Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचे माजी आमदार 'आप'च्या संपर्कात?

Khari Kujbuj Political Satire: कुडचडेचे आमदार नीलेश बाब काब्राल यांचे मंत्रिपद काढून आलेक्स सिक्वेराची मंत्रिपदी वर्णी लावली होती. तेव्हा नीलेश बाब नाराज झाले होते.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचे माजी आमदार ‘आप’च्या संपर्कात?

गोव्यात ‘आप’ने आपली टीम तयार करण्यास सुरुवात केली आहे. आतिशी मार्लेना प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक नेत्यांना भेटत आहेत. बार्देश तालुक्यात मात्र ‘आप’ने भाजपच्या माजी आमदारांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही माजी आमदार ‘आप’च्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बहुतांश नेते भाजपमध्ये जात असताना, ‘आप’ मात्र भाजपच्या माजी आमदारांकडे लक्ष देत आहे. २०२७ च्या निवडणुकीपूर्वी किती नेते कोणत्या पक्षात जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

नीलेश बाबांचे पुढे काय?

कुडचडेचे आमदार नीलेश बाब काब्राल यांचे मंत्रिपद काढून आलेक्स सिक्वेराची मंत्रिपदी वर्णी लावली होती. तेव्हा नीलेश बाब नाराज झाले होते. त्यांची नंतर कशीबशी समजूत काढण्यात आली होती. त्यातच भाजपतर्फे आता २०२६ घ्या निवडणुकीत दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी देण्याचा डाव चालू आहे. आता आलेक्स सिक्वेरानी आरोग्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याजागी नीलेश बाबांची परत एकदा मंत्री करता आले असते. पण दिगंबर कामत यांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे नीलेशबाब भलतेच आणखी नाराज झाले तर त्यात नवल ते कसले. काही दिवसांपूर्वी भाजपच्या बैठकीतही नीलेश बाबांनी आकाश पाताळ एक केले होते, असे नंतर उघड झाले. नीलेश बाबांचा पुढील डावपेच काय असतील, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांची नजर आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई

कळंगुटचे आमदार मायकल लोबो व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. मात्र मंत्रिमंडळात त्यांना आता स्थान मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना बोलावून आणून मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली आहे. मंत्रिमंडळात आता त्यांना स्थान देणे शक्य नाही, हे त्यांनी त्यांना अगदी विश्वासात घेऊन सांगितले. आमोणकर यांनी मंत्रिपद मिळावे यासाठी आजवर कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षपदही स्वीकारलेले नाही. लोबो आणि आमोणकर यांची समजूत कशी काढली याचे गूढ मात्र कोणाला समजलेले नाही.

लोबो यांची फाईल

मायकल लोबो कॉंग्रेसमध्ये असताना त्यांची फाईल उंचावून नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे काही सूचक इशारा देत होते. नंतर लोबो भाजपमध्ये आले. त्यांची वाटचाल मंत्रिपदापर्यंत होईल असे वातावरण होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांनी `भिवपाची गरज ना` सांगत दिलासा दिला होता. मात्र अचानकपणे त्याला ब्रेक लागला आणि फाईलची चर्चा सुरू झाली. भाजपच्या सरकारने लोबो यांना दिलेले संरक्षणच त्यांना पुरे. त्यांनी आणखीन मंत्रिपदाची आस बाळगू नये असे सत्ताधारी वर्तुळाचे म्हणणे आहे. सत्ताधारी गटाकडून कळंगुटमध्ये जोसेफ सिक्वेरा यांना बळ देणेही सुरु झाले आहे. त्याच बळावर सिक्वेरा हे लोबो यांना जाहीरपणे ललकारू लागले आहे. यामुळे लोबो कितीवेळ घुस्मट सोसणार याचे कुतूहल निश्चितपणे निर्माण झाले आहे.

प्रियोळात तवडकर झिंदाबाद!

