

पणजी : गोव्यात आढळलेल्या कोविड-१९ विषाणूच्या तब्बल १,२७४ जनुकीय नोंदींच्या अभ्यासातून विषाणूच्या बदलत्या स्वरूपाची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार विषाणूच्या पृष्ठभागावरील काटेरी मुकुटासारख्या प्रथिनामध्ये सातत्याने होत गेलेल्या बदलांमुळे त्याची संसर्गक्षमता वाढत गेली, तर रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमताही अधिक प्रभावी बनली. विशेष म्हणजे २०२४ या संपूर्ण वर्षात गोव्यातील एकही जनुकीय नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती भांडारात जमा झाली नसल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
मे–जून २०२१ मध्ये गोव्यात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आणणाऱ्या डेल्टा प्रकाराचा प्रभावही या अभ्यासातून स्पष्ट झाला आहे. या प्रकारामध्ये आढळलेल्या काही विशिष्ट बदलांमुळे विषाणू मानवी पेशींमध्ये अधिक वेगाने प्रवेश करत होता. त्याचबरोबर शरीरातील प्रतिकारशक्ती आणि लसीकरणामुळे निर्माण झालेल्या संरक्षणावरही त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे डेल्टा प्रकाराची लाट अधिक धोकादायक ठरल्याचे संशोधकांचे मत आहे.
डॉ. नंदकुमार कामत, मरीना अल्बुकर्क आणि सामंथा इसाबेला पिंटो यांनी केलेल्या या संशोधनात डिसेंबर २०२० ते जून २०२५ या कालावधीतील कोविड विषाणूंच्या १,२७४ जनुकीय नोंदींचे विश्लेषण करण्यात आले आहे. गोव्यातील कोविड विषाणूंच्या उत्क्रांतीचा इतका व्यापक आण्विक अभ्यास प्रथमच करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
गोवा हे पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे जगातील विविध भागांत उदयास येणारे नवीन विषाणू प्रकार राज्यात पोहोचण्याची शक्यता कायम राहिली. मात्र या विषाणूंच्या बदलत्या स्वरूपाचा सखोल अभ्यास यापूर्वी झालेला नव्हता. ही उणीव भरून काढण्यासाठी हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला.
अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे उपलब्ध जनुकीय नोंदींपैकी अर्ध्याहून अधिक नोंदी निकृष्ट दर्जाच्या होत्या. त्यामुळे विषाणूतील बदलांचे अचूक विश्लेषण करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
तसेच २०२४ या संपूर्ण वर्षात गोव्यातून एकही जनुकीय नोंद आंतरराष्ट्रीय माहिती भांडारात जमा करण्यात आली नसल्याने जवळपास १९ महिन्यांचा कालावधी महामारीविषयक देखरेखीच्या दृष्टीने अंधारात गेला, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
कोविड विषाणूच्या बाह्य भागावर असलेले कंटकयुक्त प्रथिन हे मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे साधन मानले जाते. विषाणू या प्रथिनाच्या साहाय्याने मानवी पेशींना चिकटतो आणि शरीरात प्रवेश करतो.
या प्रथिनात होणारे बदल विषाणूला अधिक वेगाने पसरण्यास किंवा शरीराच्या संरक्षण व्यवस्थेपासून बचाव करण्यास मदत करतात.
संशोधकांनी गोव्यातील सर्व नोंदींमधील या कंटकयुक्त प्रथिनातील बदलांचा सविस्तर अभ्यास केला. त्यामध्ये ‘डी-६१४-जी’ हा बदल जवळपास सर्वच नोंदींमध्ये आढळून आला. या बदलामुळे विषाणू अधिक स्थिर आणि अधिक संसर्गक्षम बनल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
संशोधकांच्या मते, भविष्यात कोणत्याही नवीन श्वसनविषयक महामारीचा उद्रेक झाल्यास तीही विमानतळे, पर्यटन आणि लोकांच्या मोठ्या हालचालींच्या माध्यमातूनच पसरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कायमस्वरूपी जनुकीय देखरेख व्यवस्था उभारून विषाणूंच्या नोंदी जलदगतीने जागतिक स्तरावर पाठविण्याची आवश्यकता आहे. या संशोधनामुळे गोवा हे कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय इतिहासाचे सर्वाधिक सविस्तर दस्तऐवजीकरण झालेले लहान भारतीय राज्य ठरल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
२०२२ मध्ये आढळलेल्या ‘सेंटॉरस’ या प्रकाराच्या तुलनेने जास्त नोंदी गोव्यात आढळल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. पर्यटनाच्या वाढत्या हालचालींमुळे या प्रकाराच्या प्रसाराला चालना मिळाली असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली असली, तरी त्याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
डिसेंबर २०२१ मध्ये आलेल्या ओमिक्रॉन प्रकारात पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत खूप जास्त बदल आढळून आले. संशोधनानुसार हा प्रकार डेल्टाच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक प्रभावीपणे मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देत होता. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेल्या अनेक व्यक्तींनाही पुन्हा संसर्ग झाल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.
संशोधकांच्या मते, विषाणूच्या विविध प्रकारांनी स्वतंत्रपणे विकसित होत असतानाही अनेक वेळा त्याच ठिकाणी तेच बदल पुन्हा निर्माण केले. यावरून मानवी शरीराच्या संरक्षण व्यवस्थेपासून बचाव करण्यासाठी विषाणूवर सातत्याने दबाव निर्माण होत असल्याचे दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.