Goa Opinion: 'बर्च क्लब'प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अन्यथा गोव्यातील पर्यटन मान टाकेल आणि राज्य भयाण आर्थिक संकटात सापडेल..

Goa Tourism: वेळीच कठोर कारवाई झाली तरच इथला पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल. अन्यथा खाण व्यवसायापाठोपाठ पर्यटन हा व्यवसायदेखील मान टाकील आणि राज्य एका भयाण आर्थिक संकटात सापडेल.
Arpora Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

जयराम रेडकर

‘सचिव बडतर्फ : सरपंच अपात्र’ अशी ठळक हेडलाइन असलेली बातमी स्थानिक दैनिकातून अलीकडेच प्रसिद्ध झाली. कुणावर कधी कशी आपत्ती ओढवेल आणि कोणाचा त्यात बळी जाईल याचे भाकीत करणे केवळ अशक्य. ‘बर्च नाइटक्लब’ हे त्याचे अक्षरशः ज्वलंत उदाहरण. या आगीने अनेकांना उघडे पाडले.

उत्तर गोव्यातील किनारपट्टीला लागून असलेल्या एका गावातील ‘बर्च नाइटक्लब’ला ६ डिसेंबर २०२५च्या रात्री आग लागली. आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र आग लागली त्यावेळी कुणा मूर्ख माणसाने क्लबचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद केला आणि क्लबमधील कर्मचारी आणि ग्राहक आतच अडकून पडले परिणामी आगीत स्वाहा झाले.

हा क्लब अशा अडचणीच्या जागी होता की ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी केवळ एक अरुंद रस्ता उपलब्ध होता जिथून अग्निशमन दलाचे वाहन प्रवेश करू शकत नव्हते. शिवाय आग विझवण्याची आंतरिक यंत्रणा या क्लबपाशी उपलब्ध नव्हती असेही कळते. या अशा त्रुटीमुळे त्या भयाण रात्री एकूण पंचवीस लोकांचा जळून मृत्यू झाला. यात जे जळाले त्यात या क्लबचे अधिकतर कर्मचारी आणि दिल्लीहून मौजमस्तीसाठी आलेल्या एका कुटुंबातील चार सदस्य यांचा समावेश होता.

या जळीतकांडाची जबाबदारी प्रशासनावर आली. ज्या राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने हा क्लब काही वर्षांपूर्वी सुरू झाला होता तो नामानिराळा राहिला आणि कारवाई झाली ती स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायतीचा सचिव यांच्यावर!

प्रसारमाध्यमातून या विषयावर बराच ऊहापोह झाला. ‘बर्च नाइटक्लब’सारखेच संपूर्ण गोव्यात साधारणपणे दोनशे अवैध नाइटक्लब चालतात असे कळते. अर्थात हे क्लब उच्च पातळीवरच्या आशीर्वादाशिवाय चालू आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

‘बर्च नाइटक्लब’ला लागलेली आग हे विरोधकांना एक निमित्त मिळाले आणि त्यांनी सरकारवर तोफ डागायला सुरुवात केली. अखेर या अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी समिती नियुक्त केली.

या चौकशी समितीने वर उल्लेख केल्याप्रमाणे स्थानिक सरपंच आणि पंचायत सचिव यांना दोषी ठरवले. त्याआधी तत्कालीन पंचायत संचालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांना निलंबित करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना या क्लबची पाहणी न करताच प्रमाणपत्र दिल्याचा ठपका ठेवून त्यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले.

या अपघातात ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. या पाच लाखांत गेलेले जीव परत येणार नाहीत हे जरी खरे असले तरी घडलेल्या दुर्घटनेविषयी राज्य सरकार संवेदनशील आहे हा संदेश सर्वदूर गेला ही राज्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली. या दुर्दैवी घटनेची बातमी केवळ गोवा राज्य आणि देशापुरतीच मर्यादित न राहता टीव्हीवरील बातम्या आणि सोशल मीडियामार्फत जगभर पसरली. त्यामुळे गोव्याविषयी एक वाईट संदेश सर्वत्र गेला.

देशी / विदेशी पर्यटकांची अशी एक तक्रार आहे की, इथले टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेल चालक त्यांना अवाच्या सवा दर सांगून लुबाडतात.

अनेकदा विमानतळावर पर्यटकांची आणि टॅक्सी ड्रायव्हर यांची बाचाबाची होते, मारामारीचे प्रकार उद्भवतात. असे पर्यटक जेव्हा माघारी जातात तेव्हा ते इथल्या कटू आठवणी घेऊन जातात आणि आपले कटू अनुभव सोशल मीडियावर पेरतात.

परिणामी गोव्याची बदनामी होऊन पर्यटन रोडावले आहे. यंदा जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याकडे येणारा पर्यटक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी वळला. वेंगुर्ला, शिरोडा, तारकर्ली, मालवण, गणपतीपुळे, दापोली येथील समुद्रकिनारे ३१ डिसेंबरच्या दिवशी गजबजलेले दिसले.

Arpora Nightclub Fire
Goa Opinion: एकेकाळी पोर्तुगीज हैदराबादच्या निजामाला 'गोवा' विकायला निघाले होते; जनमन

खाण व्यवसाय बंद पडल्यानंतर गोव्यासाठी पर्यटन हाच महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. गोवा सरकारने जगभर त्याची जाहिरात करून अनेक देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करून घेतले होते.

छोट्या मोठ्या व्यवसायांना यातूनच उभारी मिळाली. शहरातील बाजारपेठा आणि किनारपट्टीवर असणारे व्यवसाय यांना बरकत आली. ‘बर्च नाइटक्लब’ला आग लागली आणि गोव्याची नाचक्की झाली.

Arpora Nightclub Fire
Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करता येते परंतु गेलेली अब्रू, पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवता येणार? नाइटक्लब, स्पा, ब्युटी पार्लर, कॅसिनो यांसारख्या व्यवसायांनी इथल्या सभ्य संस्कृतीला नख लावले आहे. याला स्थानिक नेते आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि छोटे- मोठे कर्मचारी जबाबदार आहेत.

त्यांच्यावर वेळीच कठोर कारवाई झाली तरच इथला पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल. अन्यथा खाण व्यवसायापाठोपाठ पर्यटन हा व्यवसायदेखील मान टाकील आणि राज्य एका भयाण आर्थिक संकटात सापडेल. सरकारने यावर वेळीच तोडगा काढणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com