

भाजप खासदार काँग्रेस नेते?
पक्षांतराचा सर्वात जास्त झटका जर कुणाला बसला असेल तर तो कॉंग्रेसला. परंतु, काँग्रेस नेत्यांची जुनी खोड काही जात नाही असेच दिसते. भाजपचे दक्षिण गोव्याचे माजी खासदार रमाकांत आंगले यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर यांनी रमाकांत आंगलेना ‘कॉंग्रेसचे लाडके नेते’ असे संबोधले आहे. एकीकडे ‘डिफेक्शन’वर आकंडतांडव करायचे व दुसरीकडे भाजप नेत्यांना लाडके म्हणायचे, यावरुन काँग्रेसचे नेते गोमंतकीयांना नेमके काय बरे सांगू पाहत आहेत? समाजमाध्यमांवरील सदर पोस्ट वाचून अनेकांचे मनोरंजन झाले, हे मात्र नक्की.
रामराव वाघांची घरवापसी?
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाला राम राम ठोकलेले या पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष रामराव वाघ हे पुन्हा एकदा पक्षात येणार, अशी बतावणी आता आम आदमी पक्षातीलच काही नेते करू लागले आहेत. अलाहाबाद न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी पणजीला ज्या दिवशी बैठक बोलावली त्या दिवशी आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या गोतावळ्यात रामराव वाघही दिसले. बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस हे यासंबंधी प्रसार माध्यमांना बाईट देत असताना रामराव वाघ अगदी त्यांच्या शेजारी होते. आता पूर्वीचे पक्षातील मित्र म्हणून वाघ तिथे त्यांच्यासोबत येऊ शकतात. पण वेंन्झीचा हा व्हिडिओ ‘आप’चे कार्यकर्ते मुद्दामहून सर्वांना शेअर करू लागले आहेत. वाघांची आता घरवापसी नक्की, असेही ते सांगू लागले आहेत.
‘आप’चे असेही दिल्ली मॉडेल?
आम आदमी पक्षाने गोव्यात जे राजकीय निर्णय घेतले ते दिल्ली धोरणानुसार म्हणूनच जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला, असा आरोप आता या पक्षातून बाहेर पडलेले माजी संयोजक अमित पालेकर हेच करू लागले आहेत. आता त्यात तथ्य आहे की नाही, हे माहीत नाही. पण या पक्षाने ज्या ज्या नेत्यांना थेट दिल्लीत नेऊन पक्षात प्रवेश दिला, त्यांनी मात्र काही काळानंतर आम आदमी पक्षाला राम राम ठाेकला ही गाेष्ट खरी आहे. ही यादी एल्विस गोम्सपासून सुरू होऊन अमित पालेकर यांच्यापर्यंत पोहचते. यामध्ये एलिना साल्ढाणा, महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो यांचाही समावेश होता. या सर्वांना गाेव्यातील कार्यकर्त्यांशी कुठलाही समन्वय न साधता दिल्लीतून पक्षात घेतले होते. आणि कालांतराने हे सर्व नेते एकेक करून आम आदमी पक्षाला सोडून गेले. म्हणजे ‘आप’चे हेही ‘दिल्ली मॉडेल’ फसलेच असेच म्हणावे लागेल.
शैक्षणिक कर्जाची थकबाकी
मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळांत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विनाव्याज कर्ज योजना सुरू केली व तिचा लाभ होतकरू विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. अनेकांनी विदेशांत जाऊन उच्च शिक्षण घेतले व तेथेच नोकऱ्याही मिळविल्या. पण आता उघडकीस आलेल्या माहितीप्रमाणे अनेकजण ते कर्ज फेडण्यास विसरले व नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे त्यांतील अनेकजण सधनही आहेत. थकलेल्या कर्जाची रक्कम म्हणजे दहा कोटींवर गेलेली आहे.या योजनेची खासियत म्हणजे कर्ज घेऊन उच्च शिक्षण झाल्यावर नोकरी मिळताच ही रक्कम हप्त्यांनी फे़डावयाची होती. त्या नुसार अनेकांनी ती फेडलीही पण जे थकबाकीदार आहेत त्यांची यादी पाहिली तर बहुतेकजण हे सधन वर्गांतील होते. त्यांना कर्ज घेण्याची गरजही नव्हती. पण सरकारकडून मिळते म्हणून त्यांनी ते घेतले पण ते फेडण्यास त्यांनी हयगय केली, आता त्या सगळ्यांना म्हणे नोटिसा गेल्या आहेत.
