Goa Corjuem island: मांडवीच्या उपनदीत निसर्गसंपन्न 'खोर्जुवे बेट'

Corjuem island Mandovi river history Goa: निसर्गाने मांडवीला जन्मास घालताना अनेक चमत्कार केले आहेत. तिच्या मुखाकडे पाहिल्यास अथांग अरबी समुद्र तिचे गोड पाणी पिऊन तृप्त होतो.
Goa Corjuem island
Goa Corjuem islandDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य.ना. गावकर

भूगोलाकडे बारकाईने पाहिल्यास पूर्वकाळी अरबी समुद्राचे पाणी कळंगुट, साळगाव, सांगोल्डा, सुकूर, बस्तोडा, म्हापसा, नास्नोळापर्यंत होते, पण हळूहळू त्या गावांच्या सखल भागात समुद्रीय रेती साचून शेती निर्माण झाल्याने आज पर्वरी पठार हे बेट मानीत नाही. या दोन पठारांच्या आडोशाला मांडवीने आपली लाडकी आठ बेटे निर्मून तिच्या मुखाकडील जैविक मत्स्यधन पोसले आहे.

निसर्गाने मांडवीला जन्मास घालताना अनेक चमत्कार केले आहेत. तिच्या मुखाकडे पाहिल्यास अथांग अरबी समुद्र तिचे गोड पाणी पिऊन तृप्त होतो, तसेच मुखाकडील भागात उत्तर बाजूने पर्वरी पठार आणि दक्षिण बाजूने बांबोळी, कदंबा पठारांनी तिचे मुख सुरक्षित राहाण्यासाठी मारुती आणि भिमाच्या शक्तीने ती ठाम उभी राहिली आहे, भौगोलिक कदंब पठाराचा परिसर म्हणजे तिसवाडी बेट आहे, पण उत्तरेच्या पर्वरी पठाराला आपण बेट म्हणत नाही, पण भूरचनेने पर्वरी पठाराचा आकार पाहिल्यास पूर्वकाळी पर्वरी पठार बार्देश तालुक्यात भले मोठे बेट होते, हे कोणी नाकारणार नाही.

कारण मांडवी आणि तिची उपनदी पोंबुर्पा अगर हळदोणा नावाने ओळखणारी बेती, बिठ्ठोण, एकोशी, पोंबुर्पा, कारोना, पोनोळे, हळदोणा, नास्नोळा, म्हापसा, बस्तोडा, सुकूर, साळगाव कडून सांगोल्डा भागात उगम पावून वाहात बिठ्ठोण गावात मांडवीस मिळते. मात्र पठाराला नदीने वळसा घालण्याचा राहिला तो भाग साळगाव आणि कळंगुट गावे, म्हापसा उपनदी पुढे जाऊन अरबी समुद्रास मिळाली असती तर पर्वरी पठार दुसरे मोठे बेट गोव्यात आज पहावयास मिळाले असते.

तरी भूगोलाकडे बारकाईने पाहिल्यास पूर्वकाळी अरबी समुद्राचे पाणी कळंगुट, साळगाव, सांगोल्डा, सुकुर, बस्तोडा, म्हापसा, नास्नोळापर्यंत होते, पण हळूहळू त्या गावांच्या सखल भागात समुद्रीय रेती साचून शेती निर्माण झाल्याने आज पर्वरी पठार हे बेट मानीत नाही. या दोन पठारांच्या आडोशाला मांडवीने आपली लाडकी आठ बेटे निर्मून तिच्या मुखाकडील जैविक मत्स्यधन पोसले आहे.

त्या आठ बेटांत उत्तर बाजूने खोर्जुवे बेट आणि दक्षिण बाजूला कुंभारजुवे बेट तिच्या पात्रात उभी आहे, आठ बेटातील कालवी, आखाडा आणि वाशी ही बेट विस्ताराने एकदम लहान आहे, तरी मांडवीने नवव्या बेटास आपल्या पात्रात चोडण दिवाडी आणि रायबंदर भागातील त्रिवेणी संगमात जन्म दिला आहे, म्हणजे मांडवीच्या पात्रात आजसुद्धा भूगर्भ बदलण्याच्या घडामोडी घडत आहेत, हे मांडवीचे ओझे डोक्यात घेऊन खांडोळ्यातून दुपारच्या रखरखीत उन्हातून तापलेल्या रस्त्याने प्रवास करून खोर्जुवे गाव गाठला.

