतात. त्याचप्रमाणे धर्मादाय आयुक्त यांचे वेळोवेळी लागू असलेले नियम तसेच या मठासंदर्भात जी नियमावली तयार केली आहे, त्यानुसार त्यांना काम करावे लागेल. नाहीतर त्यांचे सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरतात, असा दावा धुमे यांच्‍यासह विश्‍‍वस्‍त मंडळाच्या काही जुन्‍या सदस्यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना केला. उच्च न्यायालयाकडून (High Court) तयार करून घेण्यात आलेल्या नियमावलीवर ‘त्या’ काळातील सर्व विश्वस्त मंडळ सदस्यांनी सह्या केल्या होत्या व त्यात विद्यमान स्वामींचाही समावेश आहे, असेही त्‍यांनी निक्षून सांगितले.

पॉवर ऑफ ॲटर्नी मागे न घेणे हा गफलाच

विद्यमान स्वामी शिवानंद सरस्वती यांनी आपले दिवंगत गुरू सच्चिदानंद सरस्‍वती स्वामींच्या नावाने जी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ अवधूत काकोडकर यांना दिली होती, ती आजपावेतो परत घेतलेली नाही. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर किंवा तो मागे घेतल्यानंतर ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ ताबडतोब मागे घ्यायची असते. वास्तविक, ही ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ मागे न घेणे हाच मोठा एक मोठा गफला आहे, अशी प्रतिक्रियाही जुन्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Land Dispute Case: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा
Kavale Math: कवळे मठाच्या स्वामींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल! जमीन व्यवहारात फसवणुकीचा आरोप; विश्‍‍वस्‍त मंडळाचीही गळचेपी

जमीन व्‍यवहारांची चौकशी केल्‍याने विश्‍‍वस्‍ताला हटविले

कवळे मठाच्‍या कथित जमीन व्‍यवहारासंदर्भात संविधानिक पद्धतीने विचारणा केल्‍याने जुन्‍या विश्‍‍वस्‍त मंडळातील सदस्‍य गुरुदत्त संझगिरी यांना खड्यासारखे बाजूला काढण्‍यात आले. त्‍या संदर्भातील कागदपत्रे ‘गोमन्‍तक’कडे असून, हा गळचेपीचा प्रकार असल्‍याचा दावा संझगिरी यांनी केला आहे.

या संदर्भात गुरुदत्त संझगिरी यांनी १६ एप्रिल २०१८ रोजी कवळे मठ विश्‍‍वस्‍त मंडळाचे सचिव अभय काकोडकर यांना पत्राद्वारे कथित जमीन व्‍यवहारासंदर्भात काही प्रश्‍‍न केले होते. ‘त्‍या’ पत्रात म्‍हटले होते- कवळे येथील भूखंड विकला गेला हे खरे आहे का? खरे असल्यास, कृपया विक्री खत वा विक्री करारपत्राची प्रत प्रदान करा. तसेच विश्‍‍वस्‍त मंडळ बैठकीत विषयपत्रिकेवर विक्रीसंदर्भात सूचिबद्ध करण्यात आलेल्या नोटिशीची प्रतही द्यावी. अशा पद्धतीने भूखंड विक्रीला मान्यता देणाऱ्या ठरावाची प्रत आणि या विक्रीसाठी मान्यता दिलेल्या विश्‍वस्तांची नावे कळावीत.

अभय काकोडकर यांनी विश्‍‍वस्‍त मंडळ सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘ट्रस्ट’च्या अन्‍य काही मालमत्ता विकल्‍या असल्‍यास त्‍याचा तपशील द्यावा. उपरोक्‍त प्रश्‍‍नांची उत्तरे देण्‍याऐवजी स्‍वामी शिवानंद सरस्‍वती यांनी गुरुदत्त संझगिरी यांना विश्‍‍वस्‍त पदावरून कार्यमुक्‍त करण्‍यात यावे, असे सचिवांना फर्मान काढले. विचारलेल प्रश्‍‍न ही गैरवर्तणूक ठरवली गेली व गुरुपीठाच्‍या प्रतिष्‍ठेला धक्‍का पोहोचल्‍याचे कारण पुढे करून संझगिरी यांना हटविण्‍यात आले.

