

पणजी: देशातील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन व्यवस्थापनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाच्या बाबतीत गोवा अद्याप मागेच आहे. पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या एकाही समुद्रकिनाऱ्याला हे मानांकन मिळालेले नाही.
दुसरीकडे, महाराष्ट्राने यंदा प्रथमच या आंतरराष्ट्रीय यादीत प्रवेश केला असून रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या हंगामासाठी ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे गोव्याच्या किनारपट्टी व्यवस्थापनासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महाराष्ट्रासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या निकषांची पूर्तता केली आहे. या तीन किनाऱ्यांवरील ब्ल्यू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल विभागासह पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
गोव्याचा शेजारी असलेल्या कर्नाटकाने या बाबतीत आधीच आघाडी घेतली आहे. उडुपी जिल्ह्यातील पुदुबिद्री आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील कासरकोड (इको बीच) या समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळाले आहे.
गोव्याचे प्रयत्न कुठे कमी पडतात?
गोव्याकडे सुमारे १०५ किलोमीटर किनारपट्टी असून देशातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून त्याची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात. मात्र, पर्यटनाची जागतिक ओळख असलेल्या या राज्यातील एकाही किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळालेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.