गोविंद गावडे यांचे मंत्रिपद गेले, आवाजही गायब झाला... पण तवडकरांच्या खात्यांची बातमी समजताच प्रियोळातील वातावरण फुल चार्ज झाले असून `तवडकर झिंदाबाद` सुरू झाले आहे. प्रियोळात लाडू वाटायचे प्लॅन, फटाके फोडायचे बेत, सगळं बॅक टू बॅक चाललंय. माशेल-बाणास्तरीत तर समर्थक तर एवढे खुशीत आहेत, की तवडकर शपथ घेताच आकाशही फुलझड्यांनी उजळून जाईल असा विश्वास व्यक्त करतायत. प्रियोळातील व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीही सज्ज झाली असून प्रियोळात पुन्हा चैतन्य जाणवत आहे. कुणी मिठाईवाल्याजवळ आगाऊ बुकिंग करतंय, तर कुणी फटाकेवाल्याला म्हणतोय, “भाई, साइलेंट क्रॅकर नको… आवाज फाडणारेच दे!”

Khari Kujbuj Political Satire
Goa Housing Scheme: 'श्रमधाम'मधून 30 घरांचे 23 रोजी वाटप, 5 हजार स्वयंसेवकांचे जाळे उभारणार - रमेश तवडकर

गोविंद गावडे यांच्या मनात

सभापती रमेश तवडकर यांच्याकडे मंत्रिपद येणार हे निश्चित झाल्यानंतर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्या मनात काय विचार आले असतील याची कल्पना करता येते. शिवाय आपल्याला न मिळालेले आदिवासी कल्याण खातेही तवडकरांच्या ताब्यात येऊ शकते. मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची संधीही न मिळालेले गावडे यांच्या प्रियोळ मतदारसंघात तवडकर यांनी रचनात्मक व संघटनात्मक काम सुरु केले. समर्थकांची जमवाजमव केली. तवडकर यांनी अप्रत्यक्षपणे गावडे यांना टोले लगावण्याची संधी कधी सोडलेली नव्हती. तेच तवडकर आता मंत्री होत असताना गावडे यांच्या मनातील कल्लोळ कधी काळी त्यांनीच शब्दबद्ध केला तर उत्तम.

दिलायलांचा अपेक्षाभंग

गेल्‍या काही वर्षांपासून भाजपच्‍या केंद्रीय नेतृत्वाने देशपातळीवर महिला नेतृत्‍वाला संधी देण्‍याचे धोरण पत्‍करले. राष्‍ट्रपती, दिल्लीच्‍या मुख्‍यमंत्रिपदी महिलांची वर्णी लावून आपण महिलांचा किती सन्‍मान करतो हे भाजपने विरोधकांना दाखवून दिले. त्‍यामुळे राज्‍य मंत्रिमंडळात फेरबदल करताना भाजपात मंत्रिमंडळात महिला आमदाराला संधी देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशा स्‍थितीत पती मायकल लोबो आणि आपल्‍याकडे दोन मतदारसंघ असल्‍याने शिवाय मायकल यांची साळगाव आणि मांद्रे या दोन मतदारसंघांवर बऱ्यापैकी पकड असल्‍यामुळे आपल्‍याला मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असा ठाम विश्‍‍वास दिलायला लोबोंना होता. पण, भाजपने त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करीत दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन्‍ही पुरुष आमदारांनाच मंत्री बनवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे दिलायलांचा किती मोठा अपेक्षाभंग झाला, हे वेगळे सांगण्‍याची गरज नाही.

आमोणकर प्रतीक्षेतच

कॉंग्रेसमधून भाजप प्रवेश केला तेव्हा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मंत्रिपद मिळेल असे सांगण्यात आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आले आहेत. त्यांनीही कधी याचा जाहीर इन्कार केलेला नाही. मध्यंतरी बालभवनचे अध्यक्षपद त्यांना देण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर मुरगावची `ताबेदारी` त्यांच्या हातांत आली. सध्या मुरगाव बंदर परिसरात त्यांच्या मान्यतेशिवाय पानही हलू शकत नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद कशाला हवे अशीही चर्चा ऐकू येते. मात्र किती काळ त्यांना प्रतीक्षा करावी लागेल अशी विचारणा आता खासगीत का होईना होऊ लागली आहे.

