Kavale Math: कवळे मठाच्या स्वामींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल! जमीन व्यवहारात फसवणुकीचा आरोप; विश्‍‍वस्‍त मंडळाचीही गळचेपी

Swami Shivanand Saraswati land dispute case: शिवानंद स्‍वामी, अवधूत श्रीराम काकोडकर व नोटरी मनोहर आडपईकर यांच्‍याविरोधात एफआयआर दाखल झाले आहेत.
Kavale Math News
Swami Shivanand Saraswati land dispute case goaDainik Gomantak
Published on
Updated on

Kavale Math Shivanand Swami Crime News Ponda

पणजी: कवळे मठाचे शिवानंद सरस्‍वती स्‍वामी व इतर दोघांविरोधात फोंडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्‍हा दाखल झाल्‍यामुळे मठाच्‍या अनुयायांमध्‍ये मोठी खळबळ माजली आहे. या मठाचे अनुयायी गोव्‍यासह मुंबई व कर्नाटकात पसरले आहेत.

मठाची फोंडा तालुक्‍यातील जमीन विकताना विद्यमान स्‍वामी शिवानंद सरस्‍वती यांनी स्‍वर्गवासी सच्चिदानंद सरस्‍वती यांची सही करून तोतयेगिरी केल्‍याचा गंभीर आरोप कवळे मठाच्‍या प्रतिष्‍ठित अनुयायांनी केला आहे.

बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे योग्‍य मान्‍यता न घेता व उच्च न्‍यायालयाने मंजूर केलेल्‍या नियमांचा भंग करून शिवाय मुंबईच्‍या धर्मादाय आयुक्तांना अंधारात ठेवून हा व्‍यवहार केल्‍याचेही तक्रारीत नोंद केले आहे. मठाचे विश्‍‍वस्‍त मंडळ स्‍वामींनी मनमानी पद्धतीने बरखास्‍त केले व इतरही काही बेकायदेशीर जमीन व्‍यवहार केले असल्‍याचे स्‍वामींवर आणखी गंभीर आरोप आहेत.

फोंडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्‍हा भारतीय दंड विधान ४२०, ४१९ अन्‍वये तोतयेगिरी, ४६५ अन्‍वये खोटारडेपणा आदी गुन्‍हे नोंद केले असून एफआयआर १५ जानेवारी २०२५ रोजी नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पोलिसांनी यासंदर्भात मठाकडून काही कागदपत्रांची मागणी केली असून त्‍यानंतर कारवाई सुरू होईल.

शिवानंद स्‍वामी, जमीन विकण्‍यासाठी ज्‍यांच्‍या नावे पॉवर ऑफ ॲटर्नी देण्‍यात आली ते अवधूत श्रीराम काकोडकर व नोटरी मनोहर आडपईकर यांच्‍याविरोधात एफआयआर दाखल झाले आहेत.

फोंडा पोलिसांत कवळे मठाचे अनुयायी व गौडपादाचार्य संस्‍थानचे शिष्‍य असलेले प्रख्‍यात न्‍युरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी व मुंबईचे दुसरे मठानुयायी भूषण जॅक यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी ही तक्रार नोंदविली होती; ज्‍यात श्री शिवानंद सरस्‍वती स्‍वामींच्‍या कथित गैरव्‍यवहारांवर गंभीर आरोप केले आहेत.

ज्‍यात बेकायदेशीररीत्या पॉवर ऑफ ॲटर्नी देऊन मठाच्‍या जमिनी विकणे, स्‍वर्गवासी स्‍वामीजींच्‍या नावे तोतयेगिरी करणे व धर्मादाय आयुक्तांच्‍या नियमांचा भंग करण्‍याचे आरोप समाविष्‍ट आहेत. २० फेब्रुवारी २०१८ रोजी ज्‍या दिवशी ही पॉवर ऑफ ॲटर्नी देण्‍यात आली, त्‍या दिवशी स्‍वामी सच्चिदानंद सरस्‍वती हयात नव्‍हते- जे ३ मार्च २००५ रोजी स्‍वर्गवासी झाले होते- तोतयेगिरी हा फौजदारी गुन्‍हा आहे.

