
पणजी: दोनापावला येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना गुरुवारी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेल्या गोवा राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर अखेर पडदा पडला. या दोन मंत्र्यांना दोन दिवसांत खात्यांचे वाटप केले जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील काहींना भाजपने मंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदलाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण सरकारने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदारांना दिले होते. सत्ताधाऱ्यांतील बहुतांशी जण कार्यक्रमाला उपस्थित राहिले, पण सातही विरोधी आमदारांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली.
लोकसभा निवडणुकीआधी दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्याचे राजकारण ओळखून भाजपने नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्या जागी काँग्रेसमधून आलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देत प्रथम फेरबदल केला होता.
त्यानंतर २०२७ मधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल होतील आणि दोन ते तीन आमदारांना मंत्रिपद मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अनेकदा दिले होते. पण फेरबदल होत नव्हता. त्यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
त्यातच पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर या अधिवेशनापूर्वीच फेरबदल होईल, असा अंदाज सर्वांनीच बांधला होता. पण तोसुद्धा फोल ठरला.
अखेर आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी दिगंबर कामत आणि गोविंद गावडे यांच्या जागी रमेश तवडकर यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले. त्यानुसार गुरुवारी दोघांचाही शपथविधी पार पडला.
१. पक्षाने दिलेल्या मंत्रिपदाच्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देऊन आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, अशी हमी दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
२.यापुढील काळात मंत्री म्हणून आपण जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाला अधिकाधिक बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे दिगंबर कामत म्हणाले.
३.२०१२ ते २०१७ या काळात आपण मंत्री होतो. त्यानंतर २०२२ मध्ये राज्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षाने आपल्यावर सभापतिपदाची जबाबदारी सोपवली. पक्षसंघटनेचा कार्यकर्ता या नात्याने आपण आत्तापर्यंत पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे, असे रमेश तवडकर यांनी सांगितले.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने लवकरच मंत्रिमंडळात आणखीन बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गणेश चतुर्थीनंतर हा बदल होईल असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्या ‘कधीही काहीही होऊ शकते’ या विधानांमुळे मंत्रिमंडळातील आणखी फेरबदलाचा विषय चर्चेचा ठरला आहे.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलात कामत, तवडकर यांच्यासह संकल्प आमोणकर आणि मायकल किंवा दिलायला लोबो यांच्यापैकी एक अशा चौघांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, केवळ कामत आणि तवडकर या दोघांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्याला बहुतांशी मंत्री आणि आमदार उपस्थित होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पण संधी न मिळालेले संकल्प आमोणकरही उपस्थित राहिले. पण आमदार मायकल लोबो, त्यांची पत्नी आमदार दिलायला लोबो, काहीच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातून वगळलेले गोविंद गावडे व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.