Goa Corjuem island
Goa Education: धक्कादायक! शालेय वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, 'SCERT'च्या परिपत्रकामुळे गोंधळ; शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

पैरामध्ये पोहचताच मराठ्यांच्या म्हणजे भोसले सावंतांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्याने मला दर्शन दिले. पोर्तुगीजांनी बार्देश जिंकला, पण खोर्जुवे बेट त्यांना जिंकता आले नाही. पुढील काळात त्यांनी इतर गोवा जिंकला. त्यावेळी खोर्जुवे किल्ला त्यांच्या ताब्यात येऊन नंतर त्यांनी आपल्या सैनिकांना शिक्षण देण्यास या किल्ल्याचा वापर केला. आज खोर्जुवे बेटाला दोन पूल उभारून म्हापसा, डिचोली अंतराचा लांब प्रवास जवळ आणला आहे.

खोर्जुवे बेटाला मांडवीच्या उपनद्यांनी वेढले असून, बेटाच्या पूर्वेला पैरा-शिरगाव, पश्चिमेला हळदोणा, उत्तरेला शिरसई अस्नोडा, आणि दक्षिणेला कालवी बेट आहे, त्या बेटावर जाण्यास पूर्वी किटला, हळदोणे, पैरा, शिरसई ठिकाणी नाविक होड्या चालवित होते. खोर्जुवे बेटाला निसर्गाने खाजन शेती मोठ्या प्रमाणात दिली आहे, तिथली शेती लागवडीखाली आणण्यासाठी आमच्या पूर्वजांच्या किती पिढ्यांनी घाम गाळला हे इतिहासच जाणतो.

कारण संपूर्ण बेटाच्या नदी किनाऱ्याला बांध घालण्यास नदी पात्रातील चिखल उपसून तिथली खाजन शेती निर्माण केली आहे. बांधाच्या वर्तुळकार नदी-किनाऱ्याला कांदळवनाच्या हिरवाईने सजवले आहे. त्या झाडांवर वेगवेगळे पक्षी घरटी करून नदी शेतातील मासळी कीटकांवर ताव मारतात, बेटावरील शेतीच्या रक्षणासाठी पूर्वंजानी मानसी उभारल्या आहेत. कामरखाजन, पोडवाल-खाजन, हातल-खाजन, न्हय-खाजण, गोळजुवे-खाजन आणि कुशेम -खाजण या परिसरातील बांधावर माणसे लावून शेतीचे रक्षण केले आहे.

उन्हाळ्यात शेती खणून ठेवून पावसाळा सुरू झाला म्हणजे करंगुट, खोचरी, बाबरी, आजगो, मुणे भात पेरणी करून चवदार भाताचे पीक घेत होते. शेतीला सुके शेण, चुलीतील राख, कुजलेली मासळी नदीतील खार चिखल घालून मोठ्या प्रमाणात भात पिकवीत होते. हे साळुचे भात उकडून त्यांचे तांदूळ बनवून भाकरी, पेज, शीतभात आणि शेवटा, काळुंद्र, तामसा, खरचाणी, पालू, खेकडे, वागी, झिंगे यांच्या कालवणाने अन्न सेवन करून लोक सुखी जीवन जगले होते.

आज गोमंतकीय शेतकरी तायचुंग, आयआर एट, जया, ज्योती, कर्ज नवीन भात बियाणी वापरून रासायनिक खतांच्या वापराने शेती प्रदूषित होत पडीक झाली आहे. शिवाय रासायनिक खत आणि घरातील सांडपाणी नदी ओहळात गेल्याने मत्स्य संपदेवर त्याचा वाईट परिणाम होऊन माणसाचे अन्न माणूसच नष्ट करू लागला आहे. अशाने त्याचा वाईट परिणाम मानव, जनावरे, पक्षी, सरपटणारे प्राणी यांच्यावर होऊन, पर्यावरणीय साखळी तुटत चालली आहे, हे सुसंस्कृत समजणाऱ्या माणसाला कोण सांगेल.