या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांची मान्‍यता तर घेतली नाहीच, शिवाय कवळेस्‍थित विश्‍वस्‍त मंडळालाही अंधारात ठेवल्‍याचा आरोप आहे. किंबहुना हा प्रकार उघडकीस आल्‍यानंतर फोंडा तालुक्‍यातील ही जमीन परत मिळविण्‍यात आली, विक्रीखत रद्द करण्‍यात आले, तसा निकाल फोंड्याच्‍या दिवाणी न्‍यायालयातून प्राप्‍त करण्‍यात आला असला तरी त्‍यानंतरही तसे आणखी किमान तीन जमीन व्‍यवहार बेकायदेशीर पॉवर ऑफ ॲटर्नी नेमून घडविल्‍याचे निदर्शनास आले आहे; ज्‍याची कागदपत्रे ‘गोमन्‍तक’कडे उपलब्‍ध आहेत.

स्‍वामींना निकट असलेले कवळे मठाचे एक पदाधिकारी प्रफुल्ल हेदे यांच्‍या मते स्‍वामीजींनी दिवंगत स्‍वामीजी सच्चिदानंद सरस्‍वतींच्‍या नावे सही करणे हा प्रकार नजरचुकीने घडला व त्‍यानंतर त्‍यांनी स्‍वत:च ते विक्रीखत रद्द केले आहे. ही जमीनही परत मिळाल्‍यामुळे त्‍यात जाणूनबुजून गैरव्‍यवहार घडल्‍याचे मानता येणार नाही; झालेच तर त्‍यांच्‍या सल्लागारांनी चुकीचा सल्ला दिल्‍याने हा प्रकार घडला असे मानता येईल, असे ते म्‍हणाले.

परंतु मठाच्‍या जमिनी विकण्‍याचे प्रकार अन्‍यत्रही घडले आहेत व त्‍यासाठी पॉवर ऑफ ॲटर्नी नेमण्‍यात आले आहेत, हा प्रकार मठाचे नियम व न्‍यायालयाचे निर्देश यांचा भंग नाही का, असे विचारता, त्‍याबाबत आपण संपूर्णत: अनभिज्ञ असल्‍याचा दावा हेदे यांनी केला व तो प्रकार चुकीचा असल्‍याचेही मान्‍य केले.

मंगेशी देवस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. अजित कंटक यांनीही फोंडा तालुक्‍यातील जमीनविक्रीतील बनावट सहीचे प्रकरण नजरचुकीने घडू शकते असा दावा केला. परंतु मठाच्‍या जमिनी विकता येत नाहीत व तो प्रकार अत्‍यंत निंदनीय, भ्रष्‍ट, बेकायदेशीर असल्‍याचे ठासून सांगितले.

तक्रारदारांनी नोंदविले आहे की दिवाणी खटला ८९/२०१८/क मध्‍ये श्री शिवानंद सरस्‍वती स्‍वामी व अवधूत श्रीराम काकोडकर यांनी जाणूनबुजून खोटी व चुकीची माहिती दिली आहे.

कवळे मठाच्‍या विश्‍‍वस्‍त मंडळाची नियमावली तयार करण्‍यात आली व ज्‍याला मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या पणजी खंडपीठाने मान्‍यता दिली त्‍या १५ मार्च २००७च्‍या शर्तींना आपण मान्‍यता दिली नव्‍हती व त्‍यावर सहीही केली नव्‍हती. तक्रारदारांच्‍या मते या नियमावलीवर स्‍वामींची सही आहे. शिवाय या नियमावलीवर स्‍वामींनी विश्‍‍वस्‍त म्‍हणून सही केलेली असून ते विश्‍‍वस्‍त नाहीत; शिवाय मुंबईच्‍या धर्मादाय आयुक्तांकडेही त्‍यांची विश्‍‍वस्‍त म्‍हणून नोंदणी नाही. किंबहुना त्‍यांनी २०१८ व २०२२ मध्‍ये दोनवेळा विश्‍वस्‍त म्‍हणून आपले नाव समाविष्‍ट करावे यासाठी अर्ज केला आहे, ज्‍यावर अद्याप निर्णय व्‍हायचा आहे. त्‍याप्रमाणे शिवानंद स्‍वामींनी नोंदीमध्‍ये फेरफार करून धर्मादाय आयुक्तांसमोर खोटी मािहती सादर केल्‍याचाही दावा तक्रारदारांनी पोलिस तक्रारीत केला आहे.

