Goa Politics: शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री किंवा पर्यटन मंत्र्यांनी पर्यटकांच्या ई-व्हिसासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणे गरजेचे होते. मात्र, कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे पत्र लिहून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत आहेत. ते स्वतःच मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावात वागत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय भिके यांनी लोबोंवर निशाणा साधला.
बुधवारी म्हापशातील काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एल्विस गोम्स, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, फिरोज खान उपस्थित होते. यावेळी भिके म्हणाले, लोबो हे स्वार्थी नेते असून, स्वतःचा व्यवसाय वाचविण्यासाठी ते भाजपच्या वळचणीला गेले.
विधानसभेत भाजपच्या तिकिटावर विजयी होणार नाही, याची खात्री असल्यानेच ते काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आले. काँग्रेसने लोबोंना विरोधी पक्षनेतेपदी बसविले; पण त्यांनी विश्वासघात केला. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेविषयी एल्विस गोम्स यांनी माहिती दिली.
भविष्यात चुका सुधारु
झेडपी निवडणुकीत भाजपचे उमेदवार जिंकले असले तरी त्यांनी आनंदोत्सव साजरा करू नये. पोटनिवडणुकीची मतदान टक्केवारी पाहिल्यास ती अल्प आहे. मतदार घराबाहेर पडले नाहीत, याचाच अर्थ ते कंटाळले आहेत.
भाजपला ‘आरजी’मुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा झाला. या पोटनिवडणुकीत काँग्रेस कमी पडल्याचे आम्ही मानतो. भविष्यात या चुका सुधारू, असे भिके म्हणाले.
सावंत सरकार गद्दारांचे: पाटकर
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी लोकसभा निवडणुकीसंबंधी विरोधकांच्या ताकदीसंदर्भात केलेल्या वक्तव्यात स्पष्टपणे अहंकार दिसून येतो. 67 टक्के गोमंतकीय जनता भाजपच्या विरोधात आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार पक्षांतर करणाऱ्या गद्दारांनी भरलेले आहे, याचा तानावडे यांना विसर पडला असावा, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘ट्विट’द्वारे हाणला. सरकारने ‘मिशन कमिशन’ धोरण बंद करून गोवा भ्रष्टाचारमुक्त करावा, असे आव्हान पाटकर यांनी दिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.