CBI तपास थट्टास्पद, ACB अधिकारी खूनाचा शोध कसा घेणार? गोव्यातील विदेशी पर्यटकांच्या मृत्यूबाबत कुटुंबीय काय म्हणाले?

इवल्याशा राज्यात गूढ मृत्यूच्या घटनांची उकल करण्यात राज्य ते केंद्रीय तपास यंत्रणांना देखील पुरेसे यश मिळाले नाही, असे बऱ्याच प्रलंबित राहिलेल्या प्रकरणातून दिसून येते.
Foreigners Died Suspiciously In Goa
Foreigners Died Suspiciously In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे आणि आवडीचे ठिकाण राहिलेला गोवा अमली पदार्थ आणि विदेशी पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू यामुळे बदनाम होत राहिला आहे. इवल्याशा राज्यात गूढ मृत्यूच्या घटनांची उकल करण्यात राज्य ते केंद्रीय तपास यंत्रणांना देखील पुरेसे यश मिळाले नाही, असे बऱ्याच प्रलंबित राहिलेल्या प्रकरणातून दिसून येते.

गोव्यात झालेल्या परदेशी पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती यापूर्वी आपण दोन लेखातून घेतली. त्यातील दोन घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांनी या घटना, त्याचा तपास, राज्य सरकार आणि तपास यंत्रणा याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी सरकार, पोलीस, तपास यंत्रणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काणकोण येथे 2015 सालचे फेलिक्स दहल मृत्यू प्रकरण

स्वीडिश तरूण फेलिक्स दहल (वय 22) याचा 28 जानेवारी 2015 रोजी पाटणे काणकोण येथे मृतदेह सापडला होता. याप्रकरणी काणकोण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. परंतु दहलच्या कुटुंबीयांनी फेलिक्सचा खून झाल्याचा आरोप केला.

एप्रिल 2018 मध्ये काणकोण पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, त्याविरोधात दहल कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास करण्याचे सीबीआयला आदेश दिले. दरम्यान, जवळपास पाच वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर एप्रिल 2023 मध्ये पुराव्यांचा अभाव असल्याचे म्हणत सीबीआयने याप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

फेलिक्स दहल मृत्यू प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने क्लोजर अहवाल सादर केल्यानंतर फेलिक्सच्या मावशी सना कटर यांना आम्ही संपर्क साधला. सना कटर फेलिक्सच्या हत्या प्रकरणात सातत्याने आवाज उठवत आहेत.

फेलिक्सची मावशी सना कटर काय म्हणाल्या?

'आणखी एका पर्यटकाच्या हत्येचे प्रकरण लपविण्यात गोवा सरकार, पोलीस महासंचालक आणि गोवा पोलिसांना यश आले असून, याचा त्यांना निश्चितपणे अभिमान वाटत असेल, पण ही पहिली किंवा शेवटची घटना नाही. पर्यटकांचा मृतदेह सापडल्यापासून त्या घटनेचा तपास योग्य पद्धतीने केला जात नाही.' असा आरोप सना कटर यांनी केला.

मारेकऱ्यांना समाजात मोकळे सोडले जाते आणि स्थानिकांना याबाबत काहीही अडचण वाटत नाही याचे नेहमीच मला आश्चर्य वाटते. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

'केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा तपास निरुपयोगी आहे. पण, फेलिक्ससाठी न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेली आमची धडपड कोणी थांबवू शकणार नाही.'

'फेलिक्सचा रात्रीच्या वेळेस कार्टव्हील करताना अपघात झाला, त्यात त्याच्या डोक्याला पाचवेळा मार लागून, कवटी फुटली आणि त्याचा मृत्यू झाला, या स्पष्टीकरणाला कोणताही तर्क नाही.' असे म्हणत कटर यांनी पोलिसांच्या प्राथमिक तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गोव्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आणि गोव्यातील बाकीच्या अधिकाऱ्यांची इच्छा नसली तरी, आम्ही फेलिक्सला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहणार.' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Foreigners Died Suspiciously In Goa
Foreigners Died Suspiciously In Goa: देअर लास्ट ट्रीप! गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 1

फेलिक्सच्या डोक्याखाली मोठी वीट ठेवलेले फोटो आहेत, हे बाब गुन्हा घडलेल्या ठिकाणाशी छेडाछाड करण्यासारखे आहे. दरम्यान, फेलिक्सच्या डोक्याखाली वीटा नव्हत्या. त्यामुळे सीबीआयचा हा संपूर्ण तपास एक थट्टा असल्याचा आरोप कटर यांनी .

