Goa News: अपघात रोखण्यासाठी पोलिस सध्या नामी शक्कल लढवू लागले आहेत. आता सर्रास दुचाकीवर दोघेजण बसलेले दिसतात. त्या दोघांनी हेल्मेट वापरणे आता सक्ती केले जाणार आहे. पण पोलिस केवळ दुचाकीस्वारांच्या मागे का लागतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कारण सध्या अनेक चारचाकी वाहनांना काळ्या काचा बसविलेल्या आढळतात. काळ्या काचा लावणे हा गुन्हा आहे. मग पोलिस अशा चारचाकीवाल्यांना तालांव का देत नाहीत? की ते लक्ष्मीपुत्रांच्या दबावाखाली येऊन कारवाई करण्याचे टाळतात, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. मग सर्वसामान्य जनतेने तालांवच्या रूपाने सरकारला महसूल का द्यावा, हेसुद्धा पोलिसांनी सांगायला हवे. केवळ महसूल गोळा करण्यासाठी जनतेची गळचेपी करण्यापेक्षा सरकारने वाममार्गाने बुडणारा महसूल वाचवावा, अशी सूचना लोक करू लागले आहेत.
अंदाची दिवाळी पावसात
गेल्या काही वर्षांपासून भर दिवाळीमध्ये वरुणराजा धो धो बरसतानाचा अनुभव येत आहे. त्यामुळे साहजिकच उत्सवप्रिय लोकांच्या आनंदावर विरजण पडते. पण यातून काहीच न शिकणारा माणूस तो कसला? या आस्मानी संकटावरही काही लोकांनी उपाय शोधून ‘हम भी कुछ कम नही’, हे सिद्ध केले आहे.
एका पठ्ठ्याने चक्क मोठ्या रंगीबेरंगी छत्रीखालीच आकाशकंदील जोडला आहे. जेणेकरून त्यावर पाणी पडून तो भिजणार नाही. गेल्या वर्षी भाटले येथील हौशी कार्यकर्त्यांनी आकाश कंदिलांची मोठी आरास राम मंदिरासमोर केली होती. त्या आकाश कंदिलांवरही छत्र्या बसवल्या होत्या. ही सजावट म्हणूनही सुंदर दिसत होती आणि कंदिलाचे पावसापासूनही संरक्षण होत होते. काहीही होवो, दिवाळी धडाक्यात साजरी करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. म्हणतात ना ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, ते यासाठीच असावे.
असाही सावळा गोंधळ?
आम्ही नरकासुराला प्रोत्साहन न देता, डोनेशन बंद केले पाहिजे, असे म्हणत मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांची स्तुती केली. कारण त्यांनी यंदा नरकासुर प्रतिमांसाठी पैसे देणे बंद केले आहे. एवढेच नव्हे, तर इतर राजकारण्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे रोखठोक आवाहनही ढवळीकरांनी यावेळी केले.
मात्र, सरकारच्याच पर्यटन खात्याने यंदा अखिल गोवा नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवाय यासाठी पहिले पारितोषिक चक्क अडीच लाख रुपयांचे ठेवले आहे. एकीकडे सरकारच नरकासुर स्पर्धेला प्रोत्साहन देत आहे आणि दुसरीकडे या सरकारमधील मंत्री नरकासुराला आक्षेप घेत आहेत, यातून लोकांनी नक्की कोणता बोध घ्यायचा? असा प्रश्न नेटकरी विचारताहेत.
सार्दिनची खरडपट्टी
‘राहुलजी, आता तुमची भारत जोडो यात्रा जरा थांबवा आणि गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा'', असा अनाहुत सल्ला सार्दिन सरांनी दिला खरा. पण त्याचे पडसाद जबरदस्त उमटले, हे खरे. येथे गोव्याच्या गल्लीतच नव्हे, तर तिथे दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले.
सार्दिन हे मुळात शिक्षक. त्यामुळेच त्यांना असे अधे-मधे सल्ले देण्याची हुक्की येते. मात्र, त्यांनी यावेळी खुद्द राहुल गांधी यांनाच सल्ला दिल्याने तिथे दिल्लीत खळबळ उडाली. असे म्हणतात की, काँग्रेसचे केंद्रीय नेते वेणुगोपाल राव यांनी सोमवारी रात्री सार्दिन यांना फोन करून त्यांची चांगलीच हजेरी घेतली. आणि त्यांची चांगलीच कानउघडणीही केली. यातून आता तरी सार्दिन सर काही बोध घेणार का?
बाबा आमचेच...