खोर्जुवेच्या शेतातील भात कापणी झाल्यावर हिवाळ्यात शेतकरी लोक आपापल्या शेतात मिरची, कांदा, अळसांदा, वाल, वांगी, रताळी, मुळा, नवलकोबी, चवळी अशी कडधान्ये आणि भाजीपाला पीक घेऊन ते म्हापसा, अस्नोडा, डिचोली बाजारात विकून संसार चालवायचे. खोर्जुवे बेटाला जांभ्या दगडाचे वरदान लाभले आहे, त्यामुळे तिथल्या लोकांना विहिरीचे पाणी भरपूर मिळते, बेटावर नारळ, फणस, आंबा पीक भरपूर येते.

मांडवीच्या बेटावरील आंबा रुचकर लागतो, बेटावर फिरताना मानकुराद, मालगेस, साकरीन, करेल, मुसराद झाडे पाहावयास मिळतात. त्याच प्रमाणे जांभूळ, बकुळ, फातरफळ, कण्हेर, हासळ, पिटकळ, करवंद, चुरन रानमेवा आहे. बेटावर पूर्वी काजू पीक मोठ्या प्रमाणात मिळत होते. तिथले लोक काजूच्या बोंडापासून दारू बनवीत होते, बेटावरील घरांसमोर विविध फुलझाडांच्या बागा पाहावयास मिळतात.

हिंदू धर्मात शमीच्या झाडाला देव मानून त्या झाडाच्या समीधा यज्ञात वापरतात, पांडवांनी आपली शस्त्रे या शमीच्या झाडावर लपवली होती, असे महाभारतात वाचावयास मिळते. मात्र शमी, पिंपळ, वड, रुमड, खैर, ही झाडे औषधी आहेत, म्हणून त्या झाडांना महत्त्व आहे. खोर्जुवे बेट अनेक वाड्यांनी विभागले आहे. पडवळवाडा, हातळवाडा, देऊळवाडा, मधलावाडा, वरचावाडा, कोळमवाडा, कुशेवाडा नावांनी ओळखले जाता. खोर्जुवे बेटावर सातेरीदेवीचे मंदिर आहे, सातेरी म्हणजे भूमी गोव्यात कैक गावात वारुळरुपी सातेरी मंदिरे आहेत, खोर्जुवे बेटावर अनेक ठिकाणी मोगरीच्या वेली पहावयास मिळतात.

Goa Corjuem island
Goa Waterfalls: पावसाळी पर्यटनासाठी गोव्यातील 8 अफलातून ठिकाणे, नक्की भेट द्या!

शिरगावच्या लईराईस मोगरीची फुले आवडतात, मात्र मोगरी फुलायला लागली म्हणजे सुरंग, केवडा, कांदळ, कस्तुरी, जाई, सोनचाफा फुलांचा दरवळ आठवतो. मी बेटावर प्रवास करताना मला सोमनाथ पोळे भेटले, त्यांच्या घरी आमचे स्वागत झाले. त्यांनी आपल्या जमिनीत हजारभर मोगरी वेलींचा मळा लावला आहे. ते मोगरी हार, माळा, वेणी हार बनवून फुलांचा व्यापार करतात.

पणजी, म्हापसा, अस्नोडा, डिचोली बाजारात त्यांची फुले विक्रीस पाठवतात. पण आज त्या पर्यावरणीय बेटाच्या नदी पात्रांना खाणींनी ग्रासले आहे, दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर खाण माती ओहळ खळ्यातून वाहत खाली येते. शिरगाव, खोर्जुवे, पैरा, मयेच्या नदीत भरून ती नदी भरून गेली आहे, हाच या बेटाच्या भविष्याला खरा धोका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com