

पणजी: गोव्याच्या सायबर क्राईम पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्य सायबर फसवणुकीचा पर्दाफाश करत महाराष्ट्रातील एका 48 वर्षीय व्यक्तीला अटक केली. दयानंद बाबूराव देवळकर असे या संशयिताचे नाव असून तो महाराष्ट्रातील आजरा येथील रहिवासी आहे. 61.84 लाख रुपयांच्या 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲपद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधला होता. तक्रारदाराचा मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचा बनाव रचून त्याला घाबरवण्यात आले. इतकेच नाही तर, एका बनावट 'डिजिटल अरेस्ट' प्रक्रियेद्वारे त्याला तासन् तास ऑनलाईन देखरेखीखाली ठेवले गेले. या काळात संशयिताने बनावट कागदपत्रे आणि पोलीस खात्याचा गैरवापर करुन तक्रारदारावर दबाव टाकला आणि कारवाई टाळण्यासाठी 61.84 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या तक्रारदाराने ही रक्कम संशयिताने दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग केली.
तक्रारदाराने सायबर क्राईम पोलिसांत धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी दयानंद देवळकरचा माग काढला आणि त्याला महाराष्ट्रातून (Maharashtra) ताब्यात घेतले. तपासात असे समोर आले की, ही प्रचंड मोठी रक्कम एकाच खात्यावर न ठेवता विविध बँक खात्यांमध्ये फिरवण्यात आली होती, जेणेकरुन पोलिसांना तपास करणे कठीण जावे. सायबर क्राईम विभागाने या रक्कमेचा माग काढण्यास सुरुवात केली असून देवळकरचे इतर साथीदार कोण आहेत आणि या पैशांचा नेमका मार्ग काय होता, याचा सखोल शोध घेतला जात आहे.
गोव्यात (Goa) सध्या 'डिजिटल अरेस्ट'च्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून पोलीस प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणतेही सरकारी खाते किंवा पोलीस विभाग अशा प्रकारे ऑनलाईन अटक किंवा पैशांची मागणी करत नाही. अशा घटना घडल्यास त्वरित स्थानिक पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.