Goa Politics: खरी कुजबुज; 'झेडपी' निवडणूक नेत्यांसाठी सत्वपरीक्षा!

Khari Kujbuj Political Satire: ‘विजयाने हुरळून जाऊ नये व पराभवाने खचून जाऊ नये’, असे आपले जाणकार म्हणायचे. केपे मतदारसंघात सध्या झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

‘झेडपी’ निवडणूक नेत्यांसाठी सत्वपरीक्षा !

यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाने आपली पूर्ण शक्ती लावली आहे. तसे जिल्हा पंचायतीला मोठे अधिकार नाहीत आई झेडपी ना तसे राजकीय हक्क ही कमीच.मात्र पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक असल्यामुळे सगळे राजकीय पक्ष प्राणपणाने प्रचारात व्यस्त आहेत.मुख्यमंत्री गिरदोली व फातर्पा झेड पी मतदार संघात दोन दोन वेळा प्रचारास आले. विजय सरदेसाई आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काणकोणपासून कुंभारजुव्यापर्यंत फेऱ्या मारतात. एवढेच काय विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव कळंगुटपासून गिरदोलीत पायपीट करीत आहेत. ही झेडपी निवडणूक नेत्यांसाठी सत्वपरीक्षा आहे, हे मात्र खरे.

एल्टनचे मुख्यमंत्र्यांना आव्हान!

‘विजयाने हुरळून जाऊ नये व पराभवाने खचून जाऊ नये’, असे आपले जाणकार म्हणायचे. केपे मतदारसंघात सध्या झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी आमदार बाबू व विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यात वाद वाढत आहे. एल्टन यांनी परवा बाबू कवळेकर यांच्यावर खालच्या व शिवराळ भाषेत टीका केली.बाबू तरुणांच्या जीवनाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप एल्टन यांनी केला. एवढेच नव्हे आमदार एल्टन डिकॉस्टा जे मुख्यमंत्र्याची नेहमी स्तुती करायचे ते आता मुख्यमंत्र्यांनाच आव्हान द्यायला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बाबू कवळेकर यांना निवडून आणण्यासाठी गेल्या निवडणुकीत भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना केप्यात आणले होते, पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानांना आणा आपण घाबरत नाही, कारण जनता आपल्या बरोबर आहे, असा दावा आमदार एल्टन करीत आहेत. एल्टनबाब जनता कधी बदलणार हे सांगता येत नाही. उगाच आव्हान देऊन संकट ओढून घेऊ नका, असे जनता आमदारांना सांगायला लागली आहे.

फायदा काँग्रेस की ‘आरजी’ला?

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेससोबत युतीच्‍या चर्चा सुरू असतानाच गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’च्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी काही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करून त्‍यांचा प्रचारही सुरू केला होता. ‘आप’नंतर उमेदवारांच्‍या प्रचारात आघाडी घेण्‍यात या दोन्‍ही पक्षांनी यश मिळवले. त्‍यानंतर ‘आरजी’ने युती करण्‍यास माघार घेतल्‍याने काँग्रेसने गोवा फॉरवर्डला सोबत घेऊन पुढे जाण्‍याचे मान्‍य केले. परंतु, स्‍वत:च्‍या उमेदवारांच्‍या प्रचाराकडे मात्र नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. त्‍याचा फायदा आरजी आणि ‘आप’ला होणार? की मतदार काँग्रेस–गोवा फॉरवर्डची युती स्‍वीकारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

विद्यापीठाचे कथा संमेलन

कोकणी कथा मोठ्या प्रमाणात इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या आहेत. प्रतिष्ठीत नियतकालिकांत त्या प्रसिध्द झाल्या आहेत. त्यात फेमिना, फ्रंटलाईन व इतरांचा समावेश होतो. या अनुवादित कथावाचक वर्गाचा आवाका हजारोंच्या संख्येने आहेत. म्हणजेच मूळ कथेपेक्षा बराच अवाढव्य. विद्यापीठाचं चौथं कोकणी कथा संमेलन १६ आणि १७ डिसेंबर रोजी होऊ घातलं आहे. पण त्यात अनुवादाचं महत्व, अनुवादित करताना शब्दांच्या अडचणी व इतर माहिती या संदर्भात तज्ज्ञ अनुवादकाचं एकही सत्र एकाही संमेलनात घ्यावं, असं कोकणी प्राध्यापकांना दिसलं नाही. कारण हे लोक काहीही इंग्रजी वाचत नाहीत, हाच तर मूळ प्रश्न जो विद्यापीठाच्या अकादमीक व चिंतनशील अधिष्ठानाला बाधा आणतो, असे विद्यावंत म्हणू लागले आहेत.

