

पणजी: गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पक्ष विलीनीकरणाचा काँग्रेसपुढे ठेवलेला प्रस्ताव नेमका कुठे अडकला आहे? तो कोणी रोखला आहे ? याबद्दल गोवा दौऱ्यावर येणारे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्टीकरण द्यावे. या मुद्द्यावर स्पष्टता असणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘गोमंतक टीव्ही’च्या मुलाखतीत व्यक्त केले.
‘गोमन्तक टीव्ही’वर सोमवारी सायंकाळी संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत पाटकर यांनी वरील मत व्यक्त केले. आगामी निवडणुकीच्या आणि गोवा रक्षण यात्रेच्या अनुषंगाने नायक यांनी विचारलेल्या प्रश्नावर पाटकर यांनी उत्तरे दिली. यात त्यांनी सांगितले की, दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबद्दल आपण स्वतः मतदारांची माफी मागितली आहे.
त्यात आपली काहीही चूक नसताना लोकांच्या शिव्या आपल्याला खाव्या लागल्या आहेत. गेली साडेचार वर्षे पक्ष आपण तिसऱ्यांदा पुन्हा पक्ष फुटणार नाही, हे सांगत आलो आणि त्यासाठी काम करीत राहिलो. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही पारदर्शकपणे उमेदवार निवडप्रक्रिया केली होती. परंतु सध्या पक्षात अजून नसतानाही लोकांनी स्वतः उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे शिस्त काही दिसत नाही.
गोवा राखण यात्रेविषयी ते म्हणाले, गोवा राखण यात्रेविषयी गट समित्यांबरोबर बैठका घेतल्या गेल्या, त्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास मिळविला आणि यात्रेच्या दोन दिवस अगोदर गट समित्या बरखास्त केल्या जातात, त्यातून नक्की काय संदेश दिला जात आहे, असा सवालही पाटकर यांनी केला. आपल्या मनात भारतीय काँग्रेस आहे, आपण जे सध्या पक्षात काही चालले आहे त्याविषयी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे बोललो आहे.
काब्राल ‘धुरंधर-२‘ घडवणार!
२०२२ मध्ये आमदार मायकल लोबो काँग्रेसमध्ये आले आणि निवडून आल्यानंतर इतरांना घेऊन ते भाजपमध्ये गेले. ही दुसरी काँग्रेसमधील आमदारांची फूट कोणीही विसरलेले नाहीत. या घडलेल्या ‘धुरंधर-१’ च्या नंतर आता आता २०२७ मध्ये भाजपच्यावतीने ‘धुरंधर-२’ची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे म्हणजेच, आमदार नीलेश काब्राल काँग्रेसमध्ये प्रवेश करून, निवडणूक जिंकू शकतात आणि त्यानंतर आमदारांच्या एका फुटीर गटाचे नेतृत्व करू शकतात, असा दावा पाटकर यांनी केला आहे.
गेली साडेचार वर्षांत आपण राज्यातील जनतेचे विविध प्रश्न मांडत आलो आहोत, कुडचडेतील नेत्यांचेही प्रश्न आपण मांडलेले आहेत. येत्या निवडणुकीत भाजपला तर आपला उद्देश साध्य करायचा झाल्यास ते काब्राल यांना काँग्रेसमध्ये पाठवतील आणि त्यास उमेदवारी मिळवून देतील. पण जर आपणास काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू. लोक ठरवतील की कोणाच्या मागे जायचे ते.
- अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.