

पणजी: गोव्यातून अमेरिकन नागरिकांना कर्ज आणि गिफ्ट कार्डचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटर्सचा गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. दोनापावला आणि सांतिनेज येथे पहाटे छापे टाकून पोलिसांनी १९ जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून लॅपटॉप, मोबाईल, राऊटर आणि वाहनांसह सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोनापावला येथील ‘सागर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मधील ‘व्हिला सोलेस कपूर’ येथे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस निरीक्षक मंगेश वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अमीन नाईक आणि पथकाने बुधवारी पहाटे ते दुपारदरम्यान छापा टाकला. या कारवाईत ८ लॅपटॉप, २ लॅन राऊटर, ११ मोबाईल फोन आणि ३ वाहने जप्त करण्यात आली. दुसरी कारवाई सांतिजमध्ये करण्यात आली. येथील ‘दुकळे एलिट’ इमारतीतील एका फ्लॅटमध्येही अशाच प्रकारचे कॉल सेंटर सुरू होते. आरोपी अमेरिकेतील नागरिकांचा वैयक्तिक डेटा मिळवून ‘आयबीएम’ ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधत असत.
आपण मोठ्या कर्ज कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली ‘सेफोरा’, ‘मेसीज’, ‘ॲपल’ आणि ‘एक्सबॉक्स’ यांसारख्या कंपन्यांची गिफ्ट कार्ड्स मागवली जात होती. ‘गुगल व्हॉईस’ ॲपच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना कॉल केले जात होते. लॅपटॉप, राऊटर आणि इंटरनेट सुविधेचा वापर करून झटपट कर्ज देण्याच्या बहाण्याने पीडितांकडून मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या.
गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१९(२), ३१८(४), ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-सी आणि ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात शेलत युनूसभाई हा या गुन्हेगारी रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
महिपालसिंह राठोड, शुभम देसाई, शंतनू कर, संकल्प काणे, अक्षित पाटील, सत्यम सिंग, ब्रिजेश राणे, रोहन चेट्टियार, विलास उतेकर, शेलत युनूसभाई, यश देसाई, करण माला, मिहीर देसाई, सज्जन, ऋषभ चौबे, दिव्या रावा, रुशित बाथम, अमीर अली, विश्वजीत सोनावणे. हे सर्वजण परप्रांतीय आहेत.
विविध सेवा किंवा बक्षिसांचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांच्या बँक खात्यांची माहिती मिळवली जाते किंवा खाती हॅक करून पैसे अन्यत्र वळवले जातात. अशा प्रकारांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.