केजरीवालांची धडपड कशासाठी?

दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा ‘आप’चे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जिंकल्‍यानंतर लहान राज्‍यांवर लक्ष केंद्रीत केले. त्‍याचा फायदा त्‍यांना गोवा, पंजाबमध्‍येही झाला. गत विधानसभा निवडणुकीत त्‍यांच्‍या पक्षाचे दोन आमदार निवडून आले. तर, पंजाबमध्‍ये त्‍यांनी सरकारही स्‍थापन केले. आता गोव्‍यातील जिल्‍हा पंचायत निवडणुकीत केजरीवाल स्‍वत: उतरले आहेत. आपल्‍या पक्षाच्‍या उमेदवारांचा ते दारोदारी जाऊन प्रचार करीत आहेत. दुसरीकडे, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या काँग्रेसचा दिल्लीतील एकही नेता प्रचारासाठी गोव्‍यात पोहोचलेला नाही. त्‍यामुळे केजरीवाल जिल्‍हा पंचायत निवडणूक जिंकण्‍यासाठी धडपडत आहेत, की काँग्रेसची जागा घेण्‍यासाठी? अशा प्रश्‍‍न राजकीय जाणकारांना पडला आहे.

...अन् तळीराम वठणीवर आला

दारूचा अंमल एका कार चालकाला बराच महागात पडला. मडगाव पोलिसांनी मागच्या आठवड्यात भाडे मारणाऱ्या कारवाक्याला कार चालकाला अडविले. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. कार जप्त करून ती पोलिस ठाण्यात आणली. कारचालकाने सुरवातीला आपले पॉलिटिकेल कनेक्शन वापरुन पोलिसांवर इम्प्रेशसन मारण्याचा प्रयन्त केला मात्र पोलिस बधले नाही. नंतर तो गयावया करू लागला. पोलिसांनी त्याला सरळ सुनावले दंड भर व कार घेऊन जा. आपली कुठलीही मात्रा चालत नसल्याचे बघून त्या तळीराम चालकाने निमुटपणे दंड भरला व गुमानपणे निघून गेला.

‘आप’चा दबदबा!

राजकारणात जो सक्रिय असतो त्यालाच जनता आठवण ठेवते. जिल्हा पंचायत निवडणुकीत आप, भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी उतरले असले तरी सगळ्यात जास्त प्रभाव दिसतो तो भाजप व आम आदमी पक्षाचा. काँग्रेस सक्रियपणे मैदानात उतरलेली दिसत नाही. पक्षाचे नेते एकसंघपणे प्रचार करताना दिसत नाहीत. काँग्रेसचा प्रत्येक नेता आपल्यापरीने वागत आहे. भाजपचे मुख्यमंत्री व मंत्री सर्व आमदार व युतीचे आमदार मोठा गाजावाजा करून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यास झटत आहेत. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल व आतिशी सारखे राष्ट्रीय नेते मैदानात उतरले आहेत. गोवा फॉरवर्ड व काँग्रेसची कागदावरची युती मैदानात दिसत नाही. अशा स्थितीत प्रचारात पुढे भाजपा व आप आहे हे सत्य काँग्रेस ही मान्य करेल नाही का?

आजार झाल्यावरच नेमके कुठे चुकले ते कळते!

हडफडे येथील नाईट क्लबला आग लागून २५ जण मृत्युमुखी पडले त्यावर आता कित्येक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यात. या घटनेतून आता भाजप सरकार हफ्तेबाज झाला, अशी टीका सुरू झाली आहे. पण प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मात्र जो बेकायदेशीरपणा झाला त्याला सरळ कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते या सर्वांचे मूळ कॉंग्रेसच्या काळातील आहे, असे ते म्हणतात. आजार झाल्यावर पूर्वी नेमके कुठे चुकले ते कळायला लागते. अशातलाच हा प्रकार आहे, असे नाईक सांगतात. मात्र भाजपच्या काळात जी बेफिकीरी झाली, बेकायदेशीरपणाचा कळस झाला, त्यावर मात्र ते चूप आहेत. अशा घटना भविष्यात होऊ नयेत, म्हणून भाजप उपाययोजना करीत आहे, असेही ते सांगतात. यापूर्वीही अशी विधाने मुख्यमंत्री व इतर मंत्री करीत आले आहेत. आता त्यावर कोणी विश्वास ठेवेल का? अशी चर्चा लोकांत सुरू झाली आहे.

