

वास्को: कुठ्ठाळीच्या उड्डाण पुलावर शनिवारी (ता. १४) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास झालेल्या अपघातात कोन्सुआ-कुठ्ठाळी येथे राहणारे के. एच. बिक्रम सिंघा (वय २१ वर्षे) आणि ए. परिटोन सिंघा (वय २३ वर्षे) हे दुचाकीस्वार मरण पावले. तर रामनगर-धारवाड मार्गावर झालेल्या अपघातात चिंबल येथील कारचालक अब्दुल खादार हे ठार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे आसामचे; परंतु कामानिमित्त कोन्सुआ-कुठ्ठाळी येथे राहणारे के. एच. बिक्रम आणि ए. परिटोन हे दोघे रविवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास दुचाकीवरून पणजीहून वेर्णाकडे चालले होते. ब्रिकम हा मोटारसायकल चालवित होता. तो भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत होता.
कुठ्ठाळी उड्डाण पुलावर पोचल्यावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्ता दुभाजकाला धडक देऊन दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली. त्याचवेळी वेर्णाहून पणजीकडे निघालेल्या एका स्कोडा कारला त्या दुचाकीची धडक बसली.
त्यामुळे ते दोघेही रस्त्यावर दुचाकीसह आपटले. ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्वरित गोमेकॉत नेले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.
चिंबलच्या चालकाचा जागीच अंत
रामनगर-धारवाड मार्गावरील मुंदवाड क्रॉसनजीक पणजी येथून आलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटले व कार रस्त्यानजीक असलेल्या झाडाला आदळली. या अपघातात चालक अब्दुल खादार (वय ५५, रा. चिंबल) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी झाला.
चालका शेजारी बसलेले दादू कौसर (वय ३० वर्षे), तसेच मागे बसलेल्या हिना कौसर (वय ३९, रा. पणजी) हे दोघे गंभीर जखमी झाले. रामनगर सहकारी इस्पितळात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी बेळगावला नेण्यात आले. कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. पोलिसांनी चालकाचा मृतदेह खानापूर सरकारी इस्पितळात विच्छेदनासाठी पाठविला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.