Dussehra Melava: प्रत्येकाचा रावण वेगळा, दहनाचे मार्ग वेगळे, लुटण्याचे सोनेही वेगळेच, समान घटक फक्त मायबाप मतदार; संपादकीय

Dussehra 2024: आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाचे शिलंगण वेगळे, प्रत्येकाचा रावणही वेगळा! त्याचे दहन करण्याचे मार्गही वेगळे आहेत. इतकेच नव्हे, तर प्रत्येकाचे लुटण्याचे सोनेही वेगळेच. समान घटक फक्त मायबाप मतदार असतो.
Dussehra
DussehraCanva
Published on
Updated on

Dussehra News: विजयादशमीचा मुहूर्त साधून अस्त्र-शस्त्रांची पूजा करावी, समारंभपूर्वक सीमोल्लंघन करावे आणि सोने लुटावे, अशी शतकानुशतकांची परंपरा आहे. कलम ते कम्प्युटर आणि खांडा ते खलबत्त्यापर्यंत अनेक जीवनोपयोगी आयुधांच्या पूजनाचा हा दिवस.

सांप्रतकाळी या अमोघ शस्त्रास्त्रांमध्ये जिभेचीही जिम्मा करावी लागेल. कारण आजकाल दसऱ्याचा मुहूर्त साधून राजकीय पक्षांचे नेते आपापल्या विचारांच्या सोन्याची लयलूट करण्याची सुवर्णसंधी अजिबात सोडत नाहीत. किंबहुना हा संपूर्ण दिवसच पूर्णत: पोलिटिकल होत चालला आहे, असे चित्र दिसते. अर्थात लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यात आक्षेप घेण्याजोगे काहीच नाही.

आपापल्या समर्थकांची गर्दी जमवून दसरा मेळावा साजरा करून जमल्यास मतांचे सोने लुटण्यासाठी मोहीमशीर व्हायचे, असा नवा परिपाठ पडून गेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा प्राचीन काळापासूनच होतो. त्याला आद्य दसरा मेळावा म्हटले पाहिजे आणि संघ हा काही राजकारणाचा भाग नाही. शिवाय दसरा मेळावा ही एक सांस्कृतिक घटना असते. बाकी राजकीय पक्षांचे दसरा मेळावे मात्र काही विशिष्ट हेतूनेच आयोजित केलेले असतात, यात शंका नाही.

आजमितीस महाराष्ट्रात जवळपास डझनभर दसरा मेळावे पार पडतात. हे सारेच सामाजिक समरसतेसाठी चाललेले असते, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. दसरा मेळाव्याच्या नावाने आपल्या विरोधकांच्या नावाने शिमगा करायचा आणि सत्ताकारणाच्या शर्यतीत जमल्यास आपलेही सजवलेले घोडे दामटायचे, असा या राजकीय शिलंगणाचा अन्वयार्थ आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा तर वर्षानुवर्षाचा इव्हेंट. शिवसेनेच्या जन्मापासूनच या मेळाव्याचा सिलसिला सुरू झाला. गेल्या काही वर्षांत त्याच पक्षाची दोन्ही भकले आपापले मेळावे घेऊन आपापले रावण, म्हणजे एकमेकांनाच प्रतीकात्मक मार्गाने जाळू लागले. शिंदे गटाचे शिलंगण उगवतीकडे तर ठाकरे गटाचे मावळतीला!

गेली तीन वर्षे असेच मेळावे आणि त्यातील शाब्दिक शिमगा अभिजात मराठीच्या लेकराबाळांना ऐकून घ्यावा लागत आहे. तिकडे सावरगावात पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा असतोच आणि समर्थकांना सोने वाटण्याची परंपरा पाळली जातेच. कधी नव्हेत ते यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनक राज ठाकरे यांनीही पॉडकास्टद्वारे शिलंगणाचे सोने लुटणार असल्याचे जाहीर केले. मैदान मोकळे मिळाले असते तर त्यांनी कदाचित तुडुंब गर्दीतच आपला रावण जाळला असता.

मराठवाड्यात आंदोलनाची तेग परजून सरकारलाच ललकारणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनीही यंदा दसरा मेळाव्यात जोरदार शिलंगण करण्याचा इरादा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आणि तडफदार युवानेते रोहित पवार यांनीही आपला रावण यंदा शोधला आहे.

आणखीही काही शिलंगणाचे मेळावे दसऱ्याच्या निमित्ताने रंगतील. त्यातले बरेचसे खरेखुरे सांस्कृतिक महत्त्वाचे आणि श्रद्धेपोटी घडतील. पण या सणासुदीच्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगते ते राजकारणच. यंदाच्या दसरा मेळाव्यांना तर आगामी निवडणुकांच्या हवेचा वेगळाच तडका मिळाला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी वेळेत आलेल्या दसऱ्याला शिलंगणाची संधी न साधणारा राजकीय पक्ष विरळाच म्हणावा लागणार.

दसरा हा सण आनंदाचा असला, तरी या दिवशी राजकारणालाही तोटा नाही, हे खरेच. सणासुदीचे निमित्त साधून राजकारणातील मसलत तडीला नेण्याचे प्रकार महाराष्ट्राला नवे नाहीत.

Dussehra
Ratan Tata: टाटांचा अखेरचा ‘वीकेन्ड’ गोव्यात! समुद्र साठवला नयनात; ३० वर्षांपूर्वीच्या आठवणींनाही उजाळा

अनेक दिग्गज आणि द्रष्ट्या पुढाऱ्यांनी सणासुदीचा उपयोग सामाजिक जागृतीसाठी केल्याची काही उदाहरणे आहेत. समाजात काही विधायक बदल होणार असतील, तर अशी उदाहरणे स्वागतार्ह मानली पाहिजेत आणि सांस्कृतिक महाराष्ट्रानेही दोन्ही हात पसरून या उपक्रमांचे वेळोवेळी स्वागत केले.

तथापि, सध्याच्या छेदा-भेदाच्या राजकारणाच्या काळात राजकीय पक्षांचे हे वेगवेगळे दसरा मेळावे परस्परविरोधी हेतूने प्रेरित झालेले बघायला मिळतात. यात समाजाच्या उत्थानाच्या उदात्त उद्देशाने इथे कोणीच पेटलेले नाही. शेवटी सारे काही मतांच्या खेचाखेचीकडे जाऊन पोचते. अशा दसरा मेळाव्यांना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणणे मात्र साळसूदपणाचे ठरेल. आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाचे शिलंगण वेगळे, प्रत्येकाचा रावणही वेगळा ! त्याचे दहन करण्याचे मार्गही वेगळे आहेत. इतकेच नव्हे, तर प्रत्येकाचे लुटण्याचे सोनेही वेगळेच. समान घटक फक्त मायबाप मतदार असतो.

फरक इतकाच, की त्याच्या हातात आता आपट्याच्या पानांचे सोने नसून मतांचे बावककशी कांचन आहे. यंदा तर निवडणुकांमुळे दसऱ्याचे शिलंगण बहुतेक आयोजक पक्षांसाठी आपापल्या प्रचारमोहिमांची दुंदुभि फुंकण्याचीच संधी म्हणून आला आहे. ती कोण वाया दवडतो ? दहनासाठी आपणही आपापला रावण ओळखावा आणि कुठल्या हातात हे मतांचे सोने ठेवायचे, हे ठरवावे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com