पणजी: महागाईने सर्वांचेच खिसे कापणे सुरू ठेवलेले असतानाच वीज बिलातील अघोषित दरवाढीने ‘शॉक’ बसणे सुरू झाले आहे. आजवर वीज दरवाढ झाली की इंधन अधिभाराकडे बोट दाखवणाऱ्या गोवा (Goa) वीज खात्याने या खेपेला तसे काहीही जाहीर न करता सरसकटपणे वाढीव वीज बिले पाठवणे सुरू केल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या महिन्यात तेवढ्याच वीज वापरासाठी 765 रुपये वीज बिल आले असल्यास या महिन्यात 916 रुपये वीज बिल आले आहे. कोणतेही कारण न देता 150 रुपये वाढ झाली आहे. हे झाले साधे उदाहरण. मात्र, अनेकजणांना दरवाढीचा अक्षरशः शॉक बसला आहे. अनेकांना वीज बिलातील तफावत ही एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. घरे बंद असतानाही भरमसाट वीज बिले येण्याचे प्रकारही घडले आहेत.
वीज बचत करण्यासाठी उत्तम दर्जाची विजेवर चालणारी वीज उपकरणे वापरा, एलईडीचे बल्ब वापरा असा प्रचार सरकारी पातळीवर केला जातो. याचे तंतोतंत पालन करणारेही या वीज दरवाढीच्या शॉकपासून बचावलेले नाहीत. कोविड महामारीच्या काळात अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत घटले. काहींना सध्या बचतीवर गुजराण करावी लागत आहे.
जितका विजेचा वापर जास्त तितकी वीज बिले जास्त हे समीकरण मान्य असले, तरी सध्या ही बिले जास्तच शॉक देऊ लागली आहेत. आम्ही आमची सर्व विजेवर चालणारी उपकरणे बदलली, पण काहीही उपयोग नाही.
- राज शिरोडकर, आके
जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ चटका देत असतानाच वीज बिल जगणे असह्य करत आहे. बिले वाढत आहेत. गृहिणींना घर चालवणे कठीण झाले आहे.
- विंदा विठू नाईक
वीज दरवाढ सर्वसामान्यांना चिरडून टाकणारी असल्याने सामान्यांना आता सावरणार कोण असा प्रश्न निर्माण होत झाला आहे.
- विश्वनाथ नार्वेकर, सांगे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.