या मठाचे विश्‍‍वस्‍त म्‍हणून स्‍वत:चे नाव जोडून फसवणूक व गौडबंगाल करून स्‍वामींना श्री गौडपादाचार्य संस्‍थान विश्‍‍वस्‍त व कवळे मठ गौड सारस्‍वत स्‍मार्त समाजाच्‍या मालमत्ता परस्‍पर विकून टाकायच्‍या आहेत, असाही आरोप डॉ. पी. एस. रामाणी व भूषण जॅक यांनी केला असून स्‍वामींविरोधात अत्‍यंत कडक फौजदारी कारवाई करण्‍याचा आग्रह धरला आहे.

तक्रारदारांच्‍या मते स्‍वामींनी सदर विश्‍‍वस्‍त मंडळाच्‍या जमिनी परस्‍पर विकून टाकण्‍यासाठी कित्‍येक लोकांना ठिकठिकाणी पॉवर ऑफ ॲटर्नी दिल्‍या असून कोणतीही न्‍यायसंमत पद्धत न अवलंबता भारतात अनेक ठिकाणी असलेल्‍या या मालमत्ता धोक्‍यात आल्‍या आहेत.

‘गोमन्‍तक’कडे अशा काही जमिनींच्‍या व्‍यवहारांची कागदपत्रे उपलब्‍ध झाली असून दिल्ली येथील मठाची एक मोठी मालमत्ता विकण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहेत; आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे या प्रचंड किमतीच्‍या मालमत्ता अवघ्‍या १५ ते २० लाखांना विकल्‍या जात आहेत, ज्‍यांचे प्रत्‍यक्ष मोल खूप मोठे असू शकते.

‘आगामी निवडणुकीसाठी खटाटोप’

कवळे मठासंबंधीच्या विक्रीखतात केवळ कारकुनी चुकीमुळेच पुढील प्रकरण उद्भवले. या विक्रीखतासाठी श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी यांनी आपला ॲटर्नी अवधूत काकोडकर यांना नेमले होते. ॲटर्नीमार्फतच हे व्यवहार करण्यात आले. मात्र, श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामीऐवजी श्रीमद् सच्चिदानंद सरस्वती स्वामी असे विक्रीखताच्या ‘टायटल''वर नाव आले. म्हणून हा गोंधळ झाला. मात्र, ही चूक लक्षात आल्यावर श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामींनी दिवाणी न्यायालयात हे प्रकरण नेले. विक्रीखत रद्द करून पैसेही परत करण्यात आले. वास्तविक हे विक्रीखत २० मार्च २०१८ मध्ये झाले होते. त्यामुळे तब्बल सहा वर्षांनी ते पुन्हा उकरून काढण्यात कुणाचे हीत आहे, ते कळत नाही. एवढेच नक्की आहे ते म्हणजे मठ कमिटीसाठी निवडणूक होणार असून, त्यामुळेच या प्रकरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न चालला आहे, असे मला वाटते.

- ॲड. मनोहर आडपईकर

विश्‍‍वस्‍त मंडळाची गळचेपी करून स्‍वत:ची वर्णी

स्‍वामींना आध्‍यात्‍मिक स्‍वरूपाचे सर्व अधिकार असले तरी मठाचे जमीन, मालमत्ता व इतर व्‍यावहारीक प्रश्‍‍न सोडविण्‍यासाठी विश्‍‍वस्‍त मंडळ स्‍थापन करण्‍यात आले आहे. अशा व्‍यवहारांसंदर्भात एक नियमावली मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या संमतीने तयार करण्‍यात आली होती. त्‍यात सर्व स्‍थावर व जंगम मालमत्तेसंदर्भात निर्णय घेण्‍याचे अधिकार विश्‍‍वस्‍त मंडळाकडे आहेत. तेथे बहुमताने निर्णय घेणे बंधनकारक असल्‍याचे नमूद केले असून मालमत्ता विकताना स्‍वामींची मान्‍यता गरजेची मानली आहे. मंडळावरचा सदस्‍य काढून टाकतानाही बहुमताने निर्णय घ्‍यायचा आहे. २०१५ मध्‍ये ही नियमावली अस्‍तित्‍वात आली.

