

पणजी: फ्लॅटमध्ये घुसून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कार क्लिनर आल्फ्रेड फर्नांडिस (३८) याला सुनावलेली दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा गोवा खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत आरोपीची याचिका फेटाळून लावली.
ही घटना १४ ते १५ मे २०२३ च्या मध्यरात्री घडली होती. एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पीडित महिलेच्या बेडरूममध्ये आरोपीने मध्यरात्री प्रवेश केला. पीडित महिला ब्युटी पार्लर चालवते. तिच्या साक्षीनुसार, तिला जाग आली तेव्हा आरोपी जमिनीवर रांगत होता. तिने आरडाओरडा करताच आरोपीने तिला उशीने दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. झटापटीदरम्यान पीडितेने धाडस दाखवत आरोपीच्या गळ्यातील साखळी ओढली, जी तिथेच तुटून पडली. घरमालक आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला बाल्कनीतून ताब्यात घेतले.
दरम्यान, न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम ३७६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, कलम ३५४ अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर कलम ४४८ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या असून, दंडाची रक्कम वसूल झाल्यास ती पीडितेच्या मदतीसाठी दिली जाणार आहे.
१ ऑक्टोबर २०२४ रोजी पणजी येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम ३७६, ३५४ आणि ४४८ अंतर्गत दोषी ठरवले होते. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, २०१३ च्या कायद्यातील दुरुस्तीनुसार योनीमार्गात बोटे किंवा कोणतीही वस्तू घालणे हेही बलात्काराच्या व्याख्येत येते. यासाठी शारीरिक संबंधाची तीव्रता सिद्ध करणे आवश्यक नसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.