

पणजी: मान्सूनच्या आगमनामुळे गोव्यातील समुद्रकिनारे अत्यंत धोकादायक बनले असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन ‘दृष्टी मरीन’ या जीवरक्षक संस्थेने केले आहे. राज्यातील ५४ समुद्रकिनाऱ्यांवर ४५० हून अधिक प्रशिक्षित जीवरक्षक आणि बीच मार्शल तैनात करण्यात आले आहेत. त्यांची सतत गस्त सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दक्षिण गोव्यात ३० आणि उत्तर गोव्यात २४ समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक कार्यरत आहेत. शिवाय डिचोलीतील मये तलाव, दूधसागर धबधबा, सांगेतील सावरी धबधबा आणि सत्तरीतील ‘म्हवाचो गुणो’ येथेही जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. सध्या समुद्र खवळलेला असून, बदलत्या हवामानामुळे किनारी भागात पोहणे, जलक्रीडा आणि मासेमारीसारख्या उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
किनारी भागातील खडकाळ व उंचावरील ठिकाणे पावसामुळे निसरडी झाल्याने तेथे विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सेल्फी घेणे, मद्यपानानंतर पाण्यात उतरणे किंवा विजांच्या कडकडाटात समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील ५४ किनारे आणि जलस्रोतांवर जीवरक्षकांसह बीच मार्शल
महत्त्वाच्या १० सूचना
समुद्रात पोहणे व जलक्रीडा टाळा
लाल झेंड्यांचे संकेत पाळा
समुद्र भरतीरेषेपासून १० मीटर अंतर ठेवा
मुलांवर सतत काळजीपूर्वक लक्ष ठेवा
खडकाळ भागात जाणे टाळा
धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नका
मद्यपानानंतर पाण्यात उतरू नका
विजांच्या कडकडाटात किनाऱ्यांवर जाणे टाळा
निसरड्या कड्यांपासून दूर राहा
सूचना फलक काळजीपूर्वक वाचा
किनारी भागात लाल झेंडे उभारून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला आहे. उथळ पाण्यातही अचानक मोठ्या लाटा येऊन ओढून नेण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याबरोबरच सूचनांचे पालन करावे.
- नवीन अवस्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी (दृष्टी मरीन)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.