

पणजी: ‘‘मनोज परब ‘सेटिंगबाज’ असून, त्यांचे बिल्डर लॉबीशी संबंध आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने त्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी ‘कोस्टल बिल्डकेअर एलएलपी’ ही कंपनी स्थापन केली आणि १५० फ्लॅटच्या रंगरंगोटीचे काम मिळविले. परप्रांतीयांना ‘घाटी’ म्हणून हिणवणाऱ्या परब यांच्या या प्रकल्पात काम करणारे सर्व कामगार परप्रांतीयच आहेत’’, अशी टीका आमदार तथा रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे केली.
‘‘मनोज परब स्वत: तीन निवडणुका हरले आहेत. त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. आपण पंचायत निवडणूकही जिंकू शकत नाही, हे समजल्यानंतर त्यांनी ‘सेटिंग’चा मार्ग धरला. त्यातून त्यांचे संबंध ठाणे-मुंबईतील शिवसेनेशी आले. शिवसेनेला हाताशी धरून ते एका बिल्डरच्या घरी गेले आणि त्या बिल्डरच्या मदतीने त्यांनी ‘कोस्टल बिल्डकेअर एलएलपी’ ही कंपनी स्थापन करून १५० फ्लॅटच्या रंगरंगोटीचा पहिलाच प्रकल्प मिळवला’’, असे बोरकर म्हणाले.
‘'मनोज परब यांनी गोव्यातील परप्रांतीयांचा नेहमीच ‘घाटी’ म्हणून द्वेष केला. परंतु त्यांना मिळालेल्या प्रकल्पात काम करणारे सर्व कामगार परराज्यांतील आहेत. यातून परब यांचा दुटप्पीपणा दिसून येतो’’, असे त्यांनी सांगितले.
‘‘नगरनियोजन कायद्याच्या (टीसीपी) कलम ३९ ‘अ’विरोधातील आंदोलन स्थगित करण्यासाठी माझ्यावर परब यांच्या साथीदारांनी दबाव आणला. त्यामुळे सांत आंद्रेतील काम बंद करण्याचे लेखी आश्वासन घेऊन मी आंदोलन स्थगित केले’’, असा आरोपही आमदार बोरकर यांनी केला.
‘‘गोव्यात माझ्याविरोधात न्यायालयात खटले सुरू आहेत. त्यामुळे पासपोर्ट मिळू न शकल्याने मी पक्ष बळकट करण्याच्या हेतूने आमदार वीरेश बोरकर यांना लंडनला पाठविले. परंतु, तेथे जाऊन ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले आणि गोव्यात येऊन ‘आरजी’मध्ये फूट पाडली’’, असा दावा परब यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.