Land Dispute Case: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा
Kavale Panchayat: नाल्‍यात कचरा फेकणाऱ्यास पाच हजार रुपये दंड; ग्रामसभेत सूचना

कथित बेकायदा जमीन व्‍यवहार प्रकरणी कवळे मठाचे शिवानंद सरस्‍वती स्‍वामी व इतर दोघांविरोधात फोंडा पोलिसांत दाखल फौजदारी तक्रारीतील दावे ‘गोमन्‍तक’मधून प्रसिद्ध होताच, मठाचे अनुयायी डॉ. सचिन मंत्री व ट्रस्‍टच्‍या वकील मंदा लोके यांनी पणजीत (Panaji) पत्रकार परिषद घेतली. दावे खोडून काढण्‍याऐवजी तोकड्या युक्‍तिवादाचा त्‍यांनी आधार घेतला.

‘कवळे मठाच्या मालमत्तेविषयी २०१८ मध्ये झालेल्या विक्री करारावर शिवानंद स्वरस्वती स्वामींचीच सही होती; परंतु टंकलेखनातील चुकीमुळे त्यांच्या नावाऐवजी पूर्वीच्‍या स्वामींचे नाव आले. ‘त्या’ कारणास्तव तो विक्री करार फोंडा दिवाणी न्यायालयाकडून ‘डिक्री’ घेऊन रद्दबातल केला, असे डॉ. मंत्री म्‍हणाले. परंतु यावेळी त्‍यांनी एका जुन्‍या विश्‍‍वस्‍ताने न्‍यायालयात दावा दाखल केल्‍याने माघार घ्‍यावी लागली असल्‍याचा उल्‍लेख मात्र खुबीने टाळला.

Land Dispute Case: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा
CM Pramod Sawant: खुशखबर! गोव्यात मिळणार 150 ठिकाणी मोफत ‘वायफाय’ सुविधा

मठाचे सर्व अधिकार स्वामींकडे आहेत, असाही त्‍यांनी दावा केला. मठाविषयी आलेल्या वृत्तामुळे अनुयायांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी पत्रकार परिषद घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. श्री देवी शांतादुर्गा व मंगेश देवस्थानांच्‍या लवकरच निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वामींविरुद्ध तक्रार देऊन काही घटकांचा प्रसिद्धीचा खटाटोप चालला असावा, असे मत द्वयींनी व्‍यक्‍त केले. मात्र, स्‍वामींनी स्‍थापन केलेल्‍या विश्‍‍वस्‍त मंडळात वरील दोन देवस्‍थानांचे सदस्‍य का नाहीत, यावर खुलासा करण्‍यात आला नाही.

स्वामींच्या विरोधात पोलिस तक्रार दिल्याने अनेकांची मने दुखावली आहेत, असे डॉ. मंत्री व ॲड. लोके यांनी नमूद केले. गोव्यात तक्रार दाखल झाली आहे; परंतु पोलिसांकडून कोणतीही नोटीस मठाला आलेली नाही, असे ॲड. लोके यांनी सांगितले. तथापि, पोलिसांनी ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या माहितीप्रमाणे मठाकडे सध्‍या आवश्‍‍यक कागदपत्रे मागण्‍यात आली असून, त्‍याची पडताळणी करून पुढील पावले उचलण्‍यात येतील. दरम्‍यान, तक्रारदार डॉ. रामाणी व भूषण जॅक यांनी तक्रारीत जे उल्‍लेख केले आहेत वा माध्‍यमांतून जे मुद्दे समोर आले, त्‍याचाच द्वयींनी पुनरुच्‍चार केला; दावे खोडून काढता आले नाहीत.

Land Dispute Case: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा
Pramod Sawant: मद्यपींना मुख्यमंत्र्यांनी भरला दम, साखळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

प्रश्‍‍न विचारले वा चूक दाखवून दिल्‍यास खरे तर सन्‍मान व्‍हायला हवा. परंतु मला ‍विश्‍‍वस्‍त पदावरून दूर करण्‍यात आले, जे दुर्दैवी होते. मला विश्‍‍वस्‍त पदावरून काढून टाकल्‍यानंतर मी फोंड्याच्‍या दिवाणी न्‍यायालयात दावा दाखल केला व जमीन व्‍यवहार बेकायदा असल्‍याचे पुराव्‍यांसह म्‍हणणे मांडले. त्‍यावर दोन सुनावण्‍या झाल्‍या. अखेर स्‍वामींना उपरती झाली आणि त्‍यांनी सर्व जमीन व्‍यवहार रद्दबातल केले. ही महत्त्‍वपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्‍‍यक आहे. - गुरुदत्त संझगिरी, जुने विश्‍‍वस्‍त, कवळे मठ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com