सध्या काँग्रेस नेते तथा माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके हे कळंगुटचे आमदार मायकल लोबोंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोबो काहीतरी बोलले आणि भिके यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, असे होतच नाही. जेव्हापासून लोबो काँग्रेस सोडून भाजपवासी झाले, त्या दिवसापासून लोबो हे भिके यांच्या हिटलिस्टवर आहेत.
अशातच लोबो यांनी राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली होती. यावर भिके यांनी लोबो यांचा समाचार घेत त्यांच्यावर सडकून टीका केली. शिवाय मध्यंतरी लोबो यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेले मंत्री विश्वजीत राणे यांची भिके यांनी स्तुतीही केली.
मंत्री विश्वजीत राणे हे मूळचे काँग्रेसमन आणि ते काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्त्व आहे, असे भिकेबाब अभिमानाने सांगतात. आता भिकेबाब ज्युनिअर राणे हे आपले म्हणत असले तरी विश्वजीत राणे हे लोबोंप्रमाणेच एकेकाळी काँग्रेसची साथ सोडत भाजपवासी झाले होते. फरक एवढाच की, राणेसाहेब राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले होते आणि लोबोसाहेब डायरेक्ट!
पोलिस बनले शोभेचे बाहुले
कुडचडेत वाळूच्या व्यवसायातून एकाचा खून झाल्यावर पोलिसांनी बाणसाय भागात जो बेकायदा रेती उपसा सुरू होता, तो बंद केला खरा. पण कापशे आणि त्यापुढेही बेकायदेशीरित्या रेती काढण्याचा प्रकार अजून सुरूच आहे.
या बेकायदा रेतीची कुडचडे पोलिस स्थानकाच्या हद्दीतून वाहतूक होऊ नये, यासाठी कुडचडे येथील पोलिस निरीक्षकांनी सावर्डे-तिस्क येथे 24 तास खडा पोलिस पहारा ठेवला असून त्यांना रेतीचे ट्रक आले तर पकडावेत, अशा सूचना केल्या आहेत.
मात्र, या साऱ्या सूचना फक्त कागदोपत्रीच तर नाहीत ना अशी शंका यावी, अशी येथील एकंदर परिस्थिती आहे. हा पोलिस पहारा असतानाही रेतीचे ट्रक खुलेआम कुडचडे हद्दीत शिरतात आणि पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात. रेतीवाल्यांनी सेटिंग केल्यामुळेच तर ही शिथिलता आली नाही ना?, असा प्रश्न विचारला जात आहे.
या नरक यातनांतून मुक्ती कधी?
जेव्हा सत्ताधारी आणि अधिकारी (प्रशासन) मुके, बहिरे व आंधळे बनतात, तेव्हा ‘लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याची आठवण येते. याला कारण की, गोवा मुक्तीसाठी ज्या कुंकळ्ळी गावाने सर्वस्व पणास लावले, ती ऐतिहासिक भूमी आज नरकयातना भोगत आहे. कारण औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण हे पर्यावरणासह कुंकळ्ळीकरांनाही त्रासदायक ठरत आहे.
या औद्योगिक वसाहतीतील मत्स्य प्रक्रिया प्रकल्पातून पसरणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे ‘नको हे जगणे’ असे कुंकळ्ळीकर म्हणत आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कुंकळ्ळीकरांनी साकडे घातले होते. मात्र, भाजप सरकारसह त्यांच्या अधिकाऱ्यांनीही कानावर केस ओढून घेतल्यामुळे कुंकळ्ळीकर इंच इंच जळत आहेत. मुक्तीसाठी सर्वस्व वेचलेले कुंकळ्ळीकर म्हणत आहेत की, ‘हेची फळ काय मम तपाला?’.
नरकासुराला हरकत
दिवाळीला अवघेच दिवस राहिले आहेत आणि बुधवारी अचानक वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिवाळी सणामध्ये नरकासुराला प्रोत्साहन देऊ नका, असे आवाहन सर्व राजकीय नेत्यांसह तरुण मंडळे आणि कार्यकर्त्यांना केले आहे. या प्रथेला आक्षेप घेताना त्यांनी तरुण पिढी वाममार्गाला लागत असल्याचा दावा केला आहे.
विशेष म्हणजे पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूूश मोन्सेरात यांचे जाहीरपणे नाव घेत त्यांनी यंदा नरकासुर प्रतिमा उभारण्यासाठी पैसे देणार नसल्याचे सांगितले आहे. आपण 2सालापासून नरकासुर प्रथेला जाहीरपणे विरोध करणारा एकमेव लोकप्रतिनिधी असून तरुण मंडळांनी दीपोत्सवासारखे सकारात्मक कार्यक्रम दिवाळीदिवशी करावेत, असा पर्यायही त्यांनी दिला आहे. ढवळीकरांचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.