स्‍वामीजी हे ‘संन्‍यासी’ आहेत; ते जरी विश्‍‍वस्‍त मंडळात विशेष असले तरी, त्‍यांना करारनाम्‍यात कोणतेही आर्थिक अधिकार दिलेले नाहीत; तसा निर्णय जाणीवपूर्वक व कर्तव्‍यभावनेने घेतल्‍याचे मठाच्‍या कृतिशील अनुयायांचे म्‍हणणे आहे. विश्‍‍वस्‍त मंडळाचे माजी ज्‍येष्‍ठ सदस्‍य चंद्रकांत धुमे यांना मंडळावरून अशिष्‍ट पद्धतीने काढून टाकले होते; त्‍यांच्‍या मते मंडळाची कार्यपद्धती चुकीच्‍या पद्धतीने चालली आहे. गेली पाच वर्षे मंडळ बरखास्‍त केल्‍यासारखे दिसते; तसे केले जाऊ शकत नाही. मंगेशी व कवळे देवस्‍थानचे प्रत्‍येकी दोन सदस्‍य मंडळावर कायमस्‍वरूपी सदस्‍य असतात; त्‍यांचेही अस्‍तित्‍व नाहीसे करता येणार नाही; हा निर्माण केलेला गोंधळ बेकायदेशीर व अशिष्‍ट आहे, धुमे म्‍हणाले.

मंगेशी देवस्थानचे अध्‍यक्ष डॉ. अजित कंटक यांच्‍या मते देवस्‍थान व मठाच्‍या मालमत्ता कोणालाच विकता येत नाहीत. देवस्‍थानांना जमिनी विकण्‍याची कोणतीही आवश्‍‍यकता नसते.

Kavale Math News
Fake Call Scam: यू आर अंडर अरेस्ट... तुम्हालाही असे कॉल आलेत का? वेळीच व्हा सावध; SBI कडून अलर्ट जारी

मुंबईच्‍या धर्मादाय आयुक्तांसमोर स्‍वामींविरोधात ज्‍या विविध तक्रारी गुदरण्‍यात आल्‍या आहेत; त्‍यात विश्‍‍वस्‍त मंडळावर स्‍वत:ला नेमणे; त्‍यासाठी मंडळाच्‍या सदस्‍यांची मान्‍यता न घेणे, जे डॉक्‍टर रामाणींसारखे जुने सदस्‍य आहेत, त्‍यांना कोणतीही कल्‍पना न देणे, तसेच मान्‍यतेशिवाय अनेक बँक खाती परस्‍पर उघडणे व त्‍यांचे वेगवेगळे पॅन क्रमांक मिळविणे आदी तक्रारी करण्‍यात आल्‍या असून त्‍यावर अंतिम सुनावणी लवकरच अपेक्षित आहे.

Kavale Math News
Goa Fraud: गोव्यात आणखी एक घोटाळा, अष्टगंधा संस्थेत 11.28 कोटींची अफरातफर; माजी संचालकासह 11 जणांविरुद्ध गुन्हा

कवळे मठाच्‍या दैनंदिन पूजाअर्चा, अभिषेक यातही स्‍वामी सहभागी होत नसल्‍याच्‍या तक्रारी असून मठाचे एक अनुयायी भूषण जॅक यांनी तसा आरोप करताना स्‍वत:ची सूडबुद्धीने सतावणूक सुरू असल्‍याचे पत्र आपल्‍या शांतादुर्गा देवस्‍थानला लिहिले आहे. आपण धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार नोंदविल्‍यावर मठात आपली सतावणूक सुरू झाली व प्रायश्‍चित्त आदीं विधींपासून दूर ठेवण्‍यात आले.

कवळे मठाच्या स्वामींविरोधात पोलिस तक्रार नोंदविताना मला यातना झाल्या; परंतु ज्या पद्धतीने स्वामींचे आचरण झाले पाहिजे, त्याला व मठाच्या पवित्र स्थानाला धोका निर्माण होता कामा नये. पावित्र्य, श्रद्धाभाव लोकांच्या स्वामी व मठ परंपरेशी असलेल्या श्रद्धांना तडा जाता कामा नये; किंबहुना हा मठ अत्यंत पुरातन असून त्याचे पावित्र्य अबाधित राहावे, तो सर्व विकारांपासून दूर राहावा, यासाठीच हे माझे पवित्र अनुष्ठान आहे, असे मी मानतो.

डॉ. पी. एस. रामाणी, प्रसिद्ध न्युरोसर्जन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com