‘त्या’ इशाऱ्याचे काय झाले?
गोमंतक भंडारी समाज संस्थेवर प्रशासक नेमा किंवा नव्याने निवडणूक घ्या, अशी मागणी काही भंडारी नेत्यांनी केली होती. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला होता. सरकारला निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत ही त्यांनी दिली होती. ती मुदत आता टळून गेली आहे. इशारा देणारे नेते कुठे गेलेत याचा शोध समाज बांधव घेत असल्याची चर्चा आहे. अधून मधून असे इशारा देत विषय ताजा ठेवण्याचे काम करण्यापलीकडे त्यांच्याकडून काही होत नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
मडगावातील ‘त्या’ प्रकल्पाविषयी चिडिचूप?
‘इनफ इज इनफ'' असे म्हणत माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. ज्यांना गोवा वाचावा, असे वाटते, असे बुद्धिजीवी या बैठकीत आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यात राजकारणीही उपस्थित होते. या सभेत मोठ्या बहुमजली प्रकल्पांना परवानगी दिली जाऊ नये म्हणून मागणी करण्यात आली. त्याशिवाय हरमल आणि करमळीतील आंदोलन यशस्वी झाल्याचा उल्लेखही करण्यात आला. पण मडगावात सध्या एका नामांकित ग्रुपने ४०० कोटींचा प्रकल्प सुरू केला आहे. तिथे जलतरण तलाव, अलिशान फ्लॅटचे अपार्टमेंट्स असणार आहेत. त्यामुळे येथील फ्लॅटची संख्याही शंभराच्यावर तर निश्चित असू शकते. आता या प्रकल्पामुळे खरोखर फातोर्डा परिसरातील साधनसुविधेवर ताण येणार नाही का? असा प्रश्न पडतो. मग येथील नेते, सामाजिक कार्यकर्ते या प्रकल्पाविषयी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक नाही का?
‘आप’ला पत्रकार परिषदेचे वावडे!
गोव्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा पर्याय ठरू, अशा अविर्भावात वावरत ‘आप’च्या नेत्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवला. मात्र, दारूण पराभवाची धूळ चाखावी लागल्याने राजीनामासत्रही पक्षात रंगले. त्यानंतर पक्ष नेतृत्त्व आत्मपरीक्षण करून चिंतनाचा मार्ग स्वीकारेल,अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पण घडतेय निराळेच. दिल्लीच्या माजी मुख्यमंंत्री तथा ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे स्थानिक नेतृत्त्वाला सूचवले होते म्हणे. पणजीत ही पत्रकार परिषद झालीच नाही. मडगावात पत्रकार परिषद बोलावली, पण ती बोलावणारा ‘संदेश’आलाच नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घ्यायला घाबरतात, असाच ‘संदेश’ गेला ना!
मध्यवर्ती वाचनालयात सरकारी सूनबाईंचा वावर
पणजीतील सेंट्रल लायब्ररीत तिसऱ्या मजल्यावर दररोज वाचनासाठी जाणाऱ्या नियमित वाचकांना गेल्या महिन्या दोन महिन्यात सरकारी सुनबाईंचा ताठा अनुभवाला येतो.एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याची पत्नी असलेली सेंट्रल लायब्ररीतील ही महिला आपण वाचनालयाची सर्वेसर्वा असल्याच्या तोऱ्यात वावरते. पुस्तके असलेल्या महत्वपूर्ण विभागात कर्मचाऱ्यांना जेवायला सक्त मनाई आहे. पण हा वाचनालयाचा दंडक पायदळी तुडवून तेथेच स्वतःची खुर्ची व टेबल थाटून ही बया ऐटीत जेवायला बसते. वरून साधी भोळी दिसणारी ही शासकीय सून आपले स्वतःचे घर असल्याच्या ऐटीत तिथे बिनबोभाट वावरते, अशी खमंग चर्चा सेंट्रल लायब्ररीत येणाऱ्या वाचकांत सध्या सुरू आहे.
अधिवेशन की आंदोलन सिझन?