'आमचे वकील मागच्या वेळी मुंबईहून गोव्याला गेले तेव्हा नव्याने पदभार स्वीकारलेल्या तपास अधिकाऱ्यांची माहिती त्यांना देण्यात आली नाही. भ्रष्टाचार विरोधी पधकाचा भाग असणारे अधिकारीच गोवा सीबीआय युनिट चालवतात. त्यामुळे 'भ्रष्टाचार तज्ज्ञ' अधिकारी खूनाचा तपास करण्यास सक्षम नाहीत.' असे कटर यांनी म्हटले आहे.

'जगातील सर्व सरकारी संकेतस्थळांवर पर्यटकांना प्रवासाबाबत सूचना आणि काही इशारे देण्यात येतात. पर्यटकांना संभाव्य धोक्यांपासून सावध केले जाते, गोव्यातील पर्यटकांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या सूचनांमध्ये वाढ होण्याची शक्यता टाळता येत नाही.' असे मत सना कटर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना मांडले आहे.

फेलिक्सची आई मीना पिऱ्होने यांनी गोवा सीबीआयचे प्रमुख सुबोध कुमार जैसवाल यांना पत्र लिहून तपासाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. माझ्या मुलासोबत काय झाले हे मला कळत नाही तोपर्यंत मी सामान्य आयुष्य जगू शकत नाही. तसेच, फेलिक्स प्रकरणाचा तपास मुंबई सीबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. गोव्यात फेलिक्स आणि न्याय अशा दोन हत्या झाल्या असेही मीना यांनी त्याच्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, गोवा केंद्रीय गुन्हे शाखाची स्थापना भ्रष्टाचार संबधित प्रकरणाचा तपास करण्यासाठी करण्यात आली आहे. फेलिक्स दहल प्रकरणाचा तपास आमच्याकडे कसा आला याची कल्पना नाही असे गोवा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

पाळोळे येथे ब्रिटीश, आयरिश डॅनिएल मॅक्लॉफिन बलात्कार अन् हत्या

डॅनियल मॅक्लॉफिन या 28 वर्षीय ब्रिटीश - आयरिश महिलेचा मार्च 2017 मध्ये पाळोळे परिसरात संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक 24 वर्षीय विकट भगत विरोधात याप्रकरणी बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डॅनियल 13 मार्च 2017 रोजी पाळोळे येथील बीच रिसॉर्ट येथे आयोजित एका होळीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा विद्रुप केलेला मृतदेह देवबाग बीचजवळ आढळून आला.

आरोपी भगत वरती दाखल केलेल्या 378 पानी आरोपपत्रात त्याने डॅनियलचा बलात्कार करून खून केला. तसेच, तिचा चेहरा ओळखू नये म्हणून तो विद्रुप केला, असे म्हटले आहे. भगत अटकेत असून, सध्या याप्रकरणी मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.

Foreigners Died Suspiciously In Goa
Foreigners Suspiciously Died In Goa: बलात्कार, मारहाण, खून; गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 2

अलिकडे एप्रिल महिन्यात ब्रिटीश, आयरिश राजदूतांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व डॅनिएलच्या खून प्रकरणाचा खटला वेगवान करून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली.

ब्रिटिश उपउच्चायुक्त अ‍ॅलन गेमेल आणि पश्चिम भारतातील आयर्लंडच्या कौन्सुल जनरल अनिता केली यांनी एप्रिलमध्ये मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. डॅनियलच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत, न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. डॅनियल प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

डॅनियलची आई अँड्रिया ब्रॅनिगन यांनी याप्रकरणी एक निवेदन काढून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या मुलीचा गेल्या सहा वर्षांपूर्वी गोव्यात एका क्रूर हल्ल्यात जीव गेला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.

"डॅनिएलला न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने लढत असून, मी स्वत: आणि माझ्या कुटुंबाला देखील यातून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. डॅनिएलला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढतच राहिन." असे तिची आई अँड्रिया ब्रॅनिगन म्हणाल्या आहेत.

"डॅनिएलला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करत आहे. न्यायालयातील लढाई जिंकण्यासाठी माझे आणि माझ्या कुटुंबियांचे प्रयत्न करत आहोत." असे ब्रॅनिगन यांनी म्हटले आहे.

गेल्या 5 वर्षात या खटल्यात सुमारे 200 सुनावणी होत आल्या आहेत. त्यामुळे डॅनियलला न्याय मिळणार तरी कधी? असा सवाल केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com