Khari Kujbuj Political Satire
Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

जिल्हा पंचायतींचे आगळेपण

जिल्हा पंचायत निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. गावात तर वातावरण असे आहे की विधानसभा निवडणुकाच होणार की काय असे चित्र दिसते. अटीतटीच्या लढती अनेक ठिकाणी दिसतात. दिल्लीचे दोन माजी मुख्यमंत्री (आप-चे) प्रचार रणधुमाळीत गांवागांवात जात आहेत. त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री सुद्धा मतदारांना भेटत आहेत. ही इतकी टोकाची अहमहमिका का हेच समजत नाही. कसल्या मधाची लालच ते कळत नाही. कारण ग्रामपंचायतीच्या तुलनेत जिल्हा पंचायत परीघात कामे किती? काय? अधिकार कोणते हे कळतच नाही. या प्रतिनिधींनी नेमके काय काम केले ते उमजत नाही. तरीही येत्या शनिवारी २० डिसेंबरची निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी आगळी ठरणार हे नक्की.

भिवपाची गरज ना .....

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा भिवपाची गरज ना हा डायलॉग अजूनही लोकप्रिय आहे याचा प्रत्यय मागच्या आठवड्यात दवर्ली येथे आयोजित प्रचार सभेत पुन्हा एकदा आला. नावेली मतदार संघातील दवर्ली व नावेली जिल्हा पंचायतीच्या भाजप उमेदवार सत्यविजय नाईक व लक्ष्मी शेटकर या दोघांना विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यावर भिवपाची गरज ना असे उपस्थित कार्यकर्त्यांनी नारा दिला. ते ऐकून दोतोर सावंत यांनाही हसू आवरले नाही.

माविन यांचा थेट कृष्णाशी संपर्क!

काँग्रेसमधून आठ आमदार भाजपात आले तेव्हा त्यातील दिगंबर कामत यांनी आपल्याला देवाने सांगितले, त्यामुळेच आपण भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यानंतर कामत यांच्यावर चौफेर टीकाही झाली आणि त्यांना नेटकऱ्यांनी तुम्ही घेतलेल्या आणा-भाकांची आठवण करून दिली. आता कोणता नेता कोणत्या देवाशी थेट संपर्क साधून आहे, हे काही सांगता येत नाही. पण पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रचारादरम्यान कृष्ण मंदिरात जाऊन आपण दररोज कृष्णाचा मंत्र जपतो आणि आपला थेट त्याच्याशी संपर्क आहे, हे सांगितले. हा त्यांच्या आस्तिकतेचा विषय आहे, त्यामुळे त्याला काही कुणाचा विरोध नाही. परंतु त्यावरून भाजपातील इतर मंत्र्यांनी आता आपलाही अमूक देवाशी संपर्क आहे, असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.

Khari Kujbuj Political Satire
Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

बाबूंचा आत्मविश्वास

बाबू आजगावकर जे काही बोलतात, तेव्हा त्याची तमा कधीही बाळगत नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी तोरसे जिल्हा पंचयातीत अपक्ष उमेदवार उभा केला आहे आणि स्थानिक व पक्षाचे आमदार प्रवीण आर्लेकरांना धक्का दिला आहे. पक्षाने त्यास विरोध केला नाही आणि येथील लढतीकडेही फार गंभीरतेने घेतलेले दिसत नाही. दोघांपैकी कोणचाही उमेदवार निवडून आला तरी तो भाजपचाच, असा विचार करून पक्षाच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेही असेल. परंतु आजगावकरांनी आपलाच उमेदवार निवडून येणार, असे जे ठामपणे सांगितले आहे, त्यात त्यांचा आत्मविश्वास अधिक प्रबळ दिसून येतो. आजगावकरांचा उमेदवार निवडून आलाच तर पुढील विधानसभेला त्यांची उमेदवारी पक्की मानली जाऊ शकते, त्यामुळेच आजगावकरांनी अपक्ष उमेदवाराच्या मागे सर्व ताकद लावल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com