या महिन्यात सोमवारपासून गोवा विधानसभा अधिवेशन सुरू होतंय, आणि त्याच वेळी रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने आवाज वाढतोय, अशी चर्चा राज्यभर पसरली आहे. अधिवेशन म्हणजे चर्चा, प्रश्नोत्तर आणि बाहेर रस्त्यावर म्हणजे घोषणाबाजी, बॅनरबाजी दोन्हीकडे एकाच वेळी ‘कार्यक्रम’ सुरू होणार, अशीच चर्चा आहे. ज्यांच्या मागण्या अजून फाईलमध्ये अडकल्या आहेत, ते आता थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. आधी सुरू असलेली आंदोलने तर आहेतच; त्यात नव्या चळवळींचा मसाला घालायची तयारी दिसतेय. भेट मिळाली तर ठीक, नाहीतर मोर्चा पक्का, असा सरळ फॉर्म्युला सध्या चर्चेत आहे. त्यात भूरूपांतरणासंदर्भात झालेल्या बैठकांनी सरकारवरचा राग वाढलाय, म्हणे. प्रश्न एवढाच हा वाढलेला राग अधिवेशनात सरकार कसा हाताळणार? हात भाजून घेणार, की अलगद उलथणार? एकूण काय, आत सभागृहात भाषणांची आतिषबाजी आणि बाहेर रस्त्यावर आंदोलनांची फटाकेबाजी, असा ‘डबल एंटरटेनमेंट पॅक’ येण्याची शक्यता आहे.
सांताक्रुझकडे सारे लक्ष
ॲड. अमित पालेकर यांनी आम आदमी पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर सांताक्रुझ मतदार संघ अचानकपणे चर्चेत आलेला आहे. पालेकर यांची वाट कोणत्या दिशेने जाते याचा अंदाज प्रत्येक राजकीय पक्ष आता घेऊ लागला आहे. सांताक्रुज मधून येत्या निवडणुकीत भाजप तगडा उमेदवार उतरवणार, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. काहीजण त्यासाठी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचेही नाव घेत आहेत. सांताक्रुझमधील विजयासाठी ख्रिस्ती उमेदवाराच हवा, असा राजकीय चर्चेचा रोख आहे. त्यामुळे पालेकर यांना कोणता राजकीय पक्ष या पार्श्वभूमीवर सांताक्रुझ साठी निवडण्याचे धाडस करेल, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महाजनपदाचा वाद कायम
हरवळे येथील श्री देव रूद्रेश्वर रथयात्रेचा वर्धापन दिन झाला तरीही महाजन पदाचा वाद सुटलेला नाही. पूर्वी महाजन असलेल्यांच्या कायदेशीर वारसांनाच महाजनपद देण्यात यावे असे एका गटाला वाटते. दुसऱ्या गटाला तमाम भंडारी बांधवांना देवस्थानचे महाजनपद दिले जावे असे वाटते. हा वाद न संपल्याने २०१७ मध्ये सरकारला देवस्थानवर प्रशासकाची नियुक्ती करावी लागली आहे. हा विषय आता न्यायप्रविष्टही झाला आहे. त्यामुळे देवस्थानवर समिती नाही केवळ देवकृत्य करण्यासाठी अस्थायी समिती आहे. भंडारी समाज मात्र हा महाजन पदाचा वाद कधी संपतो, याकडे मात्र डोळे लावून बसला आहे.
हुंदडकीसाठी आयता मंच
गोवा मुक्तीपूर्वी कोर्टात ‘तेश्तिमुन्य’(साक्षीदार) राहणे हा व्यवसाय झाला होता. गावात एकटा तरी ‘तेश्तिमुन्य’ असायचाच. तो पणजीला किंवा मडगावला जायचा, दिवसभर तिथं काही देमांदांच्या सुनावणीला साक्षीदार राहायचा. त्याची गुजराण त्यावर चालायची. रोज कुठल्याही केसमध्ये साक्षीदार हे ऐकायलाच विचित्र वाटतं. न्यायाधीशही प्रश्न करत नसत. असो, सांगायचा मुद्दा – सध्या गोव्यात कैक आंदोलने चालू आहेत. काही हुंदडकीखोर, बेकार, निरुद्योगी लोक कुठल्याही आंदोलनात, मंचावर अ-गंभीरपणे अस्तित्व दाखवतात. यांच्या या बालबुध्दीला साजेशा प्रसिध्दीलोलुप लिला पाहिल्यावर त्या काळच्या तेश्तिमुन्यांची आठवण होते, असे लोक खिल्ली उडवत म्हणतात. कारण ते साक्षीदार कुठल्याही कोर्टात कुठल्याही केसमध्ये साक्ष द्यायचे. गोव्याची फारच प्रीती मजला, हे दाखवताना जो कमालीचा अभिनय हे करतात, रडतात, ओरडतात, हवेत हात ‘फांफुडतात’, त्या ‘फाफार्रांव’ प्रदर्शनाने लोकांना चक्कर यायची बाकी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.