तालकांचा एल्विस विरोधात हल्लाबोल

रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्रबाब तालक आज एल्विसबाब गोम्सवर भलतेच नाराज झालेले दिसले. काही दिवसांपूर्वी रवींद्र भवनच्या कामात पारदर्शकता नाही, अशी टिका एल्विस बाबांनी केली होती. त्यामुळे कदाचित तालकबाब त्यांच्यावर नाराज झालेले असावेत. एल्विस गोम्स हे नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहेत, हेच आम्हांला माहीत नाही. शिवाय ते पूर्वीचे सरकारी अधिकारी असल्याने त्यांना सरकारी कामे कशी होतात, त्याची जाण असायला हवी होती. पण त्यांनी त्यात आपले अज्ञानच दाखवले. त्यांना रवींद्र भवन बद्दल माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी आपल्या कॅबिनचेद्वार सदैव उघडे असल्याचेही तालकबाब म्हणाले. एल्विसबाब तालकबाबांचा सल्ला ऐकतील का?

तवडकर यांचा उत्साह

सभापतिपदावर असतानाच होय माझा मंत्रिपदाचा शपथविधी गुरुवारी दुपारी १२ वाजता होणार असे सांगून रमेश तवडकर यांनी आपल्या उत्साहीपणाची चुणूक दाखवली आहे. गेले काही दिवस ते मंत्रिपद स्वीकारणार नाहीत अशी चर्चा होती. त्यांचे मन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदासाठी वळवल्याचे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारची तवडकर यांची देहबोली हे मंत्रिपदाबाबत वेगळेच संकेत देत होती. सभापती हे घटनात्मक पद पक्षाच्या आदेशावरून सोडत असल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी मंत्रिपद त्यांना नको होते, हे बुधवारी दिसून आले नाही. तसेच त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हेही स्पष्ट झाले.

उत्तर गोवा नाराज?

मंत्रिमंडळात फेरबदल करताना भाजप उत्तर आणि दक्षिण या दोन्‍ही जिल्‍ह्यांना समान न्‍याय देईल, अशी अपेक्षा मतदारांना होती. कळंगुटचे आमदार मायकल लोबो अनेक महिन्‍यांपासून मंत्रिपदासाठी गुडघ्‍याला बाशिंग बांधून बसले होते. उपसभापती तथा म्‍हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनाही आपल्‍याला मंत्रिपद मिळेल असे वाटत होते. परंतु, भाजपने जिल्‍ह्यांचा विचार न करता दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दक्षिण गोव्‍यातीलच दोन्‍ही आमदारांना मंत्रिपद देण्‍याचे निश्‍चित केले. त्‍यामुळे उत्तर गोव्‍यातील मतदार नाराज झाला नसेल ना

काब्राल काय म्‍हणत असतील?

गत लोकसभा निवडणुकीआधी विशेष करून सासष्‍टीतील मतदारांचा विचार करीत भाजपने नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद काढले आणि त्‍यांच्‍याजागी नुवेचे आमदार आलेक्‍स सिक्‍वेरा यांची वर्णी लावली. इतके करूनही भाजपला त्‍याचा दक्षिण गोव्‍यात काहीही फायदा झाला नाही, हे निवडणूक निकालानंतर स्‍पष्‍टपणे दिसून आले. मंत्रिपद मिळाल्‍यानंतर आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी वाढते वय आणि आरोग्‍याच्‍या कारणामुळे मंत्रिपदास योग्‍य न्‍याय दिला नाही. अखेर (पक्षाचा आदेश होता हे न सांगता) वैयिक्तक कारणात्‍वस आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर करीत त्‍यांनी बुधवारी राजीनामाही दिला. या सर्व घडामोडी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना तीन वर्षांपूर्वी सक्षम मंत्री अशी ख्‍याती मिळवलेले नीलेश काब्राल मनातल्‍या मनात कुणाकुणाचा उद्धार करीत असतील, हे त्‍यांना समर्थकांना माहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com